थॅक्यू सिस्टर !
X
आजपर्यंत डॉक्टरांबद्दल, डॉक्टरांविषयी सातत्याने खूप लिहलं, नर्सेसविषयी तुलनेनं कमीच.. एकतर पालिका सार्वजनिक रूग्णालयातल्या नर्सेस कायम कामामध्ये बिझी. त्यांच्याकडून संस्थेविषयी माहिती मिळणं महाकठीण. रुग्णांचा सतत सुरु असलेला ओघ आणि त्यांचे ड्युटीचे तास. या सगळ्यात बातम्या काढणाऱ्या माणसांना या नर्सेसच्या जगात प्रवेश मिळणं थोडं कठीणचं..
काही महिन्यांपूर्वी केईएम रुग्णालयातल्या परिचारिका पिकनिकला गेल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. ती वेबला होती. त्यातल्या काहीजणी ऑफिसमध्ये आल्या, त्यांची भेट घेतली तेव्हा त्या जीव तोडून सांगत होत्या, आम्ही वाऱ्यावर टाकून गेलो नाही रुग्णांना. ड्युटी व्यवस्थित लावली होती, संमती घेतली होती. तुम्ही वेगवेगळ्या प्रोफेशनमधील सगळेजण अशा रजेची वाट पाहता ना, आपल्या मित्रमैत्रीणीसोबत सहकाऱ्यांसोबत बाहेर जाण्यासाठी. आम्ही सगळं नियोजन करून गेलो तर चूक ते काय.
काहीजणींशी घट्ट मैत्री आहे. अहो वरून अगं वर आलेली. त्यांच्याकडून जगणं कळतं गेलं. यातल्या अनेकजणी गावाहून आलेल्या असतात. खूप स्ट्रगल करून. लग्नाचं वय उलटून जातं. इथचं कुठतरी रुम घेऊन भाड्याने राहतात. गावी भावाला शिक्षणासाठी पैसे पाठवतात. पाठीमागच्या बहिणींची लग्न करून देतात. त्यांच्या डोळ्यात स्वप्न असतं. भावाबहिणींना शिकवण्याचं. बापाची गहाण पडलेली जमिन सोडवण्याचं. रुग्णांना सेवा देण्याचं. खासगी रुग्णालयामध्ये केरळहून आलेल्या परिचारिकांचे प्रमाण खूप मोठं आहे. काही दुबईला जातात, ज्यांना संधी मिळत नाही त्या मुंबईला येतात. मिळणारा पगार कष्टाच्या तुलनेत खूपच कमी, पण इंग्रजीची जाण आणि काम करायची तयारी असल्याने छोट्या नर्सिग होम्समध्ये त्या टिकून राहतात. गावातल्या कुणाकुणाला घेऊन येतात. या चिवट असतात, प्रचंड कष्टाळू आणि कामाच्या ताणाने वाकलेल्याही.
करोनाच्या रिपोर्टिंगच्या निमित्ताने यातल्या अनेकजणींशी रोज संपर्क येतो. केईएम रुग्णालयामध्ये करोना पॉझीटीव्ह झाल्यानंतर रुग्णवाहिकेत सहा ते सात तास बसून राहिलेली ती, आपल्या परिचारिका मैत्रीणीला जीवाचं रान करून मदत करणारी कुणी, कोव्हीड वॉर्डमध्ये बॉडी रॅप करण्यासाठी मामाला मदतीचा हात पुढे करणारी. स्वतः पॉझीटीव्ह झाल्यानंतर दिड वर्षाच्या मुलाच्या मिठीकडे पाठ फिरवून घरातून दूर निघून जाणारी नर्स. चौदा दिवसांचा कोरन्टाईन काळ पूर्ण होण्यापूर्वी ड्युटीवर हजर झालेली. गरोदर आहे, बाळ अंगावर दूध पितंय. गेल्या पाच वर्षांपासून बीपी आहे, थायरॉईड आहे. हे असं असताना हायड्रॉऑक्सीक्लोरोफिन घ्यायची नाही घ्यायची. या नर्सेसना अनेक प्रश्न असतात. पण ती सेवा देत राहते. गावाहून आलेल्या बदलापूरला एका सोसायटीत राहणाऱ्या नर्सला नायरला कामाला जाते म्हणून रंगापासून कपड्यांपर्यंत टोमणे बसतात, चपला फेकून मारण्यात येतात. ती हरत नाही. आई कामावर जाऊ नको म्हणणाऱ्या मुलाला येताना खाऊ आणते म्हणणारी नर्स हिमालय पूल दुर्घटनेमध्ये सापडते, पुन्हा घरी जातच नाही. बाळाला खाऊ नको आई हवी असते. तिच्या जिवाची किंमत नुकसान भरपाईत होत नाही.
आमच्या त्रिशला कांबळे या सगळ्याजणींचा उल्लेख आमच्या मुली असं करतात. ताई स्वतः नर्स नाहीत. परिचारिकांना नोकरीत राहून युनिअन चालवता येत नाही गं, त्यांचे प्रश्न खूप वेगळे आहेत. त्या पोटतिडकीने सांगतात.
..
केईएममध्ये मृतदेह पडून असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी दिली , या बातमी देण्यापूर्वीचे अशाच एकीचे शब्द आठवतात, या व़ॉर्डमध्ये नर्सेस ओकत होत्या, पण कोव्हीडच्या रुग्णांना उपचार देत होत्या. रुग्णांचा , सामान्यांचा या व्यवस्थेवरचा विश्वास ढळावा असा उद्देश त्यामागे नव्हता. तर व्यवस्थेमधील दोष दूर करण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न होता.
आज पुन्हा असे व्हिडिओ काढून गारेगार एसीमध्ये बसून काही राजकारणी या रुग्णालयांना बदनाम करत आहेत. त्याचंही उत्तरं एका नर्सने रोखठोख दिलंय. बॉम्बस्फोट, दंगलीमध्ये सावरणारी हीच रुग्णालय होती, आमच्यावर असलेल्या कामाचा ताण पाहिलात का. दोनशे टक्के खरं आहे.
व्हिडिओ व्हायरल करणारे महनीय ज्या डॉक्टरांची त्यांच्या संस्थेकडे नोंदणी आहेत अशांनाच त्यांच्या भागात पीपीई आणि मास्कची सुविधा देतात. त्यामुळे रुग्णालयात कुणाला हाताशी धरून असे व्हिडिओ काढणं त्यावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणंही सोपं आहे. कठीण आहे ते इथल्या प्रत्येकाचे प्रश्न, अडचणी समजून घेणं. या नर्सेस हॉस्पिटलला स्वतःचे कुटुंब मानतात.
या प्रोफेशनमध्ये आहेत म्हणून यातल्या अनेक जणींना कुटुंबाने नाकारलं आहे, रात्री अपरात्रीच्या ड्युटींमुळे कुटुंबात भांडणतंटेही झालेत. जोडीदार दुरावतात. मुलंही तिला वेळ देत नाही म्हणून गृहित धरतात. एक ना अनेक गोष्टी. वसई, विरार, पालघरपासूनही येणाऱ्या या मुली आठ बाय आठच्या घरांमध्येही कोरन्टाईन झाल्या आहेत. विना तक्रार. गर्दीने खच्चून भरलेल्या बसमधून त्या पुन्हा ड्युटीला जॉईन होतील. संसर्गाने भरलेल्या रूगणालयामध्ये प्रचंड उष्म्म्यामध्ये पीपीई किट घालून काम करण्यातला त्रास तुम्हालाच माहित.
थॅक्यू सिस्टर. एरवी प्रत्येक वर्षी परिचारिका दिनाच्या तयारीची तयारी, तुमची लगबग सुरु असते. यंदा ते शक्य होणार नाहीय. नाराज हताश होणं तुम्हाला माहित नाही. तुमच्याशी बोलून निम्मा आजार पळून जातो. करोना झालेल्या गरोदर महिलांची बाळं आईच्या मायेने तुम्ही सांभाळत आहात. आज तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. ही जाणीव मनात कायम राहील.
तुम्हा सर्वांना कडक सलाम!
थॅक्यू सिस्टर...
-शर्मिला कलगुटकर