Home > Max Woman Blog > मासिक पाळी - अज्ञान, अभंग ते सेलिब्रेशन.

मासिक पाळी - अज्ञान, अभंग ते सेलिब्रेशन.

आई, बहिण आपल्या पासून दर महिन्याला नेमकं काय लपवतात? याची घरातल्या प्रत्येक वयात येणाऱ्या मुलांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. मासिक पाळी म्हणजे काय? याबद्दल पहिल्यांदा कुठं कळालं? एमसी शब्दाचा अर्थ नेमका काय? मासिक पाळीबद्दल अज्ञानतेकडून ज्ञाताकडे जाणारा प्रवास कसा होता? गोणपाटाच्या बाथरूमच्या वरच्या टोकाला बांधलेली पिशवी खुली व्हायला वयाची चाळिशी कशी ओलांडावी लागली? या सगळ्या मनातील प्रश्र्नांवर आज जागतीक मासिक पाळी दिवसा निम्मीत्त विनायक सावळे यांचा हा लेख पुन्हा प्रकाशित करीत आहोत..

मासिक पाळी - अज्ञान, अभंग ते सेलिब्रेशन.
X

लहानपणी आमच्याकडे गोणपाटने बनवलेला बाथरूम होता. ओट्यावरच. तेथेच आंघोळपाणी व्हायचं सगळ्यांचं. सहा-आठ महिन्यात गोणपाट पाण्याने झिजायची. मग वडील पुन्हा नवीन आणून शिवून, नव्याने बाथरूम तयार करायचे. ते देखील तेव्हा आनंददायी वाटायचं. त्याच बाथरूमच्या कोपऱ्यात, वरच्या बाजूला, उंच एक जुनाट नायलॉनची पिशवी अडकवलेली असायची. ती पिशवी दिसायची पण कधी बघू वाटायचं नाही. काही गरजच नव्हती वाटत. पण एका दिवशी मला वाटलं ती बघूया ! यात काय आहे ते .मग थोड्या उड्या मारीत ती पिशवी मी खेचली. अर्थात घरी कोणी नसताना. त्यात जुनी कापड होती. म्हणजे चिंध्या होत्या. हाताने मोकळ्या केल्यावर, त्या रक्ताळलेल्या कोरड्या झालेल्या दिसल्या. पिशवी जवळपास अर्धी त्याच कोरड्या, रक्ताळलेल्या चिंद्यांनी भरलेली होती. कापडं आहेत आणि त्याला रक्त लागलं आहे, इतकं आता समजलं. पण ते घरातील कोणाचं आणि कसं? याचा काही अंदाज येईना. हे वय होतं साधारणपणे आठ ते दहा वर्षाचं.

अधनंमधनं आई घरात अशी बाजूला बसलेली असायची. घरातील भांड्यांना स्पर्श करायची नाही. वडील, आम्ही घरात आवरत असू. याचं पण आश्चर्य वाटे. मग मी विचारायचो,

' आई, काय झालं गं ?

"माझ्या डोक्यावर कावळा बसलाय", आई.

आईच्या डोक्यावर कावळा कधी आणि कसा बसला ? आपल्याला दिसला कसा नाही? असं डोक्यात यायचं. पुन्हा काही विचारलं तर त्या विषयावर चर्चेला बंदी होती जणू... म्हणून मग सांगितलं तितकच ऐकणे आणि शांत राहणे अशी परिस्थिती होती.


शेवटी मासिक पाळी बद्दल मला पहिल्यांदा कुठं कळलं? ते मित्रांमधील मोठ्या मुलांकडून. तेव्हा गटात जी काही मोठी मुलं असायची ती सर्वज्ञ असल्यासारखे अन्य लहानांना सांगत असत. थोडक्यात ज्ञान देत असत. त्यांच्याकडूनच कळलं. तेव्हा ते 'एमसी' शब्द वापरायचे. याबाबत आई वडील तर दूरच शिक्षकांनी पण कधी सांगितलं नाही. मुला-मुलींनी एकत्र बोलणं फार विशेष समजण्याचा तो काळ म्हणून या विषयावर बोलण्याची तर सुतराम शक्यता नव्हती. मग तेव्हा जे काही समजलं ते मित्रांमधील तथाकथित जाणकारांकडून.

या विषयाबाबत तसं ठरवून जाणून घेण्याबाबत मी स्वतः देखील काही प्रयत्न केल्याचे मला आठवत नाही. स्त्रियांना कधीतरी (महिन्याला पाळी येते हे माहीत नव्हतंच )एमसी येते. त्यात रक्त येतं. ते अशा कपड्यांमध्ये अडवतात. ही कापडं अशी लपवून ठेवतात, इतकंच ज्ञान पुरेसं वाटत होतं.


या अज्ञानाच्या काही गमती पण घडायच्या. त्यातील एक गंमत सांगण्यासारखी आहे. तेव्हा घरात टीव्ही नव्हताच. काही मोजक्याच घरांमध्ये टीव्ही असायचे. हे प्रतिष्ठेचं आणि श्रीमंतीचं लक्षण मानलं जात होतं. मग टीव्ही पाहण्यासाठी गल्लीतल्या एका बँकेच्या अधिकाऱ्याकडे आम्ही जायचो. मी आणि माझा एक मित्र. आम्ही दोघं टीव्ही बघत होतो. त्या हॉलमध्ये पुरुष म्हणून आम्ही दोघंच मुलं होतो. बहुतेक मी आठवीत असेन आणि मित्र एका वर्षाने लहान, म्हणजे सातवीत. इतर श्रोते सर्व महिला वर्ग. त्या कुटुंबातील ती काकू, तिची मोठी तरुण मुलगी, मित्राची आई, त्याच्या दोन्ही बहिणी. सगळे शांतपणे टीव्ही पाहण्यात मग्न होतो. मध्येच एक जाहिरात आली. रेणुका शहाणेची. ती लाजत लाजत, भीत-भीत, हळुवार बोलते. ' "मला एक छान वस्तु मिळालीये, कसं सांगू तुम्हाला"...... वगैरे.. वगैरे. तोपर्यंत मला तर 'कापडाच्या चिंध्या आणि सर्वज्ञ (?)मित्र या ज्ञानाच्या बळावर काही माहीती होती. हे एमसी साठी वापरलं जात असावं, म्हणुन अंदाज होता. म्हणून ती तशी हळुवार भीत-भीत लाजत बोलते इतकं कळत होतं. पण मित्राला यातलं काहीच ठाऊक नसावं. म्हणून तो जोरात ओरडला,


" विनायक, ही जाहिरात आहे कशाची रे?".


सर्व महिला मंडळ एकमेकांकडे बघत होतं. हसू लपवत होतं आणि गप्प राहिलं. मलाही हसू आवरेना. मित्राने सगळ्यांचे चेहरे बघितले. काहीतरी चुकीचं(?) आपण विचारलं वाटतं असं त्याला समजून आलं. यावर कोणीच काहीच बोललं नाही. टीव्ही बघून जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मी उपलब्ध ज्ञान मित्राला दिलं. अशा प्रकारे अज्ञाताकडून अधुऱ्या, ऐकीव ज्ञाताकडे आमचा प्रवास झाला.

मासिक पाळी या विषयावर कुटुंब, मित्र यांच्याकडून नेटकी माहिती कधीच मिळाली नाही. पण शिक्षणातूनही कधी मिळाली नाही. मानवप्राण्याच्या जीवनाशी संबंधित इतकी महत्त्वपूर्ण माहिती, कुटुंब समाज आणि शिक्षण व्यवस्था या तीन मुख्य ज्ञानाच्या स्रोतांपासून जर मिळत नसेल तर किती भयंकर शोकांतिका म्हणावी.


पुढे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत आलो. समितीत 'वयात येताना 'असे विषय तज्ञ मंडळी घेऊ लागली. त्यांची पुस्तके वाचण्यात आली. तेव्हा यातील शास्त्रीय म्हणता येईल असं ज्ञान मिळालं. आकृती आणि स्पष्टीकरणासह माहिती या पुस्तकांनी दिली. या पुस्तकांचे माझ्यासारख्या 'एमसी आणि कापडाच्या चिंध्या' इतकंच ज्ञान वर्षानुवर्षे बाळगणाऱ्या अनेकांवर अनंत कोटी उपकार आहेत. मासिक पाळी या विषयाचे केवळ ज्ञानच नाही तर त्याबद्दल 'विवेकी दृष्टिकोन 'देण्याचं कामही चळवळीने केलं. इतका महत्त्वाचं आणि छोटं ज्ञान माझ्या पर्यंत पोहोचायला किती वर्षे जावी लागली. पुढे हे ज्ञान आणि दृष्टिकोन असा काही विकसित झाला की मी मासिक पाळी वर अभंग रचना केली. या अभंगाच खूप कौतुक झालं. या अभंगाचा अनेक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये सामूहिक पठणही करण्यात आलं. ध्वनिमुद्रण ही झालं. खूप छान वाटलं.


मग आता सेलिब्रेशन बद्दलच सांगतो. मला दोन मुली. मोठी आता अकरावीत गेली. लहानी सातवीत. एकाच घरात वाढलेल्या. दोघी स्वभावाने मात्र भिन्न. मोठी कमी बोलणारी, लहानी बिनधास्त बोलणारी. काल रात्री घरची मंडळी सर्व गावाला गेलेली. मुलं आणि मीच घरी. मी असंच कॉटवर लिहायला बसलेलो. रूम मध्ये लहानी येऊन मला हळूच म्हणाली,
'' दादा ,मला पाळी आली आहे.!

हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता, आनंद, ताण असे संमिश्र भाव होते. पण आत्मविश्वास आणि मोकळेपणा पण होता हे जास्त महत्त्वाचं मला वाटलं.

मी म्हणालो,

'' रक्त जातंय का ?",

' हो ' ती.

'' खूप जास्त जातंय का ?",मी.

" हो, निकर भरले माझे", ती.


" ओके, मग मोठ्या दीदी कडून पॅड घे. तुला पॅड कसे लावतात माहितीये ना ?.


"हो ,मला सगळं माहिती आहे", ती .


मी तिला प्रेमाने मिठीत घेतलं. एक छान पप्पी घेतली. म्हणालो,


"माझा नित्या आता मोठा झाला". 😊😘🤗

आता माझ्या मिठीला तिनंही तसा छान प्रतिसाद दिला. मग आम्ही सगळ्यांनी या पाळीच सेलिब्रेशन करायचं ठरवलं. पहिल्या मासिक पाळीचं सेलिब्रेशन. ही घरात नवीनच कल्पना होती. पण मुलांनी ही कल्पना आनंदाने उचलून धरली. आमच्याकडे सेलिब्रेशन म्हणजे बाहेरुन काही तरी खायला आणायचं असतं. आईस्क्रीमची दुकाने बंद होती. शेवटी मंचुरियन आणि कॅडबरी वर ठरलं. गावाला गेलेली घरातील मोठी मंडळी परत आली. त्यांना आम्ही पहिल्या पाळी मासिक पाळीच्या सेलिब्रेशनची कल्पना दिली. नितुचं घरात सर्वत्र कौतुक झालं. सेलिब्रेशनमध्ये सगळेच सहभागी झाले. म्हणजे नितुचे आजी आजोबा, काका काकू, आई वडील आणि सगळी भावंड..

गोणपाटाच्या बाथरूमच्या वरच्या टोकाला बांधलेली पिशवी अशी खुली व्हायला वयाची चाळिशी ओलांडावी लागली...

विनायक सावळे.

vinayak.savale123@gmail. com

9403269226.

8788273283.

Updated : 28 May 2022 8:08 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top