वटपौर्णिमेच्या निमित्ताने ...!
X
आज वटपौर्णिमा तरीही ‘ही’ अजून निवांत झोपलेली आहे. गेल्यावर्षी लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात वटपौर्णिमा आली होती आणि यावेळी ती अंघोळपाणी करून नवीन नऊवारी साडी नेसून, नाकात नथ, गळ्यात अंगभर दागिने, कंबरेला मेखला, पायांत नवीन पैंजण, बोटांत नवीन जोडवी घालून हातात आरतीचे ताट घेऊन मैत्रिणींच्या वाटेकडे डोळे लावून उभी असते. आज मात्र स्वारीची अंथरुणातून उठायचीही चिन्हे दिसत नाहीत. मी झोपेत तिच्या चेहऱ्यावर पसरलेले स्मित कौतुकाने न्याहाळत बसलो होतो. एवढ्यात बाहेरून तिच्या मैत्रिणींचा आवाज आला. “स्वाती, अगं तयार झालीस की नाही? चल लवकर. अगं आज किती उशीर झाला बघ.” त्यांना काय माहिती आठ वाजले तरी स्वाती अजून पहाटेच्या साखर झोपेत आहे ते!
मी तिला हलवून उठवत म्हणालो, “ए स्वाती, ऊठ की गं. मैत्रिणी आल्या बघ तुझ्या. मी लवकर मरावं म्हणून वडाला विनंती करायला जायचं आहे ना तुला?” माझ्या या अनपेक्षित शब्दांनी ती खाडकन ऊठली. आवाजात थोडासा लटका राग आणून ती म्हणाली, “ए, किती छान झोप लागली होती रे! स्वप्नही किती छान पडलं होतं. सकाळी, सकाळी अभद्र बोलून माझ्या झोपेची आणि स्वप्नाची वाट लावलीस बघ!”
“बाहेर बघ, तुझ्या मैत्रिणी नटून थटून वडाला पुजायला निघाल्यात. दारात येऊन तुझी वाट बघायला लागल्या आहेत.”
ती झटकन अंथरुणातून उठत केसबिस सावरत तरातरा बाहेर निघाली. मी तिच्या पाठोपाठ जाऊन काही अंतरावर थांबून पुढे काय होतेय हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने कान टवकारले.
दरवाजात येऊन ती मैत्रिणींना म्हणाली, “ए, तुम्ही जाऊन या गं. मी नाही येणार वड पुजायला.” मैत्रिणी डोळे विस्फारून तिच्याकडे पाहू लागल्या. एकजण सरसावत पुढे येत म्हणाली, “ए शाने, डोळ्यातनं झोप गेली न्हाई का काय तुझी? का खूळबीळ लागलंय तुला?”
स्वाती, “अगं, खरंच मी येणार नाही. तुम्ही जाऊन या.”
“अगं, असं काय करतेस? वर्षातून एकदाच येते ना वटपौर्णिमा? नवऱ्यासाठी तू एक दिवस सुद्धा उपवास करू शकत नाहीस?”
स्वाती, “अगं, खरंच या वर्षीपासून मी वटपौर्णिमाच नव्हे तर नवऱ्यासाठी आणि कुणाहीसाठी कसलाच उपवास करणार नाही.”
“अगं, असं अचानक काय झालं तुला? गेल्यावर्षी तर सर्वांच्या आधी तयार होऊन बसली होतीस की!”
स्वाती, “काही नाही गं. गेल्या वर्षीही वटपौर्णिमेचा उपवास आणि वडाला फेऱ्या मारायला माझ्या नवऱ्याचा विरोधच होता. पण माझ्या हट्टापुढे त्याचं काय चाललं नाही.”
“काय? वटपौर्णिमेच्या उपवासाला तुझ्या नवऱ्याचाच विरोध आहे? अगं, तेच्यासाठीच तर करतीस न्हवं ह्यो उपवास? त्येचं आयुष्य वाडावं, जल्मोजल्मी सात जल्मी ह्योच नवरा मिळावा ह्येच मागनं मागतोय न्हवं वडाकडं आपुन!”
स्वाती, “अहो मावशी, आपण ज्या दोन कारणांसाठी हा उपवास करतो असं आपल्याला वाटतं त्यातला अंतर्विरोध समजावून सांगितला त्याने मला.”
“म्हंजे गं?”
“म्हणजे असं बघा, आपण नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभावं आणि सात जन्म हाच पती मिळावा म्हणून हा उपवास करतो असं म्हणतो की नाही?”
“होय, खरंच आहे ना मग.” तिची मैत्रीण.
“आता माझा नवरा म्हणतो ‘आपल्याला दुसरा जन्मच असत नाही. जे काय जगायचं ते या एकाच जन्मात. नवरा बायको असू द्या नाहीतर इतर नाती. सर्व नात्यांतील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, राग, लोभ, भांडण सगळं याच जन्मात करायचं. या सृष्टीत कोणत्याच सजीवाला पुनर्जन्म नाही. पुनर्जन्माच्या या गोष्टींना विज्ञान मान्य करत नाही.”
“अगं, आसं तुझं न्हवरा म्हणत आसंल. पर आमी पुनर्जलम मानतोय तेच काय?” मावशी.
“अहो मावशी, क्षणभर पुनर्जन्म मान्य जरी केला तरीही आपल्या उपवासातून ज्या दोन गोष्टी आपण मागतोय त्या एकाचवेळी पूर्ण होऊ शकत नाहीत.”
“म्हंजे?”
“समजा हाच नवरा पुढच्या जन्मीही हवा असेल तर तो आणि आपण एकाच योनीत आणि तेही माणूस म्हणूनच जन्माला आलो पाहिजे. म्हणजे या जन्मात दोघेही माणूस आहोत म्हणून आमचे लग्न झाले. पुढच्या जन्मी दोघेही माणूस म्हणूनच जन्माला आलो पाहिजे. कारण तर कोणत्याही सजीवांची लग्नं होत नाहीत. आणि आपला धर्म तर म्हणतो चौऱ्यांशी लक्ष योनी फिरून झाल्यावर एकदा माणसाचा जन्म मिळतो. मग पुढचा जन्म आपण कोणता जीव असू? दोघंही एकाच जातीतील जीव असी का? हे तर आपल्याला काहीच माहिती नाही. आणि दोघं वेगवेगळे प्राणी झालो तर?”
‘अय्या, खरंच की गं!” आणखी एक मैत्रीण
“तर आता हे वादाचे मुद्दे क्षणभर बाजूला ठेऊ. समजा आम्हा दोघांनाही पुढचा जन्म माणसाचा मिळाला तरीही आपल्याकडे साधारणतः नवरा हा वयाने मोठा असतो आणि बायको लहान. बरोबर की नाही?”
“व्हय, बरोबरच हाय की.” मावशी
“मग पुढच्या जन्मीही हाच नवरा मिळण्यासाठी पुढच्या जन्मी तो लवकर जन्माला आला पाहिजे. त्यासाठी या जन्मात त्याचा लवकर मृत्यू झाला पाहिजे. आपण या उपवासात तर त्याला आपल्यापेक्षा दीर्घ आयुष्य मागतो. तसं झालं तर आपला मृत्यू आधी होणार म्हणजे पुढच्या जन्मी आपण लवकर जन्माला येणार. अर्थात त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या होणार. म्हणजे आपल्या लग्नाची शक्यता नाही. थोडक्यात काय एकतर त्याला दीर्घ आयुष्य मिळू शकतं किंवा तो पुढच्या जन्मी आपल्याला नवरा म्हणून मिळू शकतो.”
आता मावशीचा चेहरा बदलला, “खरंच की गं बया! एवडी वर्सं आमी उपवास करतोया खरं आसा इचारच कदी केला न्हाई.”
एवढ्यात आणखी एका मैत्रीण तावातावाने पुढे आली, “ते काहीही असू दे. हे तुझ्या नवऱ्याचं तर्कट विज्ञान झालं गं! पण श्रद्धा म्हणून काही असते की नाही? सगळ्याच गोष्टी तुमच्या त्या कार्यकारणभावाने विचार करून थोडीच चालणार आहे. माणसाला जसा मेंदू आहे तसं मनही आहे. बुद्धी आहे तशा भावनाही आहेत. आणि श्रद्धा या भावनेचा विचार करतात बुद्धीचा नाही.”
“काहीअंशी खरं आहे तुझं. पण एक लक्षात घे. मेंदू आणि मन वेगळे नाहीत. मन नावाचा कोणताही वेगळा अवयव आपल्या शरीरात नाही. तो मेंदूचाच एक भाग आहे. आणि श्रद्धा जपायला कुणी विरोध केलाय? पण आपल्या श्रद्धा चुकीच्या समजावर आधारित आहेत हे लक्षात आल्यावर त्या बदलल्याही पाहिजेत. आणि त्या आपण बदलल्याची इतिहासात उदाहरणेही आहेत. जसं, पूर्वी नवरा मेल्यावर पत्नीने सती जायची प्रथा होती. पुढे राजाराम मोहन रॉय आणि काही इंग्रज अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांतून ती चुकीची प्रथा बदलली. सुरवातीला काही परंपरावाद्यांनी विरोध केला. पण आज ती अन्याय्य प्रथा नामशेष झाली आहे.”
“तेही खरंच म्हणा!” एक मैत्रीण काहीशी सहमती दर्शवत म्हणाली.
स्वातीने पुढचा गिअर टाकला, “अगदी अलीकडचं बोलायचं तर या मावशींना जेव्हा मासिक पाळी आली असेल तेव्हा मासिक पाळी हा शब्दही उच्चारला जात नव्हता. मासिक पाळीला त्या काळात विटाळ म्हंटले जाई. अर्थात अजूनही काहीजणी म्हणतात ते थोडं बाजूला ठेऊ. पाळीच्या चार दिवसांत स्त्रिया बाहेरच्या खोलीत बसायच्या. स्वयंपाकाशिवाय घरातील सर्व कामे करवून घेऊनही आपल्याच कुटुंबात त्यांना अस्पृश्यपणाची वागणूक दिली जायची. आज ही परिस्थिती बदलली आहे. आज स्वत:च्या आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घेऊन स्त्रिया सर्वत्र मुक्तपणे वावरताना दिसतात. अर्थात देव आणि धार्मिक कामांबाबत आजही पाळीकडे विटाळ म्हणूनच पाहणाऱ्या अनेकजणी हेत. तरीही पाळीबाबतच्या पूर्वीच्या अनेक श्रद्धा या खरंतर अंधश्रद्धा होत्या हे आज सर्वमान्य झाले आहे. म्हणजेच आपण काळानुसार आपल्या श्रद्धा बदलतो. खरंतर त्यामुळेच धर्म प्रवाही राहतो.”
“आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या व्रतातील अंधश्रद्धा आपण सोडून दिल्या पाहिजेत. असंच ना?” स्वातीचं म्हणणं पटू लागलेली आणखी एक मैत्रीण पुढे आली.
“हो अगदी खरं.” दुसरी तिला साथ द्यायला पुढे झाली.
“आता या व्रताला आधुनिक विज्ञानाशी सुसंगत दाखवण्यासाठी काहीजण महिलांना ऑक्सिजन मिळणे, त्यानिमित्ताने घर बाहेर पडण्याची संधी मिळणे, सात जन्म म्हणजे चौऱ्यांशी वर्षे अशा किंवा यासारख्या काही गोष्टी जोडतात. त्यांचीही कीव येते. पूर्वीच्या काळात अशी लटकी समर्थनं ठीक होती. आजच्या काळात स्त्री म्हणून आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर ती थेट करावी ना! त्यासाठी कुण्या व्रतामागे लपण्याची काय गरज?”, स्वाती.
“अगं, गम्मत म्हणजे माझी एक मैत्रीण शहरात राहते. त्यांच्याकडे कुठला आलाय वड? त्या सरळ बाजारात जातात वडाची फांदी विकत आणतात. ती कुंडीत लावतात आणि त्यांच्या कॉलनीतल्या बायका त्या फांदीभोवती फेऱ्या मारतात.” एक मैत्रीण तिचा अनुभव सांगू लागली.
"आता यांना काय म्हणावं? यातली खेदाची गोष्ट म्हणजे शहरातल्या या जवळजवळ सर्व मैत्रिणी चांगल्या शिकलेल्या असतात. आता या शिक्षणाने खरंच शहाण्या झाल्या म्हणाव्यात काय?”, स्वाती.
“हे मात्र खरं आहे हं, ‘शिक्षणाने माणसाला लिहा वाचायला येतं पण विचार करायला येईलच असं नाही.” विचार करू शकणाऱ्या एका मैत्रिणीने आपले परखड मत नोंदवले.
“अगदी सत्यवान आणि सावित्रीच्या मूळ गोष्टीकडे आजच्या संदर्भात पहायचं म्हंटलं तरीही यमाकडे ‘राज्य गेलेल्या’ आणि ‘अंध असणाऱ्या’ आपल्या सासऱ्याला ‘सिंहासनावर बसून’ ‘नातवंडांचे तोंड पाहण्याचं सुख’ लाभू देत’ असा वर मागणारी सावित्री बुद्धिमानच म्हणायला हवी. तिच्या या बुद्धिमतेचं स्मरण करायचं म्हणून वडाला फेऱ्या मारून आपण आपल्या कोणत्या बुद्धिमतेचं दर्शन घडवतो?” स्वाती आता नकळत बुद्धीवादी झाली होती.
“आता तुझी एक एक गोष्ट आम्हाला पटायला लागली आहे. आम्ही तर असा कधी विचारच केला नाही. तरीही श्रद्धा म्हणून आम्हाला काही करायचं असेल तर?” श्रद्धाळू मनाच्या एका मैत्रिणीने आपली शंका विचारली.
“अगं, मीही वटपौर्णिमेनिमित्त काहीतरी करणारच आहे. त्यासाठी काल आम्ही एक छान रोप आणलंय. आज आम्ही दोघं मिळून ते झाड लावणार आहोत. म्हणजे एका बाजूला अंधानुकरण न करता व्रत केल्याचा आनंद आणि दुसरीकडे पर्यावरणास हातभार लावल्याचे समाधान!” स्वातीने एका बाजूला व्रतातून बाहेर पडत दुसरीकडे कालसुसंगत पर्यायही दिला.
“अगं, खरं आहे तुझं. नाहीतरी असे काहीतरी सकारात्मक पर्याय दिल्याशिवाय समाजाच्या मानसिकतेत बदल होणार नाहीत. मीही आमच्या यांना आताच रोप आणायला पाठवते. यावर्षी एवढी तयारी केली आहे तर वडाला शेवटच्या फेऱ्या मारते आणि संध्याकाळी ह्यांच्यासोबत अंगणात छान रोप लावून त्या रोपासारखं आमचं प्रेम बहरावं अशी त्याच्याकडे प्रार्थना करते.”
स्वातीच्या काही मैत्रिणींना तिचा बदलेला हा विचार पटलेला दिसला. तर काहीजणी तिला वेड्यात काढत एकमेकीशी पुटपुटतताना दिसल्या. त्या सर्वजणी हातातल्या ताटासह गावाबाहेरच्या वडाच्या दिशेने निघाल्या.
स्वातीने घेतलेला हा पुढाकार पाहून माझंही मन भरून आलं. गेल्यावर्षी तिने केलेल्या वटपौर्णिमेच्या उपवासाचा उपहास न करता मी तिच्याशी संवाद केला होता. वर्षभर अधूनमधन या आणि अशा विषयांवर आमचे बोलणे व्हायचे. त्यातूनच यावर्षी तिने स्वतः यावर्षी परिवर्तन स्वीकारले होते. नुसतेच स्विकारले नव्हते तर ते घडवून आणण्यासाठी ती कृतीशील पुढाकार घेत होती. ‘संवाद हा परिवर्तनाचा एकमेव मार्ग आहे’ हेच खरे!
(२००४ साली माझे लग्न झाले. २००५ सालच्या घटनेवर आधारित हा काहीसा काल्पनिक संवाद)
-कृष्णात स्वाती
८६००२३०६६०
krishnatswati@gmail.com