जेसिंडा आर्डेन: एक हायपोथिसिस खरा ठरण्याची सुरुवात होवो!
न्यूझीलंड च्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांच्या विजयाने कोरोना पश्चात जगाची पुर्नरचना होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात झाली आहे का? वाचा जेसिंडा आर्डेन यांच्या विजयाचा अर्थ सांगणारा संजीव चांदोरकर यांचा लेख...
X
न्यूझीलंड : कोरोनाने प्रत्येक देशात उडवलेल्या हाहाकारात, नावघेण्या जोग्या लोकशाही राष्ट्रात झालेल्या पहिल्या निवडणुका! आर्डेन यांच्या नेतृत्वाखालील डावीकडे झुकलेल्या लेबर पार्टीला गेल्या ५० वर्षात पहिल्यांदा निर्भेळ यश आलं आहे.
देशाची अर्थव्यवस्था सर्वासाठी राबवली जाईल, रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल, आर्थिक विषमता कमी केली जाईल, पर्यावरण संरक्षणाला महत्व दिले जाईल. या मॅनिफेस्टो वर ४० वर्षाच्या आर्डेन जिंकून आल्या आहेत.
माझा दोन हायपोथिसिस आहेत:
(१) जागतिकीकरणाच्या युगात मोठी झालेली, सोव्हियेत युगाची वैचारिक ओझी डोक्यावर न वागवणारी , नवनवीन आयडियाजना सामोरी जाणारी... विचारी आणि संवेदनशील तरुण पिढी सर्व जगभर जनकेंद्री व पर्यावरणकेंद्री समाज आणि अर्थव्यवस्था नव्याने उभे करण्यात पुढाकार घेईल.
(२) शेकडो पुस्तके, अभ्यासवर्ग, भाषणे यांनी जे साध्य होऊ शकत नाही. ते कोरोना कदाचित घडवू पाहत आहे. कोटयावधी लोकांना आयुष्याचा, अर्थव्यवस्थेचा, पर्यावरणाचा, सहकाराचा पुनर्विचार करायला भाग पडत आहे.; कारण लोक जिवंत अनुभवातून जात आहेत. कोरोना देत असलेल्या लीव्ह्ड एक्सपीरियन्सच्या पार्श्वभूमीवर विश्वासार्हता असणारे तरुण नेते जनकेंद्री मांडणी करू लागले की लोक त्यांना साथ देतील.आर्डेन यांच्या विजयाने कोरोना पश्चात जगाची पुर्नरचना होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात होवो हीच सदिच्छा...