सोनियांचं मोठेपण काय?
X
सत्ता हाताशी होती, तेव्हा सोनिया सत्तेच्या आसपासही नव्हत्या.
आपला मुलुख, भाषा सोडून एक तरुण मुलगी १९६८ मध्ये भारतात आली, तेव्हा इथं तिची सासू नुकतीच पंतप्रधान झालेली होती. उत्कट प्रेमात पडून भारतात आलेल्या सोनियांचा जीव सत्तेत कधी रमला नाही.
सासूचा खून तिनं उघड्या डोळ्यांनी पाहिला.
तेव्हा मात्र ती ठामपणे उभी राहिली.
सासू गेल्यावर अनपेक्षितपणे नवरा पंतप्रधान झाला. तरीही त्या सत्तेशी तिनं आपलं नातं कधीच सांगितलं नाही.
नव-याचाही खून झाला.
तेव्हाही ती ठामपणे उभी राहिली.
कच्च्या-बच्च्यांना सांभाळत ती आपलं घरटं जपत राहिली. ज्याच्या वरच्या प्रेमाखातर आपला मुलुख सोडला, ओळख सोडली, तो नवरा गेला. पण, तिचं नातं या घराशी होतं. अवघ्या देशाशी होतं. ती आधी आपलं घर प्राणपणानं सांभाळत राहिली.
नव-याच्या मृत्यूनंतर तिच्याकडंच देशाचं पंतप्रधानपद यावं, असं अनेकांनी बोलून दाखवलं. पण, तिचा जीव त्या सत्तेत रमला नाही. १९९१ मध्ये पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले.
१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पराभूत झाली. पक्षाची अवस्था अतिशय बिकट झाली. भलेभले पक्ष सोडू लागले. आता कॉंग्रेसला बरे दिवस येण्याची शक्यताही धूसर वाटू लागली.
मग मात्र ती आणखी ठामपणे उभी राहिली. तोवर तिचं घरही उभं राहिलं होतं.
१९९७ मध्ये सोनियांनी कॉंग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले, हे लक्षात घेतले पाहिजे. तोवर ही बाई - १९६८ ते १९९७ अशी तीस वर्षे या सत्तेकडे ढुंकूनही बघत नव्हती. ती राजकारणाच्या रिंगणात तेव्हा आली, जेंव्हा सत्ता गेली होती. पक्षाला तिची गरज होती. देशाला गरज होती.
त्यानंतर एवढे आघात झाले, पक्ष फुटला;.पण ही बाई जराही हलली नाही. विचलित झाली नाही. पदर खोचून ती अविचल उभी राहिली. उद्ध्वस्त पक्षाची अध्यक्ष झाली.
१९९९ मध्ये 'मुंडण'वीर सुषमा स्वराजांना धूळ चारून सोनियांनी (अमेठीसह) बल्लारीची निवडणूक जिंकली, पण कॉंग्रेसची सत्तेची संधी मात्र पुन्हा गेली. सोनियांसाठी आजचा काळ नवा नाही, कारण विरोधाचा असाच कालखंड त्यांनी अगदी सुरुवातीलाच झेलला आहे. कमालीची टवाळी, पक्षातील यादवी हे सगळं सोसत धीरोदात्तपणे त्या झुंज देत राहिल्या. 'शायनिंग इंडिया'च्या झगमगाटात पणतीसारखं तेवत राहिल्या. विरोधी पक्षनेत्या म्हणून चमकदार कामगिरी करत राहिल्या. विखारी अपप्रचाराला उत्तर न देता सात वर्षे शांतपणे काम करत राहिल्या.
आणि, २००४ ची निवडणूक त्यांनी कॉंग्रेसला जिंकून दिली. हाता-तोंडाशी आलेले पंतप्रधानपद मात्र नाकारत वेगळी जबाबदारी स्वीकारली. डॉ.मनमोहनसिंगांसारख्या शहाण्या-समंजस नेत्याला त्यांनी पंतप्रधान केले. यूपीएच्या प्रमुख म्हणून सोनिया अधिकृतपणे सत्ताकेंद्र राहिल्याच, पण त्यांची लढाई त्याहून वेगळी होती. सलग दहा वर्षे त्या खेळपट्टीवर टिकून राहिल्या. आघाडी सरकारची कसरत करत राहिल्या. सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करत राहिल्या. अन्नसुरक्षा विधेयक, मध्यान्ह भोजन, रोजगार हमी योजनेसाठी आत्यंतिक आग्रही राहिल्या.
गेली सहा वर्षे आणखी वेगळी लढाई सोनिया लढताहेत! त्याच शांतपणे, धीरोदात्तपणे.
आपलं सर्वस्व संपवणा-या, नव-याच्या शरीराची शब्दशः चाळण करणा-या मारेक-यांना माफ करणारी, समोर आलेलं पंतप्रधानपद नाकारणारी, विरोधाला अंगावर घेत एकाकी झुंज देणारी ही स्त्री समजणंही सामान्य माणसासाठी अवघड आहे! तिच्या मुलांशी तिचं असणारं घट्ट नातं समजणं तर त्याहून दूर.
आज सोनियांच्या हातात वय नाही, पण तरीही आपली ऐतिहासिक जबाबदारी त्या जाणून आहेत. भारतीय स्त्रीमध्ये कोणतं सामर्थ्य दडलेलं असतं, याचा त्या पुरावा आहेत.
सोनियांना जेवढा भारत समजलाय, त्याच्या एक शतांश जरी अर्णबला समजला असता, तर 'नेशन वान्ट्स टू नो' हे विचारण्याची गरजच त्याला पडली नसती. देशाला काय हवंय, हेच त्याला कधी समजलं नाही. 'पाकिस्तान्स हेडेक' अशी स्वतःच्या चॅनलची जाहिरात करणा-याला भारत समजावा तरी कसा! सोनियांच्या माहेराशी नातं सांगणा-या मुसोलिनीच्या देशी भावंडांना सोनिया समजणं एवढं सोपं नाही. असो.
तेच काय! सोनिया कोणालाच नीटपणे समजल्या नाहीत. सोनिया राजकारणात अशी मोठी इनिंग खेळतील, हे कॉंग्रेसमधील नेत्यांनाही तेव्हा खरे वाटत नव्हते. सत्तेच्या गुळाला चिकटणा-या कॉंग्रेसी मुंगळ्यांना सोनिया कधीच समजत नाहीत. आताही मॅडम सोनियांचे उद्याचे आडाखे त्यांच्या लक्षात येत नाहीत.
विरोधकांची तर बातच सोडा.
१९९८ नंतरच्या बातम्या तुम्हाला आठवत असतील.
पण, घडले भलतेच.
म्हणून तर, 'मुंडणवीर' सुषमा सोनियांकडून पराभूत होतात.
शरद पवार अखेर सोनिया गांधींसोबत सरकारमध्ये येतात.
ठाकरेंनाही सोनियांच्या संमतीनेच 'सरकार' बनवता येते.
आणि तरीही, सोनिया कुठेच नसतात!
सोनिया फक्त सोनिया असतात!
- संजय आवटे