नवऱ्याने हाणलं आन पावसानं झोडपिलं तर न्याय कुणा मागावा?
X
फिल्म बघीतली आणि गेल्या 15 वर्षातील फिल्डवरील कौटुंबिक हिंसाचार पिडीत महिलांचे अनुभव डोळ्यासमोर तरळु लागले...
नवऱ्याने हाणलं आन पावसानं झोडपिलं तर न्याय कुणा मागावा?
दारूची उधारी द्यायची राहीली म्हणुन कुणाजवळ तरी बायकोला झोपायला पाठवणारे नवरे, विहिरीत उड्या घेणाऱ्या महिला, शेगडीवर करंट देणारे नवरे, घराला करंट देणारे नवरे...
लहान वयात विधवा झालेल्या बहिणीला पुनर्विवाह न करू देणारे भाऊ, रात रात मोकाट फिरणारे आणि बहिणीला कॉलेजला जाऊ न देणारे भाऊ, स्वतः अंतरजातीय लग्न करणारे पण बहिणीने अंतरजातीय लग्न करू नये म्हणुन शिव्या, हाणमार करणारे भाऊ...
मनाविरुद्ध पोरीनं लग्न केले म्हणून पोरीचं तोंड न बघणारे बाप, आवडतं करियर, शिक्षण न घेऊ देणारे बाप सासरे नवरे भाऊ...
नोकरदार बायकोचे एटीम कार्ड स्वतःच वापरणारे, नोकरी का करती बायको म्हणून तिच्या 75 साड्या तिच्या नजरेसमोर जाळणारे नवरे, नोकरी सोडायला लावणारे नवरे, स्वतः अफेअर करणारे पण बायको मात्र पतिव्रताच पाहीजे असा अट्टहास धरणारे नवरे, माहेर आणि सासर असा दुहेरी कौटुंबिक हिंसाचार आज महिला सहन करतात.
लोकल ते ग्लोबल कुठेच महिला हिंसाचाराच्या विळख्यातुन सुटत नाही जन्म घेण्यापासुन ते तिची राख होऊस्तर ही ती सुटत नाही. बाई आहे ना! मग तिनं बापाचा, भावाचा, नवऱ्याचा त्रास सहन करावाच हा समाजनिर्माण कायद्याचा जनु अलिखित नियमच आहे.
त्यातुनही हा सहनशिलतेचा नियम जर तोडला बाईने तर किती संसार तुटतील किती संसार मोडतील? नाती संपुष्टात येतील? लेकरांवरचं आई वडलाचं छत्र हरवलं जाईल? किती लोक नावं ठेवतील? चारित्र्याचे हनन होईल? पहिला नवरा असा त्रास देतोय आणि त्याला सोडलं तर दुसरा कसा भेटल?खानदानीला नाव ठेवले जातील का? या सर्व गोष्टींचा विचार करून बाईला सहन करावं लागतं.
हेच सहन करता करता तिचा प्रवास सहनशिलतेपर्यंत येऊन नुसता थांबतच नाही तर, पिढ्यान पिढ्या पुढे चालु रहातोय म्हणुन आज खुप साऱ्या आम्मु(अम्रता) स्वतःचा आत्मसन्मान माणुस म्हणुन जगण्यासाठी आपल्यातील माणुसपणा जपण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढत आहेत.
कारण एरव्ही एक दुसऱ्याच्या धर्मावर जातीवर टिका करणारे बहुतांश पुरुष #स्त्री_दमनाचं खुलेआम किंवा न दिसता समर्थनच करतात यामुळे स्त्रिया विचार नाहीत करत की, मग भलेही कही बार सही करने का रिझल्ट हॅपी होता.
यासाठी आता एका स्त्रीकडे बघताना बायको, मुलगी, सुन, बहिण, आई अशा नात्यात बघताना तिचं माणुस जपण्यासाठी तिला तिच्या मनासारखं जगता यावं यासाठी घरात तसं वातावरण निर्माण होईल का? डबल स्टँडर्ड (घरात एक आणि बाहेर एक बोलताना एक आणि कृती वेगळीच) असं वागणं पुरूषांनी सोडलं तर बायकोकडे बघताना बायकोपेक्षा जोडीदार म्हणून आपण तिचा समजदार जोडीदार झालो तर?
स्त्रीच्या योनिशुचितेशी असणारी बंधने शिथील करता आली तर? हे केव्हा शक्य होईल जेव्हा हजारो वर्षापासून पुरुषांना घरात मिळणारं पित्रुसत्तेच्या माध्यामातून मिळणारं जे सहज आरक्षण आणि पुरुषप्रधानतेच्या मार्गाने मिळणारे फायदे (आयत्या सुविधा) ते हळूहळू सोडलं तर?
पुरुष स्त्रीचा मालक न होता तिचा सहचर झाला तर? मानवी जीवनातील दोन मानव परस्परविरोधी न होता परस्परपुरक होऊन तो स्त्रीच्या माणुसकीच्या प्रवासातील सहप्रवासी झाला तर? समानतेची भुमिका असणार्यांनी समानतेची प्रत्यक्ष भुमिका घेतली तर समतेवर आधारीत समाजनिर्माण होऊ शकतो यासाठी गरज आहे प्रत्यक्ष संविधानातील मुल्ये वर्तनात आणण्याची...
सत्यभामा सौंदरमल
संविधान प्रचारक
दामिणी दारुबंदी आभियान