कोलकाता: दुर्गा मातेऐवजी स्थलांतरित मजूरांच्या मुलींची मुर्ती
मनाची दारं बंद करून देवाची आस लागलेल्या समाजास हा निर्णय योग्य वाटले का? नवरात्रात देवीच्या मुर्ती ऐवजी स्थलांतरित महिलेची मुर्ती वाचा समीर गायकवाड यांचा प्रेरणादायी विचार
X
दक्षिण कोलकात्यामधील बेहाला येथील दुर्गा पूजा समितीने यंदा आपल्या मंडळाच्या वतीने मंडपात दुर्गा मातेऐवजी एका स्थलांतरित मजूर असणाऱ्या महिलेची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिलेच्या कडेवर एक लहान मूल असल्याचे दाखवण्यात आलं आहे. पूजा समितीच्या संचालकांनी करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये स्थलांतरित मजुरांना सोसाव्या लागणाऱ्या कष्टाचे आणि त्रासाचे प्रतिक म्हणून ही मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही मूर्ती म्हणजे स्थलांतरित मजुरांचे केवळ दु:खच नाही तर त्यांची जिद्द आणि हिंमत याचेही प्रतिक आहे. या मंडपामध्ये केवळ दुर्गा नाही तर इतर देवींच्या मूर्तीही यंदा बदलण्यात आल्यात. लक्ष्मी आणि सरस्वती देवीच्या ऐवजी स्थलांतरित मजूरांच्या मुलींच्या मुर्ती स्थापन करण्यात येतील. या मुलीपैकी एका मुलीच्या हातात घुबड आहे. जे लक्ष्मीचे वाहन आहे. तर दुसरीच्या हातात हंस असून ते सरस्वती देवीचे वाहन आहे. या सर्वांबरोबर एक हत्तीचे मुंडके असणारा मुलगाही दाखवण्यात आला असून तो गणपतीचे प्रतिक आहे.
'कणकण में बसे हैं ईश्वर' असं आपल्याकडे म्हटलं जातं. मात्र, प्रत्यक्षात याचं आकलन करताना अनेकांचे विचार थिटे पडल्याचे दिसते. मजूर महिलेत देखील देवता आहे आणि तिचा थक्क करणारा संघर्ष तिची महती दर्शवतो. या मजूर महिलेची जातधर्म कोणती असा सवाल मनात न आणता श्रम आणि सत्य हेच अंतिमतः महत्वाचे मानून तिला देवत्व बहाल करणं खरंच अलौकिक आहे. ईश्वर असलाच तर प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे, मात्र मनाची दारं बंद करून देवाची आस लागलेल्या समाजात हा निर्णय अद्भुत असून हृद्य संदेश देणारा आहे.
'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः' या श्लोकाचा खरा अर्थ जाणून घेण्यासाठी अशा नवनव्या पायंड्यांचा सुकाळ व्हावा. त्यावर विचारविनिमर्ष केला जावा. नुसतं देवत्व बहाल करून न थांबता वास्तव जीवनात देखील आदर सन्मान द्यायला हवा. कोलकात्यामधील संतोष रॉय रोडनजीक साखर बाजार भागातल्या बारिखा क्लबच्या ३२ व्या दुर्गापूजा महोत्सवाच्या या नव्या पर्वास शुभेच्छा...
(सदर लेख समीर गायकवाड यांच्या फेसबुक भिंतीवरून)
बातमीची लिंक -https://www.telegraphindia.com/west-bengal/calcutta/durga-puja-in-kolkata-migrant-mother-as-the-goddess-at-barisha-club-in-behala/cid/1794797