Home > Max Woman Blog > माणुसकी तोकडी पडतेय का?- आरती आमटे

माणुसकी तोकडी पडतेय का?- आरती आमटे

माणुसकी तोकडी पडतेय का?- आरती आमटे
X

जे देवदूत बनून तुमचा आमचा जीव वाचवण्यासाठी स्वतः चे प्राण पणाला लावून रात्रंदिवस सेवा करत आहे.त्या डॉक्टर नर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना आपण हिनपणाने वागवतोय या कठीण काळात माणुसकी तोकडी पडतेय का? वाचा सामाजिक कार्यकर्त्या आरती आमटे-नानकर यांचे अनुभव

काल सकाळी मा‍झ्या एका मैत्रिणीशी, ती नर्स आहे तिच्याशी, बोलतांना आम्हाला दोघांनाही खुप रडू येत होत. आम्ही दोघंही एकमेकांना समजवायचा प्रयत्न करत होतो पण अर्थातच त्याचा खुप काही फायदा होत नव्हता. ती इतर अनेक जणांप्रमाणे घरापासून, घरच्यांपासून दूर राहून तिचे काम करते आहे व त्यामुळे गावातील व आजूबाजूच्या लोकांनी तिच्या कुटुंबियांना, तिच्या लहान मुलीला बहिष्कृत केले आहे.

तिला आमची आणि अगदी तिच्या घरातील सगळ्यांची पुन्हा भेट होईल याचीही खात्री वाटत नव्हती आणि असं काही झालं तर मग तिच्या मुलीचे काय होईल याचीही चिंता होती. मा‍झ्या इतर अनेक मित्र मैत्रिणींची, आणि कदाचित इतर अनेकांची, देखील जवळपास अशीच परिस्थिती आहे, आणि खरं सांगावं तर माझीही परिस्थिती याहून फार काही वेगळी नाही.

गेल्या दोन - तीन आठवड्यात लोकांचे, लोक कस वागतात याचे, कसे वागू शकतात याचे खुप प्रकार, काही मोजके चांगले तर बरेचसे वाईट असे प्रकार, पहायला मिळाले आणि येणार्‍या दिवसात अजूनही बरेच प्रकार पहायला मिळतील असे दिसते आहे. मला उदय, माझा नवरा, या सगळ्याच्या अगदी सुरवातीपासून म्हणत होता की कोरोनाच्या आजारापेक्षाही या इतर वाईट गोष्टींपासूनच आपल्याला जास्त धोका आहे, पण मला तेव्हा ते खरं वाटत नव्हत, अगदी आजही ते खरं होऊ नये असच वाटत आहे पण तस होतांना मात्र दिसत नाही आहे.

मी निराशावादी नाही, मी खुप जास्त विचारही करत नाही आणि त्यामुळे माझे हे दिवस तसे बऱ्यापैकी जात आहेत अस म्हणता येईल. दिनक्रम थोडा बदललेला आहे पण रोजची काम आहेत, मुलांसोबत खेळ आहेत, आमच्या निराधार लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पात रहायला आलेल्या बाबां सोबत प्रार्थना आणि गप्पा आहेत, TV व social media आहेच पण त्याची आणि त्यातही बातम्या पाहण्याची वेळ जरा वाढली आहे, इ. थोडक्यात काय तर दिवस बरा जात आहे.

पण, इतर काही जण ज्याप्रमाणे या वेळेचा, मोकळ्या वेळेचा, फायदा करून घेत आहेत – नवीन काही शिकत आहेत, pending काम पूर्ण करत आहेत, घर आवरत आहेत, आयुष्य सावरत आहेत, कुटुंबियांसोबत quality time spend करत आहेत, lock-down संपल्यानंतर काय-काय करायचे याचे नियोजन करत आहेत – तस मात्र मला प्रयत्न करूनही जमत नाही आहे.

असो.. काही दिवसात बऱ्याचश्या गोष्टी स्पष्ट होतीलच.

तोपर्यंत, आणि नंतरही, हीच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे – माणसाने माणसाशी माणसासम वागणे...

Updated : 8 April 2020 7:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top