यशोमती ठाकूरांना उध्वस्त करण्यासाठी अमरावतीत दंगल ?
X
अमरावतीत धार्मिक दंगल झाली. रझा अकादमी नावाच्या जातीयवादी मुस्लिम संघटणेकडून हिंसाचार करण्यात आला. रझा अकादमी या जातीयवादी संघटणेचा जातीयवादी इतिहास महाराष्ट्राला चांगलाच परिचीत आहे. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील गृहमंत्री असताना याच रझा अकादमीने मुंबईत मोठ्या प्रमाणात हिंसा केली होती. काही महिला पोलिस कर्मचा-यांचा विनयभंगही त्यावेळी केला गेला होता. शहीद स्मारक तोडण्यात आले होते. त्याच रझा अकादमीने अमरावतीत दंग्याची सुरूवात केली. त्रिपुरात मशिदी पाडल्याच्या अफवेवरून ही जातीयवादी उंदरं बिळातून बाहेर पडली आणि रस्त्यावर उतरून दंगा करू लागली. नेमका हाच धागा पकडून सत्तेवाचून तडफडणा-या भाजपाने यात उडी मारली. भाजपाच्या स्थानिक नेत्यापासून राम कदम, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील ते फडणवीसांच्यापर्यंत सगळी मंडळी लगेच हिंदूंचे तारणहार म्हणून बिळातून बाहेर आली. ही सर्व मंडळी आगलावू आणि भडकावू भाषणे करत होती. त्यांच्या एका भावाने रस्त्यावर उतरून दंगा केल्यावर दुसरा भाऊ पोळी भाजायला रस्त्यावर आलाच पाहिजे. अमरावतीत तेच झाले. रझा अकादमीचा हिंसाचार होतो न होतो तोच भाजपवालेही रस्त्यावर उतरले. रझा अकादमी आणि भाजप ही सख्खी भावंडे आहेत. धर्माच्या नावावर समाज पोखरणा-या, समाज नासवणा-या या प्रवृत्ती सारख्याच आहेत. दोन्हीचे धर्म वेगळे असले तरी प्रवृत्ती सारखीच आहे. हे तमाम जातीयवादी भाऊ एकमेकांना पुरक भूमिका घेतात. एकाने इस्लाम खतरे मे है ! म्हणायचे तर दुस-या भावाने, हिंदू खतरे मे है ! म्हणायचे. खरेतर खत-यात ना मुसलमान असतो ना हिंदू. खत-यात असते ती या भामट्यांची सत्ता. या देशातले तमाम जातीयवादी किडे एकजात एकाच लायकीचे आहेत. धर्माचे आणि जातीचे दंगे हे सत्ता मिळवण्याचे साधन आहेत. धर्माच्या नावाने लोकांना मुर्ख बनवायचे. त्यांची मस्तकं भडकवायची आणि आपल्या सत्तेचा मार्ग प्रशस्त करायचा अशी धुर्त चाल हे खेळतात. अमरावतीत हाच प्रयोग केला गेला. तिथे रझा अकादमीची आणि त्या नंतर भाजपवाल्यांची दंगल ही पुर्व नियोजीत असण्याचीच शक्यता अघिक आहे. एका भावाला सत्तेत आणण्यासाठी दुसरा भाऊ इस्लाम खतरे मे हे ! म्हणत दंगे करायला रस्त्यावर उतरतो. मग त्याचा बदला, त्याचा निषेध म्हणून दुसरा भाऊ रस्त्यावर येतो. मुसलमानांना वाटते हे आपले तारणहार आहेत तर हिंदूना वाटते हे आपले तारणहार आहेत. भाबड्या लोकांना यांचे खरे दात माहित नसतात. ते फशी पडतात या मायावी लोकांना.
राज्यात इतरत्र दंगलीची तीव्रता इतकी नव्हती मग ती एकट्या अमरावतीतच का ? अमरावतीत दंगल करण्यामागे राजकारण आहे. तिथे कॉंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूरांना नेस्तनाबूत करण्यासाठी, त्यांचा राजकीय बिमोड करण्यासाठीच हा दंगलीचा घाट घातला जातोय अशी शंका येतेय. यशोमती ठाकूर विद्यमान सरकारात मंत्री आहेत. त्या सातत्याने व जाहिरपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जातीयवादी दात पाडण्याचे काम करत असतात. संघाचा जातीयवाद अजेंड व चेहरा उघडा पाडत असतात. भाजपवर अनेकजण टिका करतात पण भाजपाच्या बापावर म्हणजे थेट संघावर कुणी बोलत नाही. यशोमती ठाकूर संघाचे जातीयवादी दात सतत तोडत असतात. गेल्या वर्षा-दोन वर्षात यशोमतींनी संघावर अतिशय तिखट हल्ले केले आहेत. सातत्याने संघाच्या जातीयवादी भूमिकेवर भाष्य केले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे ओठावर मुठमुठ मिशा असणारे नेते संघावर बोलत नाहीत. संघाला लक्ष्य करत नाहीत. संघावर बोलण्याची त्यांची हिम्मत होत नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते आतल्या-आत या संघवाल्यांशी साटेलोटे करून आहेत. त्यांच्याकडे संघावर टिका करावी इतकी हिम्मतही नसते आणि संघ काय काशी करतोय ? हे कळण्याची औकादही नसते. त्यामुळे ही मंडळी संघाला न दुखावता मदत करतात. अशा स्थितीत यशोमती ठाकूर नावाची मर्दानी संघावर तुटून पडते. संघाचा जातीयवादी विद्रुप चेहरा सतत उघडा पाडत राहते हेच संघाला पचत नाही. म्हणूनच त्यांना नेस्तनाबुत करण्यासाठी, त्यांची राजकीय पाळमुळं उखाडण्यासाठी अमरावतीत दंगल घडवली असण्याची शक्यता आहे. केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून संघ अभ्यासक्रमात जातीयवाद पेरतोय यावरही यशोमती बोलल्या होत्या. स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासक्रमातही संघ विचार घुसडला जात असून तो रोखायला हवा अशी भूमिका यशोमती ठाकूरांनी मांडली होती. यशोमती ठाकूरांच्या धडावर त्यांचेच डोके आहे. त्यांच्याकडे स्वत:चा विचार आहे. तो धर्मनिरपेक्ष आहे आणि त्या धर्मनिरपेक्ष विचाराला संघाच्या विषारी मायाजालापासून धोका असल्याचे त्या पुरेपुर जाणून आहेत. म्हणूनच त्या उघड उघड भूमिका घेतायत. संघावर प्रहार करतायत. संघाची लक्तरे काढतायत. त्याच यशोमतींचा आवाज बंद करण्याचा खटाटोप सुरू असण्याची शक्यता वाटते आहे. यशोमतींच्या मतदारसंघात असे घुसता येत नसेल तर तिथे धार्मिक ध्रुवीकरण करून घुसण्याचा हा प्रयत्न असावा असे वाटते.
रझा अकादमी नावाची जातीयवादी संघटना महाराष्ट्रभर आहे मग अमरावतीतच ती रस्त्यावर का उतरते ? तिथेच इतकी उग्र का होते ? ती राज्याच्या इतर कुठल्याच भागात उग्र होत नाही, दंगा करत नाही. दुसरी गोष्ट या घटणेवर लगेच भाजपाचे सगळे नेते भडकावू भाषा करायला पुढे कसे सरसावतात ? दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे सातशे शेतकरी मेले. मरणारे सर्व शेतकरी हिंदूच होते. त्यांच्यासाठी यातल्या एकाही पठ्ठ्याने गळा का काढला नाही ? देवेंद्र फडणवीसांच्यापासून कोल्हापुरच्या चंद्रकांत पाटलांपर्यंत सर्वांनीच हिंदू हिंदू म्हणून उर बडवायला सुरूवात केली होती. जर हे हिंदूचे तारणहार आहेत आणि रझा अकादमी यांची धार्मिक शत्रू आहे तर भाजप नेते आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात मांडीला मांडी लावून कसे बसतात ? या साटेलोच्याचा काय अर्थ ? रझा अकादमीला पुढे करून संघाला पर्यायाने भाजपाला अमरावतीत हातपाय पसरायचे आहेत का ? तिथे यशोमती ठाकूरांचे राजकारण उध्वस्त करायचे आहे का ? एकूण परस्थिती पाहता अशीच शंका येते. जिथे जिथे सत्ता मिळत नाही तिथे तिथे भाजप व संघाने धार्मिक अजेंडा बाहेर काढलाय. देशात अवघे दोन खासदार असणारी भाजप धार्मिक ध्रुवीकरणाच्या जीवावरच केंद्रात सत्तेत आली आहे. संघ आणि संघाच्या इतर काही सलग्न संघटना समाजात धार्मिक विष पेरतात आणि त्यातून सत्ता नावाचे पिक काढतात. आणिबाणीच्या काळात इदिरा गांधीचा पराभव झाला पण सांगली जिल्ह्यात कॉंग्रेसचा पराभव झाला नव्हता. त्याच सांगली जिल्ह्यात अशाच पध्दतीने धार्मिक दंगली घडवल्या गेल्या आणि तिथली कॉंग्रेस उध्वस्त करत भाजपाचे आमदार निवडूण आले. जिथे जिल्हा परिषदेला भाजपाचा सदस्य निवडूण येत नव्हता त्या सांगली जिल्ह्यात भाजपाचे चार आमदार व एक खासदार निवडूण आला. विशेष म्हणजे ज्या सलग्न संघटणांनी हे दंगे घडवले त्या संघटना आणि त्यांच्या नेत्यांना कॉंग्रेसी गाढवांनीच पोसले होते. यशोमती ठाकूरांना गाडण्यासाठी हाच प्रयोग अमरावती जिल्ह्यात केला गेला असण्याची शक्यता अधिक आहे.
दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो. 9561551006