झुंजार मातृत्व... !!
X
व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या दांपत्याच्या पोटी माझा जन्म झाला... प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध न्याय हक्कासाठी लढायचं असतं , त्यावेळी अनेक संकट आपण होऊन शिरावर घेतलेली असतात ... काटयाचे रस्ते त्यांनी आपण होऊन निवडलेले असतात.
शेतकरी संघटनेतील बिनीचा कार्यकर्ता म्हणून वडिलांनी केलेला संघर्ष वेळोवेळी चितारलेला आहे. पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून 80 च्या दशकात शेतकरी चळवळीत उतरलेल्या आई बद्दल फारसं लिहलं नव्हतं.. मला आठवते मी कळत्या वयात होतो कदाचित 10- 11 वर्षाचा असेन, वडील अहमदपूर तालुक्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष होते...
आई तिच्या संसारात रममाण होती, आपलं घर, संसार, शेती.. शिक्षण फारसं नव्हतं पण रामायण, महाभारत, पांडव प्रताप, हरी विजय या पोत्या अगदी सुरेल आवाजात वाचायची... त्यामुळे गावात अध्यात्मिक विजयाबाई म्हणून परिचित होती... आजही तो परिचय कायम आहे. पण नवऱ्यामुळे शेतकरी प्रश्नाची जाणीव होऊ लागली... त्यातूनच खूप दिवसापासून वडील तिची मानसिक तयारी करत होते... तिच्या मानसिक तयारीची पहिली परीक्षा हाळी - हंडरगुळी येथे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या समोर भाषणाने झाली... आणि ती परीक्षा तिने काटावर पास केली.. एक महिला आज पर्यंत घरातून कधी बाहेर पडली नाही ती चक्क चळवळीच्या विचारपीठावर शरद जोशींच्या समोर भाषण करते.... ही गोष्ट त्याकाळी आमच्या परिसरात खूप मोठी होती... ह्या ठिणगीने ती चळवळीत ओढली गेली.. अनेक रास्ता रोक, रेल रोको केले जेल मध्ये गेली...
लातूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीची अध्यक्षा झाली, वडील आणि आई दोघेही चळवळीत असल्यामुळे "गाडी बरोबर नळ्याची वरात " या म्हणी प्रमाणे आम्ही पण बहुतांश वेळा सोबत असायचो... शिरूर ताजबंद येथे आईच्या नेतृत्वाखाली एक रास्ता रोको आंदोलन सुरु होते... आई पूढे होती मागे 100 -150 स्त्रिया होत्या... एक भरधाव कार आली आणि आईच्या पायावरून गेली... पोलिसांनी कार पकडली पंचनामा झाला... आईच्या पायाला जबर जबर मार लागला ... पुढे अनेक वर्षे कोर्ट कचेऱ्या झाल्या कार वाला सही सलामत सुटला... तिचा एक पाय कायमचा अधू झाला... (दोन वर्षांपूर्वी त्या पायाचे ऑपरेशन करून गुडघा दुसरा बसवला ). एवढे होऊनही ती घरी बसली नाही.. पुढे जिल्हा परिषद निवडणुकीला वडिलांच्या आणि अनेक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे उभी राहिली...
जीव तोड प्रचार केला, निवडून येणार अशी हवा निर्माण झाली... पण दुर्देवाने दीडशे मतांनी तिचा पराभव झाला.. त्या पराभवाने मात्र ती खचली... तेंव्हा पासून तिने घरी बसने पसंत केले... पण तिच्यातलं झुंजार पण अजूनही कायम आहे... आम्हाला मात्र तिने विचार रुजवले आणि आधी संसार करा नेटका हे शिकवलं आजही शिकवते आहे... अशा रणझुंजार माता पित्याच्या पोटी जन्म घेतल्यामुळे... झुंजणाऱ्या, कष्टणाऱ्या, राबणाऱ्या हाताचं मोल मनात कायम असतं... काल बहिणीने हा फोटो टाकला आणि आज आई बद्दल व्यक्त होता आले... काही जणांना हा वेदनेचा सोहळा वाटेल पण आमच्यासाठी आत्म सन्मान आहे.. त्यामुळे हे उरी बाळगताना कमालीचा अभिमान वाटतो...
माझ्या आई वडिलांना आर्थिक स्रोत उभे करता आले नाहीत पण त्यांनी समाजाच्या भल्यासाठी झटताना आम्हाला त्या संघर्षातूनही उभं केलं त्याचं मोल खूप मोठं आहे... त्याची जाणीव आम्हा बहीण भावामध्ये अखंडपणे आहे... आज जिल्ह्यात गेलो तर त्यांचे मुलं म्हणून कोणी उल्लेख केल्यानंतर आभिमनाने मान ताठ होते... हे त्या चळवळीच्या नैतिकतेचे बळ आहे हे आज मागे वळून पाहताना जाणवतं... आणि आंनदाने डोळे पाणावतात... ही इतिहासाची पानं आमच्या जगण्याचं बळ आहेत हे मात्र निश्चित... !!
@युवराज पाटील