Home > Max Woman Blog > रेखा ओ रेखा…

रेखा ओ रेखा…

रेखा-अमिताभ बच्चनची जोडी कशी तुटली? रेखाच्या आयुष्यात अमिताभ बच्चन खरचं महत्त्वाचे आहेत का? कसा आहे रेखाचा ६६ वर्षांचा जीवनप्रवास...? रेखा कशी बनली बॉलिवूडची नंबर 1 अभिनेत्री जाणून घ्या ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याकडून...

रेखा ओ रेखा…
X

अमिताभ बच्चन हीच रेखाची जीवनरेखा आहे असे मानणे, हा तिचा घोर अपमान आहे. रेखाच्या आवाजात आणि डोळ्यांत तिचे सर्व आकर्षण सामावलेले आहे. तिच्या सौंदर्यात हेमाचा गुळगुळीतपणा नाही. त्यात तिखटपणा, झणझणीतपणा, दिलखेचकपणा आहे. रेखा ही जेमिनी गणेशन हा तामिळी नट आणि पुष्पवल्ली या तेलुगू अभिनेत्रीची मुलगी. रेखाचा जन्म झाला, तेव्हा या दोघांचे लग्न झालेले नव्हते. रेखा लहान असेपर्यंत जेमिनीने आपण तिचे पिता असल्याचे मान्य केले नव्हते. ही वेदना तिने सोसली. आर्थिक तंगी असल्यामुळेच रेखाला अभिनय क्षेत्राकडे वळावे लागले, हे लक्षात घेतले पाहिजे.

रेखा व तिच्या पूर्वीच्याही जमान्यातील अनेक अभिनेत्री या गरिबीमुळे सिनेमात आल्या होत्या. खरे तर त्यांच्या आई-वडिलांनीच त्यांना या क्षेत्राकडे ढकलले होते. रेखाचा बालनटी म्हणून पहिला चित्रपट होता 1966 सालचा तेलुगू चित्रपट 'रंगूला रत्नम'. 1969 मध्ये 'ऑपरेशन जॅकपाॅट नल्ली सीआयडी 999' या कन्नडपटात तिने काम केले होते. 'अंजाना सफर' हा तिचा पहिला चित्रपट. तो अत्यंत भयंकर होता! या चित्रपटाचे दिग्दर्शक राजा नवाथे(गुमनाम, मनचली) होते. आणि विश्वजीत तिचा नायक होता. बहुधा त्या दोघांनीच आणि काही इतर मोजक्यांनीच तो चित्रपट पाहिला असावा! हा चित्रपट गाजला, तो त्यातील एक वादग्रस्त दृश्य रेखाच्याही नकळत घेण्यात आल्यामुळे.

रेखाला त्यावेळी हिंदी येत नव्हते. तंत्रज्ञ आणि सहकलावंतांशी कशा पद्धतीने, कोणत्या भाषेत संवाद साधावा हेच तिला कळत नव्हते. तिची आई आजारी होती आणि ती तिच्याजवळ नव्हती. लहान वयात काम करणाऱ्यांना कोण कोणत्या परिस्थितीशी झुंजावे लागत होते हे पाहिले, तर त्यांच्याबद्दल करूणा दाटून येते... रेखा अल्पवयात मुंबईला आली. मी दहावीत असताना पुण्यात पेरूगेट भावे स्कूलजवळ उजव्या कोपऱ्यात रेखाच्या 'सावन भादों' या चित्रपटाचे बॅनर लागले होते. ते बघून, हा चित्रपट न पाहिल्यास आपली प्रगती होणार नाही, या भावनेने मी ताबडतोब तो पाहून टाकला! नवीन निश्चल नुकताच फिल्मी इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडला होता. तो शिकत असताना इन्स्टिट्यूटच्या बाहेरच्या उजव्या बाजूला जो बसस्टॉप आहे, तेथे तो अनेक वेळा उभा असल्याचे मी बघितले होते.

या चित्रपटात आपल्याला रेखाबरोबर काम करावे लागणार हे कळल्यानंतर, 'कोण रेखा?' असा सवाल त्याने केला होता. त्याला तिच्याबरोबर काम करायची बिलकुल इच्छा नव्हती. पण मुळात तेव्हा नवीन निश्चल तरी कोण होता? पण काही लोकांना अकारण माज असतो, त्यातलाच हा प्रकार. त्यानंतर नवीनची फारशी प्रगती झालीच नाही, उलट रेखा नंबर एकची अभिनेत्री झाली! असो. कमालीचे वाईट्ट चित्रपट केवळ गाण्यांमुळे, चांगले होते असे वाटण्याचा तो काळ होता! मला आठवते, बरीच वर्षे रेखाबद्दल फिल्मी नियतकालिकांतून अतिशय वाईट पद्धतीने लिहून यायचे. तिचा रंग, तिचे रूप, तिची फिगर, तिचे कपडे यावरून वाट्टेल ते लिहून येत असे. मात्र 'दो अंजाने' या चित्रपटात प्रथम ती मनात ठसली. अमिताभ बच्चनबरोबरचा तिचा हा चित्रपट बरा होता. प्रथम या चित्रपटासाठी मुमताजला विचारण्यात आले होते, पण ती या क्षेत्रातून निवृत्त होत असल्यामुळे, तिने नकार दिला. रोल नकारात्मक असल्यामुळे शर्मिला टागोरने तो स्वीकारला नाही. त्यापूर्वी 'नमकहराम' या चित्रपटात अमिताभ व रेखा होते, पण ते कोणत्याही दृश्यात त्यात एकत्र दिसले नव्हते.

अमिताभबरोबर तिने जे जे चित्रपट केले, त्यापैकी या एकमेव चित्रपटात रेखाने निगेटिव्ह स्वरुपाची भूमिका केली होती. अर्थात भूमिका नायिकेची होती, पण ती होती संधिसाधू पत्नीची. ती भूमिका तिने उत्तमरीत्या साकारली. दुलाल गुहांसारखा बुद्धिमान माणूस या चित्रपटाचा दिग्दर्शक होता. या चित्रपटात इथून तिथून मिथुनने एक छोटी भूमिका केली आहे. चित्रपटाचा निर्माता टिटो दोस्त असल्यामुळे, त्याला ही भूमिका मिळाली. 'घर' या चित्रपटातील बलात्काराची शिकार झालेल्या नायिकेची भूमिका रेखाने ताकदीने साकारली. अत्याचार झाल्यानंतरची अवस्था आणि त्यातून पडण्यापर्यंतचा प्रवास रेखाने आपल्या अभिनयातून सूक्ष्मपणे उलगडून दाखवला.

'घर' चे दिग्दर्शक माणिक चटर्जी असले, तरी त्यांना अपघात झाल्यामुळे हा चित्रपट पूर्ण केला गुलजारने. चित्रपटात डॉक्टर प्रशांतची भूमिका करणाऱ्या दिनेश ठाकूरने या चित्रपटाचे लेखनही केले होते. दिनेश हा कसलेला रंगकर्मी. फिल्म सोसायटीच्या वांद्रे येथील न्यू टॉकीजमधील शोच्या वेळी तो बाहेर सिगारेट फुकत उभा होता. त्यावेळी त्याच्याशी पाच मिनिटे मी बोललो होतो. त्यावेळी पृथ्वी थिएटर, ग्रँट रोडचे तेजपाल थिएटर (त्याच्या शेजारीच माझा मामा राहायचा)मध्ये होणार्यात वगैरे नाटकांतून दिनेश धमाल करत होता. ही गोष्ट असेल चाळीस वर्षांपूर्वीची. दिनेशच्या लेखनामुळे 'घर' या चित्रपटात अस्सलपणा दिसतो. 'घर' नंतर रेखाला अभिनेत्री म्हणून गंभीरपणे घेतले जाऊ लागले. त्या वयात रेखाने विनोद मेहराशी ( हा एक नियतीने तिच्याशी केलेला क्रूर विनोद!) लग्न केले होते. त्यांचा विवाह कोलकाता येथे झाला. त्यास विनोदच्या आईची मंजुरी नव्हती. रेखा जेव्हा आपल्या सासूचे आशीर्वाद घ्यायला तिच्या घरी गेली, तेव्हा सासूने तिला ढकलून दिले. तिचा अपमान केला आणि तिला अक्षरश: चपलेने मारले, असे ऐकले होते. रेखाने हे सगळे कसे सहन केले असेल, असे वाटते.

पुण्यात 'अनुराग' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी विनोद मेहरा, अशोक कुमार आणि मौसमी चटर्जी हे पुण्यात 'स्वस्तिक' चपलाबूट बनवणाऱ्या कंपनीचे मालक वसंतराव नाईक वैद्य या उद्योगपतींच्या माॅडेल कॉलनीतील बंगल्याकत आले होते. 'सुनरी पवन' हे गाणे तेथे शूट झाले होते. हे शूटिंग मी पाहिले आहे. त्यात मास्टर सत्यजितदेखील होता आणि तोही तिथे आला होता. त्यावेळी अधूनमधून विनोद हातात क्रिकेट बॅट घेऊन, हवेत स्ट्रोक मारत होता, हे आजही मला प्रत्यक्ष पाहिले असल्याचे आठवते. याच बंगल्यात अमिताभ आणि जया भादुरी यांचे स्वागत व आतिथ्य वसंतरावांनी केल्याचे स्मरते. 'अभिमान' चित्रपट रिलीज झाल्यानंतर अमिताभ आणि जया पुण्यात आले असताना, त्यांच्याकडे ते भोजनास आले होते. तेव्हा, आयुष्यात मी अमिताभ बच्चनला पाहिले... तर पुढे अनेक वर्षांनी रेखाचा मुकेश अग्रवाल या उद्योजकाची विवाह झाला. पण तो निराशाग्रस्त आणि संशयी होता. विवाहानंतर सातच महिन्यांनी त्याने आत्महत्या केली. त्याबद्दल मीडियाने रेखालाच दूषणे दिली. हे सर्व तिने सोसले, मूकपणे सोसले. हॄषीदांनी रेखाकडून 'खूबसूरत'मधून खूप चांगले काम करून घेतले. त्यातल्या रेखाच्या दोन वेण्या लक्षात राहतात. त्यांच्याच 'झूठी'मध्ये सुद्धा रेखाने दोन वेण्या घातल्या आहेत. दोन्ही चित्रपटांत रेखाने उत्कृष्ट काम केले, हलक्याफुलक्या ढंगाचे. 'खूबसूरत' मध्ये रेखाने प्रथम एक गाणे म्हटले. त्यानंतर 'अगर तुम ना होते' या चित्रपटातही रेखाने गाणे गायले होते. चरित्र अभिनेता डेव्हिड तेव्हा सिनेमातून निवृत्त होऊन कॅनडाला स्थायिक झाला होता. मात्र सुट्टीवर भारतात आला असताना 'खूबसूरत'चे शूटिंग सुरू होते. हॄषीदांच्या आग्रहास्तव त्याने त्यात पाहुण्या कलावंताची भूमिका केली.' उमराव जान' मध्ये रेखाने आपल्या भूमिकेत अक्षरश: प्राण ओतले होते.

सिनेमाचे बजेट टाइट असल्यामुळे त्यातली वस्त्रे आणि ज्वेलरी रेखाने स्वतःचीच आणली होती. त्या सुमारास अमिताभने रेखाबरोबर चित्रपट करणे थांबवले होते. अशा काळात 'खूबसूरत' आणि 'उमराव जान' हे चित्रपट रेखाने स्वबळावर यशस्वी करून दाखवले. 'नमकीन' हा चित्रपट सुरेख होता. त्यातील निमकीची भूमिका शर्मिलाने केली असली, तरी सर्वप्रथम त्यासाठी रेखाला विचारण्यात आले होते. रेखाने हा चित्रपट स्वीकारला असता, तर तिने अधिक चांगले काम केले असते. 'इजाजत' मध्ये रेखाने, इतर अनेक चित्रपटांत ती करायची, त्याप्रमाणे अदर वुमनचा रोल केलेला नाही. तिने पत्नीचा रोल केला आहे. या चित्रपटासाठी नायक म्हणून संजीवकुमारची प्रथम निवड झाली होती. अनुराधा पटेलचा रोल प्रथम स्मिता पाटीलला ऑफर झाला होता. दुर्देवाने चित्रपट फ्लोअरवर गेला, तोपर्यंत या दोघांचेही निधन झाले. होते.' इजाजत' हा चित्रपट आर के गुप्ता यांनी निर्माण केला. विनोद खन्ना, हेमा मालिनी आणि रेखाला घेऊन 1979 मध्ये यश जोहर हा चित्रपट निर्माण करणार होते. परंतु विनोद खन्नाने तोपर्यंत सिनेमातून निवृत्ती घेतली. त्यानंतर नवीन निर्माते आले आणि त्यांनी 1985 साली शत्रुघ्न सिन्हाला घेण्याचे ठरवले. गुलजारने रास्तपणे हा प्रस्ताव नाकारला आणि नसिरुद्दीनला घेतले. संजीवकुमारचे निधन झाले नसते, तर गुलजारने 'इजाजत' साठी त्यालाच साइन केले असते, हे नक्की. परंतु जे झाले ते चांगलेच झाले.

नसीर, रेखा आणि अनुराधा पटेल यांनी चित्रपटाचे सोने केले. मुकद्दर का सिकंदर, बसेरा, एक ही भूल, जीवनधारा, खून भरी मांग हे रेखाचे अभिनेत्री म्हणून चांगले चित्रपट. 'जुबेदा'तील रेखाची मंदिरा देवी किती हाडामासाची वाटली! बासू भट्टाचार्य यांच्या 'आस्था'मध्ये रेखाने एका विवाहित स्त्रीची भूमिका केली, जी नंतर वेश्या बनते. अशी भूमिका स्वीकारण्याचे धाडस तिने दाखवले, हे साॅलिड होते. गोविंद निहलानीचा 'विजेता' हा युद्धपट होता. पण तो वेगळा होता. यात रेखाने महाराष्ट्रीयन आईची भूमिका केली होती. तिचा पती पंजाबी आहे, दोघांत मतभेद आहेत. आणि त्यामुळे मुलगा अंगद म्हणजेच कुणाल कपूर हा दिशाहीन असतो. तो इंडियन एअरफोर्समध्ये फायटर पायलट बनतो, अशी ही कथा. परवाच मी ओव्हल मैदानामधून जात असताना, मला 'विजेता'ची आठवण झाली. कारण त्यामध्ये रेखा ज्या फ्लॅटमध्ये बसून संगीतसाधना करत असल्याचे दृश्य दाखवले आहे, तो फ्लॅट ओव्हलसमोरच्या एका बिल्डिंगमधला आहे.

'कलयुग'ची कथा म्हणजे महाभारताचे आधुनिक काळातील रूप. या चित्रपटातून सुप्रिया पाठक प्रथम चित्रपट क्षेत्रात आली. चाळीसेक वर्षांपूर्वी मुंबईच्या आकाशवाणी थिएटरमध्ये फिल्म फेस्टिवल झाला होता, त्यास मी रोज जात असे. त्यावेळी पंकज कपूर आणि सुप्रिया हे एकत्र चित्रपट बघायला येत असत. 'कलयुग'मध्ये रेखाचे वेधक काम आहे. त्यात रेखा, उर्मिला मातोंडकर आणि व्हिक्टर बॅनर्जी आहेत. हे तिघेही 2003 सालच्या 'भूत'मध्ये पुन्हा एकत्र दिसले. या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळच्या दिवसांत राज बब्बरचा कार अपघात झाला होता. पण त्याने सिनेमाची गरज म्हणून प्लास्टर काढून, वेदना होत असतानाही काम केले होते. श्याम बेनेगल यांना त्यात शबानाला घ्यायची इच्छा होती, परंतु शशीने शबानाबरोबर काम करणे थांबवले होते. कारण त्या दोघांच्या मैत्रीबद्दल काहीबाही छापून येत होते. त्यामुळे जेनिफरबरोबरचे शशीचे संबंध दुरावले होते. म्हणून त्याने रेखाचे नाव सुचवले. त्या सुमारास अमिताभ-रेखा जोडी फुटली होती. 'खूबसूरत' च्या यशामुळे रेखाला अर्थपूर्ण चित्रपटात काम करण्याची पुन्हा एकदा इच्छा झाली होती. 'कलयुग' आणि 'विजेता' प्रमाणेच रेखाने शशीच्या 'उत्सव' मध्येही काम केले.

या चित्रपटात शशी अमिताभला घेणार होता, परंतु त्यात रेखा असल्यामुळे त्याने ही ऑफर नाकारली. रेखाच्या सर्व चित्रपटांचा उल्लेख करणे वेळेअभावी शक्य नाही. परंतु रेखा फिटनेसवर लक्ष देणारी मागच्या पिढीची अभिनेत्री आहे. त्यावेळी फिटनेसकडे नटनट्या लक्ष देत नसत. तिचे फिटनेसवरचे व्हिडिओही गाजले आहेत. उतारवयातही चांगले दिसू शकतो, तब्येत राखू शकतो हे रेखाने दाखवून दिले आणि त्याबद्दल स्त्रियांमध्येही जागरूकता निर्माण केली. रेखा गातेही बरी. 'वारिस' चित्रपटासाठी स्मिता पाटीलकरिता तिने आपला आवाज(डबिंग) दिला. 'आखरी रास्ता' या चित्रपटासाठी रेखाने श्रीदेवीकरिता डबिंग केले. रेखा मिमिक्री जबरी करते. मात्र अनेक कलावंतांप्रमाणे तिने कित्येक बकवास चित्रपट स्वीकारले. खरे तर त्याची गरज नव्हती, पण शेवटी तो तिच्या चॉइसचा विषय. मात्र रेखाला बघितले की, 'इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों है' असेच म्हणावेसे वाटते. उमराव जान, उत्सव या चित्रपटांतून रेखा नावाच्या मदालसेचे सर्वोत्तम दर्शन घडले. रेखाने हॉलीवूडपटांत काम करायला हवे होते, असे राहून राहून वाटते. रेखा आज 66 वर्षांची झालीये, हे खरंच की काय! आज 10 ऑक्टोबर. रेखाचा वाढदिवस. तिला मनापासून शुभेच्छा! सौंदर्याचा आणि अफलातून जीवनाचा हा सिलसिला असाच पुढे चालत राहो!.

हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार

Updated : 10 Oct 2021 8:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top