“बेटा कशी आहेस?...” मानवी तस्करी विरोधी दिनानिमीत्त कॅबीनेट मंत्र्यांचा पिडीतेला फोन
X
मानवी तस्करी हा असा एक घृणास्पद अपराध आहे जो असमानता, अस्थिरते मुळे वाढत जातोय. हे तस्कर माणसाच्या कठीण परिस्थितीचा फायदा घेत पिडीतांना मुलभूत अधिकारांपासून वंचीत ठेवतात. लहान मुलं, युवती, प्रवासी हे अशा घटनांना प्रामुख्याने बळी पडतात. अशाच एका मानवी तस्करी पिडीत लारा ला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी फोन करुन संवाद साधला.
हा संवाद त्यांच्याच शब्दात....
जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवसाचं औचित्य म्हणून नाही पण गेले कित्येक दिवस सहज बोलावंस वाटलं म्हणून मानवी तस्करी पिडीत लारा ला फोन लावला. लारा ची संघर्षकथा मी ऐकून होते. मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून मी राज्यभर फिरतेय, लोकांच्या समस्या जाणून घेतेय, पण काही समस्या, काही माणसं, त्यांची दुःखं मनात घर करून राहतात.
“बेटा.. बोल.. कशी आहेस? राजा, काही अडचण असेल तर सांग. मोठ्या संकटावर विजय मिळवून आली आहेस, तुला बोलायचं होतं ना?” लारा ला फोन लावताच मी जुनीच ओळख असल्यासारखं बोलायला सुरूवात केली आणि पलिकडून लारा बोलू लागली. आधी तिला फोन केला होता पण नेटवर्क नसल्याने बोलणं होऊ शकलं नाही, मी परत फोन करते सांगितलं म्हणून लारा दोन तास फोन हातात घेऊनच बसली होती. फोन वर आमचा माय-लेकीचा संवाद असतो तसा संवाद सुरू झाला.
लारा आपली गोष्ट सांगू लागली.. “मँडम, मी आता छान आहे, माझ्या घरी आहे आईसोबत. अभ्यास करतेय, काँलेजमधे आहे. रेस्क्यू करणार्या संस्थेने समजून घेतलं, बळ दिलं. शेल्टर होम मधे ही सगळ्या सुविधा होत्या, तिथे असताना आपण आयुष्यात काही तरी करु शकतो असं वाटलं, शिक्षण सुरु झालं.”
खुप दिवसांनी आई लेकीचं बोलणं व्हावं तसा संवाद सुरु होता.. लाराची कहाणी ऐकून मन कालवलं.
तिला सावरण्यासाठी, धीर देण्यासाठी, आश्वस्त करण्यासाठी तिला म्हटलं की मला तुझ्या संघर्षाच कौतुक वाटतं, तू खुप सहन केलंस.. पण आता बाहेर पडलीस हे छान झालं. तु सांग काय बदलायला हवं? माझ्या हाती आहे ते सगळं करेन मी...
माझं बोलणं ऐकून लारा धीराने म्हणाली, “गरीबीचा फायदा घेणारे लोक असतात मँडम,मी एकटी पडले होते, कुणाला सांगता आलं नाही आणि मला अडकवलं यात. पण कुठलेही शिक्के न मारता समजून घेणारे ही असतात, अशा लोकांनीच मला बाहेर काढलं. मॅडम, शेल्टर होम मधे मुलींना वाटतं आपल्याला नव्याने आयुष्य सुरु करता येईल, विश्वास मिळतो. तिथे थोडे काउन्सिलिंग वाढवा मँडम, त्यांच्याशी बोलून बरं वाटतं, ते समजून घेतात. अल्पवयीन मुलींना सपोर्ट करा आणि हो.. मला नेहमी वाटायचं बदल करु शकणारऱ्या व्यक्तीशी बोलावं, आज खुप हँप्पी आहे मी..”
“बघ, आज थेट माझ्याशीच बोलते आहेस. नक्की अजुन काउन्सिलर वाढवू आम्ही. तु आता नीट अभ्यास कर. मी सोबत आहे तुझ्या, हा माझा नंबर आहेच आता तुझ्याकडे, काही अडचण आली तर सांग. अच्छा, काळजी घे” असं बोलून मी संवाद संपवला खरा, पण फोन ठेवताच मी गलबलून गेले. किती झेललं असेल या पोरीने. तिच्या आयुष्यात जे घडलं ते इथे पूर्णपणे सांगू शकत नाही पण तिच्या विश्वासाचं माझ्यावर दडपण आलं. आपल्याला मिळालेलं पद समाजाच्या या घटकासाठी कामी यायला हवं.
हा सगळा संवाद वाचून, कोण लारा? काय झालं होतं? आणि का? असे अनेक प्रश्न पडले असतील ना..? तर आधी लाराची गोष्ट.. खरं तर लाराचा प्रवासच म्हणायला हवा ‘प्रवास स्वातंत्र्याकडे, मुक्त आयुष्य जगण्याकडे’
मुंबईत पालिकेच्या हाँस्पिटलमधे सफाई कामगार असणारे वडील 2004 मधे वारल्यानंतर लाराच्या कुंटुंबाच्या दुदैवाचा फेरा सुरु झाला. अशिक्षित आईकडे उदरनिर्वाहाचं ठोस साधन नव्हतं. आई, भाऊ, बहीण आणि ती गरीबीशी संघर्ष करत होते. 12 वर्षांची झाली असताना तिच्या कोवळ्या वयात हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेत, मदत करण्याच्या बहाण्याने एकाने तिला देहविक्रीत ढकललं. जन्मप्रमाणपत्र किंवा इतर काहीच ओळखपत्र नसलेली लारा नरक यातना भोगत राहिली. काही वर्षांनी स्वयंसेवी संस्था,पोलिस, न्यायपालिका या यंत्रणेमुळे तिने पुन्हा मोकळा श्वास घेतला. नव्याने आयुष्य सुरु करण्यासाठी तिला आत्मविश्वास देत बर्थ सर्टिफिकेट पासून महाराष्ट्र सरकारची मनोधैर्य योजनेची मदत मिळवून देत पुन्हा शिक्षण सुरु करण्यात आलं. 2019 पासून न्यायलयात खटला सुरु असून आता तिचे आयुष्य नासवणारे अटकेत आहेत. विज्ञान शाखेत शिकणाऱ्या लाराला खरंतर आता वडिलांच्या जागी सफाई कामगाराची नोकरी मिळू शकते पण नुकतचं विशीत पदार्पण केलेल्या या धडाडीच्या तरुणीला नर्स होउन हाँस्पिटलमधे सेवा करायची आहे.
दरवर्षी, देशाच्या नव्हे जगाच्या काना-कोपऱ्यातल्या लारा सारख्या अनेक अनामिक मुली या काळ्या जगात ढकलल्या जातात. मानवी हक्कांची पायमल्ली करणारे ‘मानवी तस्करी’ हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक वेगाने वाढणारे गुन्हेगारी विश्व आहे. आपल्या देशात दारिद्रय, शिक्षणाचा अभाव, मोठं कुटुंब अशा अनेक कारणाने पिडित या जाळ्यात अडकतात. लहान मुलं, अल्पवयीन मुली, महिला कुठल्याही वयात हिंसेला बळी पडतात. पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ या देशांच्या सीमेला लागून असलेली राज्य, पश्चिम बंगाल, दक्षिणेकडच्या काही राज्यातील महिलांना यात ओढलं जातं, तर विक्री किंवा व्यवसायाचं प्रमुख ठिकाण मुंबई, दिल्ली सारखी महानगरं आहेत. देशांतर्गत आणि परदेशातील श्रीमंत देशात ही तस्करी होत असते. देहविक्री सारखे लैंगिक शोषण, गुलामी, भीक मागायला लावणे, बळजबरीने लग्न लावणे, लहान मुलांची विक्री ते अवयव काढून घेणे अशा अनेक कुकर्मासाठी मानवी तस्करी केली जाते. तस्करीत ओढल्या जाणाऱ्यांमधे महिला 49% तर अल्पवयीन मुली 23% आहेत. तस्करीच्या कारणांमधे प्रमुख कारण शारिरीक, लैगिक शोषण (59%) असून त्यापाठोपाठ गुलामी, बळजबरी कामासाठी (34%) ठेवणे आहे.
सगळं जगच या तस्करीच्या विरोधात लढत आहे. संयुक्त राष्ट्राकडून 30 जुलै हा दिवस जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मानवी तस्करीचे बळी ठरलेल्या, लैगिंक अत्याचाग्रस्त पिडितांना संधी मिळाली तर ते फिनीक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊ शकतात याचं उत्तम उदाहरण असलेल्या लाराशी राज्याची महिला व बाल विकास मंत्री या नात्याने संवाद साधत विश्वास मी दिलाय की, तुमच्या नव्या आयुष्यासाठी आपुलकीसह, आम्ही सर्व यंत्रणेनिशी सोबत आहोत. समाजात बदल घडणे ही निरंतर प्रक्रिया सुरु राहिलच पण त्यादृष्टीने डोळस प्रयत्न करणे हे ही शासनकर्ते, यंत्रणा, समाजसेवी संस्था आणि सामान्य माणसांच कर्तव्य आहे.
- ऍड. यशोमती ठाकूर
मंत्री, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य