Home > Max Woman Blog > गुरुदेव रवींद्रनाथ टागोर

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
X

पश्चिम बंगाल मधील कोलकता येथील पिराली ब्राह्मण कुटुंबात रवींद्रनाथ टागोर यांचा ७ मे १८६१ रोजी जन्म झाला. जन्मजात प्रतिभा लाभलेल्या रवींद्रनाथ यांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली. पुढे भानुसिंह या टोपणनावाने त्यानी काव्य लेखन केले. रवींद्रनाथ यांच्या घराला उच्च शिक्षणाची परंपरा होती. त्यामुळे त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडमधील लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज मध्ये पाठविण्यात आले. परंतु कोणतीच पदवी न घेता ते १८८० साली भारतात परतले. चार भिंतीमधील शिक्षण माणसाला खरं घडवू शकत नाही, या विचारातुन त्यांनी खुल्या हवेतील शांतिनिकेतनचा जग प्रसिद्ध अभिनव प्रयोग केला.

Ravindranath Tagor and mahatma gandhi Courtesy : Social Media

रवींद्रनाथ केवळ कवी, गीतकार, साहित्यिक संगीतकार, चित्रकार, शिक्षणतज्ञ नव्हते तर ते थोर देशभक्त विचारवंत होते. त्यांनी सुरू केलेले संगीत हे त्यांच्या नावाने म्हणजेच रवींद्र संगीत म्हणून ओळखले जाते. भारतीय संगीत, साहित्य यावर त्यांची अमीट छाप पडली आहे. 'गीतांजली'च्या रचनेबद्द्ल त्यांना जगातील सर्वोच्च असा नोबल पुरस्कार १४ नोव्हेंबर १९१३ रोजी देण्यात आला. हा पुरस्कार मिळालेले ते भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिले विजेते आहेत.

albert einstein and ravindranath tagor Courtesy ; Social media

रवींद्र नाथांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना १९१५ साली 'सर' ही पदवी देऊन त्यांचा बहुमान केला. १९१९ साली जालियनवाला बाग हत्याकांड झाले. या नृशंस हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर पदवी त्यांनी ब्रिटिश सरकारला परत करून आपला स्वाभिमान आणि देशप्रेम प्रकट केले. भाषिक अस्मितेमुळे १९७१ मध्ये पाकिस्तान पासून स्वतंत्र झालेल्या बांगलादेशने त्यांचे "आमार शोनार बांग्ला" हे गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे.

rabindranath_and_shantiniketan Courtesy : Social Media

महाराष्ट्र आणि रवींद्रनाथ यांचा विशेष ऋणानुबंध आहे. आपल्या संत साहित्याने रवींद्रनाथ प्रभावित होते. संत तुकाराम महाराज यांचे अभंग त्यांनी बंगालीत अनुवादित केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे प्रेरणास्थान होते. महाराजांवर त्यांनी खंडकाव्य लिहीले आहे. रवींद्रनाथ यांच्यामुळे मराठीतील अनेक साहित्यिक प्रभावित झाले आहेत.

रवींद्रनाथ यांनी चाकोरीबद्ध जीवनाला नवी दिशा दिली. जगात त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. अशी ही थोर विभूती ७ ऑगस्ट १९४१ रोजी अनंतात विलीन झाली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना भावपूर्ण अभिवादन.

-देवेंद्र भुजबळ

+91 9869484800

Updated : 7 May 2020 2:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top