Home > Max Woman Blog > त्या दिवशी बाबासाहेबांचा खुन झालां अशी अफवा पसरवण्यात आली, पण..

त्या दिवशी बाबासाहेबांचा खुन झालां अशी अफवा पसरवण्यात आली, पण..

महाडच्या चवदार तळ्याचं पाणी जनावरंही प्यायची, पण अस्पृश्यांना मात्र तशी परवानगी नव्हती. या विरोधात एल्गार होता. स्थानिक स्पृश्य पुढा-यांनी बळाचा आणि हिंसेचा वापर केला. 'बाबासाहेबांचा खून झाला', अशी आवई उठवून कार्यकर्त्यांना सैरभैर करण्याचाही प्रयत्न केला. पण, अहिंसक मार्गाने हा सत्याग्रह करण्यात आला. हा सत्याग्रह क्रांतिकारक ठरला. त्याने इतिहास घडवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणात या परिषदेची तुलना त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीशी केली. अवघ्या पस्तिशीतला हा तरणाबांड क्रांतिकारक महाडमध्ये मानवी मुक्तीची घोषणा करत होता.

त्या दिवशी बाबासाहेबांचा खुन झालां अशी अफवा पसरवण्यात आली, पण..
X

आज २५ डिसेंबर. ख्रिसमस म्हणून हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा होतो. जगभर प्रकाशाची उधळण होते. येशूचा जन्मदिवस अशा प्रकारे साजरा होणे अगदी स्वाभाविक आहेच, शिवाय नव्या वर्षाची चाहूल लागल्याने सर्वदूर असणारा जल्लोष नैसर्गिक आहे. यंदा तर, कोरोनाने वेढलेले २०२० चालले आणि सांताक्लॉजच्या पोतडीत दडलेले २०२१ हे छान वर्ष येऊ घातले, या आशेनेही लोक झेपावलेत.

अर्थात, २५ डिसेंबर आणखीही महत्त्वाचा आहे. बरोबर ९३ वर्षांपूर्वी हा दिवस आपल्या महाडमध्ये असाच सणासारखा साजरा होत होता. मंडप, तोरण, पताका अशी सज्जता होती. गावागावातून माणसं तिथं आली होती. हजारोच्या संख्येनं महिला आल्या होत्या. पायी चालत, काबाडकष्ट करत लोक तिथवर पोहोचले होते.

महाडच्या चवदार तळ्याचं पाणी जनावरंही प्यायची, पण अस्पृश्यांना मात्र तशी परवानगी नव्हती. या विरोधात हा एल्गार होता. स्थानिक स्पृश्य पुढा-यांनी बळाचा आणि हिंसेचा वापर केला. 'बाबासाहेबांचा खून झाला', अशी आवई उठवून कार्यकर्त्यांना सैरभैर करण्याचाही प्रयत्न केला. पण, अहिंसक मार्गाने हा सत्याग्रह करण्यात आला. हा सत्याग्रह क्रांतिकारक ठरला. त्याने इतिहास घडवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणात या परिषदेची तुलना त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीशी केली. अवघ्या पस्तिशीतला हा तरणाबांड क्रांतिकारक महाडमध्ये मानवी मुक्तीची घोषणा करत होता.

२५ डिसेंबर हाच दिवस बाबासाहेबांनी निवडला, त्याला येशूचा हा जन्मदिन आहे, हेही एक कारण असू शकते. कारण, 'मनुस्मृती' का जाळली, याबाबत बाबासाहेब म्हणाले - 'अस्पृश्य आणि महिला यांच्यावर वर्षानुवर्षे जो अन्याय होतो आहे, त्याला एकटी 'मनुस्मृती' कारणीभूत आहे. त्या वेळच्या समाजाला नियमांची जरूरी वाटली, तसे नियम मनूने ग्रथित केले. समाजाला न पटणारे व अगदी स्वतंत्र असे बुद्धासारखे वा ख्रिस्तासारखे महात्मे अत्यंत विरळा.'

ज्या नियमांनी शोषणाची व्यवस्था रचली, ती व्यवस्था जाळून, नवे पर्व सुरू झाले पाहिजे, असे बाबासाहेबांनी सांगितले. तेव्हा, बुद्ध, येशू, टॉलस्टॉय यांचा आदर्शही त्यांनी सांगितला.

'मनुस्मृती' नावाची अन्याय्य, जुलमी 'घटना' जाळणा-या या क्रांतिकारकानेच पुढे अवघ्या भारताला 'संविधान' नावाची समतेच्या पायावर उभी ठाकलेली राज्यघटना द्यावी, हा या थोर कथेचा क्लायमॅक्स!

तर, २५ डिसेंबर १९२७ या दिवशी महाडमध्ये सत्याग्रह परिषद सुरू झाली. हजारो लोक त्यासाठी आले. प्रचंड मिरवणूक निघाली. चवदार तळ्याला वेढा घातला गेला. 'मनुस्मृती'चे दहन झाले ते २५ डिसेंबरलाच.

गंमत अशी की, या परिषदेला जागा मिळू नये, यासाठी स्पृश्य नेत्यांनी गावक-यांना बजावले होते. त्यामुळे जागा मिळेना. अशा वेळी फत्तेखान नावाच्या मुसलमान गृहस्थाने आपली जागा या परिषदेसाठी बाबासाहेबांना दिली. ते समजताच, स्थानिक स्पृश्य पुढारी त्याच्याकडे गेले. त्यांनी साम- दाम - दंड -भेदाचा उपयोग केला. पण, फत्तेखान जागचा हलला नाही. 'दिलेले वचन मी कधीही मोडणार नाही', असे सांगून त्याने या लोकांना हाकलले आणि सत्याग्रहाला जागा दिली.

परिषदेत जो मंडप उभारला होता, तिथे या ओळी होत्या -

ब्राह्मण किंवा महार मी,

गणी न कवनालाच कमी।

या सृष्टीतील दिव्यपण,

तेचि तेचि ते मनुजपण।

पुढे म्हटले होते -

ऐसे कैसे रे सोवळे।

शिवता होतसे ओवळे।

हे धर्मयुद्ध आता ऐसे।

असुनी जरी न करशील।

तरी तू स्वधर्म कीर्ती।

बुडवूनिया पातकास करशील।

आत सुसज्ज मंडप होता. पताका लावल्या होत्या. मंडपात महात्मा गांधींची तसबीर वगळता अन्य कोणाची प्रतिमा नव्हती. मंडपाच्या दारात 'मनुस्मृती' दहनासाठी शृंगारलेली वेदी होती. 'मनुस्मृती' दहनाचा कार्यक्रम आयत्या वेळी ठरला, असे ज्यांना वाटते, त्यांनी हे लक्षात घ्यावे की हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. कार्यक्रम पत्रिकेतही त्याचा उल्लेख होता. बाबासाहेब हे पुस्तकप्रेमी खरेच, पण 'मनुस्मृती' हा त्यांच्यालेखी ग्रंथ नव्हता. ती शोषणाची व्यवस्था होती.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सत्याग्रहात 'जय शिवाजी, जय जिजाऊ' ही प्रमुख घोषणा होती. रयतेच्या राजाच्या परिसरात आपण हा सत्याग्रह करतो आहोत, असे बाबासाहेबांनी सांगितले. आणि, नंतर रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना त्यांनी नमस्कारही केला.

२५ डिसेंबर हा दिवस खरे म्हणजे हिंदूंनीही सणासारखा साजरा केला पाहिजे. कारण, 'मनुस्मृती'सारख्या जोखडातून हा प्राचीन धर्म मुक्त झाला. महिलांनी तर या दिवशी गोडधोड करून जल्लोष केला पाहिजे. कारण, तिला तुरूंगात डांबणारी व्यवस्थाच आज भस्मसात झाली. या सत्याग्रहात मुस्लिम होते, ब्राह्मण होते, मराठे होते, तेव्हाचे अस्पृश्य तर होतेच. बुद्ध आणि येशू, छत्रपती शिवराय आणि जिजाऊ, महात्मा फुले- सावित्रीबाई, राजर्षी शाहू यांची प्रेरणा होती. महात्मा गांधींची प्रतिमाही सोबतीला होती. कारण, अवघ्या मानवी समुदायासाठीचा हा सत्याग्रह होता.

तेव्हा, होऊन जाऊ द्या, आज डबल धमाका!

- संजय आवटे

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

Updated : 25 Dec 2020 1:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top