Home > Max Woman Blog > लुळा पांगळा संसार, एका वेश्येची लव्ह स्टोरी

लुळा पांगळा संसार, एका वेश्येची लव्ह स्टोरी

ती एक वेश्या, तिच्या स्मृत्तीत सर्वत्र अंधार... वय वाढत चालल्यामुळे कमाईही घटली. एकही गिऱ्हाईक नाही. बाहेर धो धो पाऊस... दलालाचा तगादा... आणि अशातच एका दिव्यांग व्यक्तीने तिला केलेली मदत तिचं आयुष्य पालटून गेलं, वाचा खऱ्या दुर्गेची कहानी...

लुळा पांगळा संसार, एका वेश्येची लव्ह स्टोरी
X

रजिया बेगमची मुलगी रोज रात्री तिला अडवायची. मात्र, तिला भूलथापा देऊन रजिया घराबाहेर पडायची आणि पहाट उजाडताना घरी यायची. समज आल्या क्षणापासून रजियाचा एकही दिवस असा गेला नव्हता की तिच्या काळजात दुःख वेदनांनी साद घातली नव्हती. तिचे जन्मदाते कोण होते? हे ही तिला ठाऊक नव्हते. तिचं बालपण कुठं गेलं आणि कसं गेलं हे ही तिला माहिती नव्हतं. तिच्या स्मृतीत ती जिथवर मागं जायची तिथवर तिचा वेश्याव्यवसायाचा पेशा तिच्या मागं यायचा.

वयाच्या कितव्या वर्षी तिच्याशी पहिल्यांदा शय्यासोबत केली गेली हे ही तिला आठवत नाही. थोडक्यात तिच्या स्मृतीत सगळा अंधःकार होता. एका व्यक्तीने तिच्याशी संधान बांधलं. लगट केली, विश्वास संपादन केला आणि निकाह लावतो. म्हणून फुकटात ओरबाडत राहिला. तिच्या कमाईवर त्यानं डोळा ठेवला. तिच्या गर्भात बीज रोवलं आणि त्याचा फायदा घेत तो तिला राजरोसपणे ब्लॅकमेल करू लागला. अखेर त्यानं तिला फसवलं, दोघांच्या नव्या संसारासाठी घर घ्यायचं म्हणून तिची सगळी कमाई घेतली आणि पळून गेला.

तिची पाचावर धारण बसली. कारण पोट पाडणं देखील आता शक्य नव्हतं. तिने धैर्याने प्रसूत व्हायचं ठरवलं. दिवस भरताच तिची प्रसूती झाली. मुलगी झाली. त्या मुलीसाठी तिनं जगायचं ठरवलं. तिने घर बदलून पाहिलं, दुसरं काम शोधून पाहिलं. मात्र, तिचं दुर्दैव आड येत राहिलं. तिला पुन्हा त्या दलदलीत जावं लागलं. आधीच्या मालकिणीने तिच्यावर दावा केला. अंगावर देणं काढलं आणि त्या देण्यापायी तिची पिळवणूक सुरु झाली. बघता बघता काळ पुढे जात राहिला.

मुलगी मोठी झाली आणि तिच्या प्रश्नांना उत्तरे देताना रजियाची भंबेरी उडू लागली. रजियाला आता खऱ्या अर्थाने स्वतःची भीती वाटू लागली. तिला आता आधार हवा होता. तिच्या या असहायतेचा नेमका फायदा घेत पुन्हा काहींनी तिला वापरलं आणि तिलाच लुटून सोडून दिलं.

त्या नंतर तिनं मग कधी आधार असण्याचा आग्रह केला नाही. तिनं स्वतःचं आयुष्य स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या विचारांनी जगायचं ठरवलं. तिला कधी कुणीच जवळ केलं नाही. मग निर्व्याज प्रेम वगैरे गॊष्टी दूरच्या झाल्या. मात्र, एके दिवशी थोडंसं वेगळं घडलं. नाक्याबाहेरील रस्त्यावर असणाऱ्या विराण झाडाखाली रजिया उभी होती. पाऊस धोधो कोसळत होता. रजिया त्या दिवशी प्रचंड तणावात होती. घरी खायला काही नव्हतं आणि वय वाढत चालल्यामुळे कमाईही घटत चालली होती. त्यादिवशी तर कुणीच फिरकलं नाही. तिथून काही रुपये कमवून दलालाच्या हाती दिल्याशिवाय तिची खैर नव्हती. खरं तर जीवनाला ती कंटाळून गेली होती. त्या क्षणी तिला मोठ्याने रडावं वाटत होतं, टाहो फोडावासा वाटत होता. तिचं अंग गळून गेलं होतं मन खचून गेलं होतं.

इतक्यात तिचं लक्ष व्हीलचेअरवर बसलेल्या एका तरुण भिकाऱ्याकडे गेले, किंबहुना तिने त्याच्याकडे पाहावं म्हणून तो बळेच खोकला होता. त्याच्या नजरेत अपार माया होती, प्रेम होतं. त्यानं एक हिसका देऊन व्हीलचेअर पुढे नेली आणि हातात असलेली चुरगाळलेली नोट तिच्या हाती कोंबली. इतक्या पावसात वादळात तरी पुन्हा इथं येऊ नको. असं विनवून तो निघून देखील गेला. रजिया अवाक होऊन पाहत राहिली. अशीही माणसं या जगात आहेत हे तिनं पहिल्यांदा अनुभवलं होतं. त्या तरुणाने तिला सहज मदत म्हणून काही रुपये दिले आणि ओल्या रस्त्यानं तो सरळ निघून गेला.

नंतर तिच्या लक्षात आलं की, हा तरुण भिकारी गेले काही दिवस आपल्यावर लक्ष ठेवून होता. मात्र, आपलं त्याच्याकडे लक्ष गेलं नव्हतं. त्यानंतर बरेच दिवस तो दिसला नाही. रजियाने त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, तिला यश आले नाही. एके दिवशी त्याच झाडाखाली तो व्हीलचेअरवर दिसला. रजियाने ठरवलंच होतं, तो भेटला की त्याच्याशी बोलून मन मोकळं करायचं! रजियाला गहिवरून आलं कारण तिला आजवर कुणी काही दिलं नव्हतं. तिच्याकडून काही वसूल न करता पैसे तर कधीच कुणी दिले नव्हते. ठरल्याप्रमाणे रजियाने त्याला थेट विचारलं,

"आजवर कुणी मला प्रेमाने पाहिलं नाही. मात्र, तुझी ही व्हीलचेअर मी आयुष्यभर ढकलू शकते. तुझी तयारी आहे का?" यावर त्या तरुणाचं उत्तर खूप बोलकं होतं. त्यानं हसून म्हटलं, "अंतःकरणात प्रेम असल्याशिवाय कुणी असं उगीच करूच शकत नाही!" त्याच्या उत्तरावर तिने सूचक मौन बाळगलं. मात्र, तिच्या डोळ्यातून प्रेम ओसंडून वाहिलं. रजियाने त्याचं मन जाणून घेतलं. लग्नानंतर अपघातात अपंगत्व आल्याने पत्नीने त्याला सोडून दिलं होतं. त्याचं नाव अब्बास होतं. दोघांची मने जुळल्यानंतर त्या दोघांनी रीतसर निकाह केला.

आज त्यांच्या विवाहाला सहा वर्षे पूर्ण झालीयत. अब्बासने दिलेला शब्द पाळला, त्यानं रजियाची साथ सोडली नाही. प्रेम आणि आधार मिळाल्यावर रजियाने वेश्याव्यवसाय सोडून दिलाय. त्याच्यासाठी नवीन चांगली व्हीलचेअर घेतली आहे. ते दोघे मिळून कमावतात, त्यात त्यांचं भागत नाही. मात्र, एक चपाती एका ताटात दोघात मिळून खातात. या प्रेमामुळे त्यांचा संसार सुखाचा झाला आहे. एनजीओच्या मदतीने तिचं देणं फेडून झालंय...

आताही त्यांचा संघर्ष सुरुच आहे. मात्र, जो जगण्याचा आहे, पोटाचा आहे.आत्मसन्मान त्यांनी कधीच मिळवला आहे, त्यासाठीचं प्रांजळ मन त्यांच्याकडे आहे आणि परस्परांच्या देहापलीकडचं त्यांचं प्रेम आहे. बालपणापासून नरक यातना भोगणाऱ्या रजियाचं अंतःकरण विशाल आहे. प्रेमाचं एक बीज काय तिच्या मातीत रुजलं तिनं थेट अस्मानालाही ललकारलं आणि स्वतःचं विश्व नव्याने उभं करतानाच दुसऱ्या जीवाला आधार दिला! रजियामध्ये मी दुर्गेला पाहतो. असीम प्रेम, त्याग आणि विद्रोह सगळं तिच्या ठायी आहे..

- (समीर गायकवाड यांच्या फेसबुक भिंतीवरून)

Updated : 26 Oct 2020 7:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top