Home > Max Woman Blog > हा मुलुख कुठला?

हा मुलुख कुठला?

हा मुलुख कुठला?
X

ही गोष्ट आहे मुराद अलीची. त्याच्या कुटुंबाची. त्याच्या हिंदू सुनेची. आरोपीच्या कठड्यात उभं केल्या गेलेल्या त्याच्या देशप्रेमाची. त्याला, त्याच्या कुटुंबाला...खरं तर असंख्य मुस्लिम कुटुंबांना या देशात पदोपदी द्याव्या लागणाऱ्या कसोटीची. आपण, आपले कुटुंबीय दहशतवादी नाहीत हे सतत शाबीत करावं लागण्याची.

चित्रपटात एक बरं असतं, दीड-दोन तासांत केव्हा तरी बचाव पक्षाला सलग आठ-दहा मिनिटं पल्लेदार संवाद फेकता येतात. युक्तिवादाला वाव मिळतो आणि तो करत असताना प्रतिपक्ष ट्रोलही करत नाही, की उन्नावसारखं ट्रकबिक घालून 'मामला खतम' करून टाकला जात नाही. शेवट तसा बरा होतो. पुढच्या शो च्या सुरुवातीला पुन्हा एकदा राष्ट्रगीत वाजतं आणि त्यावेळी कोण उभं राहिलंय, कोण नाही याची कसोटी लागतच राहते. शिवाय प्रोटोगनिस्ट मुराद अली असला, तरी ते काम करणारा ऋषी कपूर आहे हे आपल्याला ठाऊक असतं.

पण वास्तव आयुष्यातले प्रोटोगनिस्ट जे तेच असतात. रोजच्या साध्या रुटिन जगण्यातही आणि आताच्या या लॉक डाऊनच्या काळातही. म्हणजे सगळं शहर कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी कडकडीत बंद झालेलं असताना, वॉशिंग मशीननं दगा दिला. हे मशीन दुरुस्त करणारा आदिल. फ्रीजरचा दरवाजा तुटला, दुरुस्त करणारा अरीफ. सिंक चोक झालं, प्लंबर जमीर. शॉर्ट सर्किट झालं, वायरमन इस्माईल. रोजची अंडी-पाव आणणारा कासम. मनुचे केस कापायला येणारा समितुल्ला. हे खरेखुरे आदिल, अरीफ, जमीर, इस्माईल, कासम, समितुल्ला आहेत. ते ही सर्व कामं करतात. मेहनत करून खातात. त्यांच्या कैक पिढ्या याच देशात राहिल्यात आणि पुढच्या कैक पिढ्याही या देशातच राहणार आहेत.

हे आमच्या घरी कामासाठी येतात, ते सोसायटीला फारसं रूचत नाही. पण त्यांचाही नाइलाज होऊन यातल्या काही जणांना काही घरं अडीअडचणीला बोलावून घेतात. पण शक्यतो 'ही लोकं' न आलेली बरी असंच बहुतेकांना वाटत असतं. त्यामुळे गेल्या महिन्यात सोसायटीचा पंप बिघडल्यावर धावाधाव करून 'आपल्या' माणसांकडून तो ठाकठीक करवून घेतला गेला.

तर आदिल, अरीफ, जमीर, इस्माईल, कासम, समितुल्ला हे कोरोनोत्तर काळात सोसायटीच्या गेटमधून पाऊलही आत टाकू शकणार नाहीत असा नियम करण्याचा विचार अनेकांच्या मनात घोळतोय. तो तोंडातून बाहेर पडत नसला, तरी कपाळावरच्या आठ्यांत दिसतो. व्हाटस् अप ग्रुपवरच्या फॉरवर्डस् मधून व्यक्त होतो.

पण गेल्या दोन-चार दिवसांपासून सोसायटीचा सिक्युरिटी अन्वर दिसलेला नाही. अन्वर जालन्यचा. मराठीच. आता आतपर्यंत होता. गेल्या काही दिवसांपासून सोसायटीचे नियम कडक झालेत. बाहेरून कोणालाही आत प्रवेश नाही. वॉचमनही २४ तास एकच. तो 'आपल्या'पैकी. इतकी कडेकोट सुरक्षाव्यवस्था असल्यावर कोरोना विषाणूविरुद्ध we will win असा सर्वांचा विश्वास.

तर आपण मुराद अली विषयी बोलत होतो. बा ऋषी कपुरा, जीव तोडून काम केलंयस् रे! त्या अनुभव सिन्हानंही बारीक सारीक तपशील टिपलेत. पण या देशातला विद्वेषाचा विषाणू खूप चिवट आहे. या सोसायटीने सद्भावनेला गेट बंद केलेत आणि सद्सद् विवेक लॉक डाऊन झालाय!

-प्रतिमा जोशी

Updated : 1 May 2020 7:04 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top