'आय रिजेक्ट यु अर्नब'
X
अर्णब गोस्वामी टीव्हीच्या पडद्यावरून गेल्यानंतर देशातील सर्व मिडीया प्रचंड भ्रष्टाचारी, बेलगाम आणि व्याभिचारी झाली आहे. पैसे घेतल्याशिवाय एकही बातमी लागत नाही. लोकांच्या विषयांवर भूमिकाच घेतली जात नाही. बेंगलुरूमध्ये मास मॉलेस्टेशन झाल्यानंतर माध्यमं अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव दाखवत बसले. व्हॉट अ शीट..! सर्व काही मेरीट वर होत असताना कॉलेजमध्ये गेल्यावर जात कळते. रिझर्वेशन वगैरे गोष्टींमुळे खऱ्या टॅलेन्टला वाव मिळत नाही. शनि-शिंगणापूरच्या घटनेच्या वेळी तृप्ती देसाईचा लढा पोटतिडकीने कव्हर केला, तेव्हा मला सर्वांत जास्त समाधान मिळालं असं अर्णब सांगतो, त्याचवेळी मी तीन तलाकवर प्रश्न विचारणार. सेक्युलरिजम मला शिकवू नका. माझं सेक्युलरिजम मला असा प्रश्न विचारायची प्रेरणा देतं, देशातील भ्रष्ट नेत्यांच्या कचाट्यात माध्यमं अडकलीयत आणि नॅशनल कॅपिटलच्या बाहेर पत्रकारिता नेली तरच ती वाचू शकते असं अर्णब विविध ठिकाणी आयोजित युवकांच्या मेळाव्यांमध्ये ओरडून ओरडून सांगत असतो. यू-२५ अशी अर्णबची कन्सेप्ट आहे. हे यू-२५ काय आहे हे सविस्तर सांगेन. पण एकंदरीतच हे असं आहे. पाहिलं तर मस्त आणि पाहिलं तर घातक ही..!
अर्णब आणि त्याच्या पठडीतल्या अनेक पत्रकारांना २०१४ नंतर प्रचंड आवाज आणि बळ मिळालं. याचा अर्थ अर्णब २०१४ ला अस्तित्वात आलेल्या राजकीय विचारधारेचा पाईक आहे असं मला बिल्कुल म्हणायचं नाहीय. अर्णबने त्या विचारधारेचा ग्राफ ज्या ज्या गोष्टींमुळे वाढला त्या त्या गोष्टी मिडीयामध्ये आणल्या. आजही अर्णबची टीम अर्णबला विकण्यासाठी, (विकण्यासाठी हा उचित शब्द यासाठी आहे की अर्णबचं सध्या ब्रँड बिल्डींग सुरू आहे.) बरखा आणि राजदीप सरदेसाई यांच्या प्रतिमांचा वापर करते. युट्यूबवर अर्णबच्या भाषणांच्या व्हिडीयोंना अर्णब व्हर्सेस बरखा किंवा अर्णब व्हर्सेस राजदीप असे थंबनेल वापरण्यात आलेयत. २०१४ चा मेसेज अतिशय स्पष्ट होता. हा मेसेज होता की, जर सत्ता उलथवायची असेल तर पहिल्यांदा विश्वासार्हतेवर हल्ला करा. डिस-क्रेडीट करा. आपणच कसे योग्य आणि बाकीचे कसे चोर हे लोकांना सांगा. साधारणत: विचारी लोकं अशा हल्ल्यांच्या वेळी गप्प बसतात. आपण का उत्तर द्या, बोलतोय तर बोलू दे.. वगैरे वगैरे बाबींनी स्वत:ची समजूत घालत असतात. राजदीप आणि बरखा बहुधा याचमुळे गप्प असावेत किंवा ते खरोखरच पथभ्रष्ट असावेत. सामान्य लोकं ही असाच विचार करतात की, बहुधा ते भ्रष्ट आहेत म्हणून उत्तर देऊ शकत नाहीत. विरोधकांची प्रतिमा ढासळवली की मग सुरू करावी लागते आतिषबाजी.. टाळ्या मिळतील अशा गोष्टींची. यात हमखास टाळीचं वाक्य म्हणजे “नॅशनलिज्म”
सध्या अर्णब गोस्वामी हा सर्वच नॅशनलिस्ट लोकांचा आवाज झालाय. असाच एक आवाज हिंदी पत्रकारितेतला सुधीर चौधरी ही झालाय. सुधीर चौधरीवर जिंदाल ग्रुपकडून १०० कोटींची लाच-खंडणी मागितल्याचा आरोप होता. अर्णबचं आधीचं टीव्ही चॅनेल ज्यांच्या मालकीचं होतं त्यांच्यावर ही इतर वाहिन्यांच्या मालकांप्रमाणेच अनेक आरोप होते. अशा अग्निदिव्यातून बाहेर पडायचं तर राष्ट्रीयत्वाची ज्योत पेटवलीच पाहिजे. अर्णबनेही ती पेटवलीय.‘नेशन वॉन्टस टू नो’ च्या जुमलेबाजीने अर्णबने पत्रकारितेत आणलेल्या प्रवाहावर बरंच लिहून झालेलं आहे. अर्णबकडे शब्दसामर्थ्य आहे, मंत्रमुग्ध करणारं असं काही तो बोलतो की लोक टाळ्या वाजवतीलच. ही कला आहे. ती त्याने आत्मसात केली, आणि विशेष म्हणजे कॅरी केली. मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांचे बोल किंवा अर्थ सहसा आपण शोधत नाही. जसं “तरूण आहे रात्र अजूनी.. राजसा निजलास का रे..” या गाण्याचे संगीत, बोल इतके वजनदार आहेत की त्याच्या अर्थापर्यंत आपण क्वचित पोहोचतो. वाटताना प्रणयगीत वाटणारं हे गाणं मुळात तसं नाहीय हे कळल्यावर अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. अर्णबची सध्याची भाषणंही तशीच आहेत.
जे या देशातील बहुसंख्य उच्चवर्णिय आणि उच्चशिक्षित किंवा ज्यांना इच्छा आहे पण संधी मिळाली नाही अशा सामान्य कुवतीच्या लोकांना वाटतं तेच अर्णब सध्या बोलतोय. ‘इक्वॅलिटीची’ची जी व्याख्या अर्णब इंग्रजी क्लासच्या त्याच्या प्रेक्षकांना सांगतो ती देशातल्या इतकी वर्षे नाकारण्यात आलेल्या अति-उजव्या विचारधारेचीही व्याख्या आहे. अर्णबला त्याचं मार्केट माहित आहे. बेंगलुरू-पुणे अशा शहरांमध्ये कार्यक्रमं आयोजित करून अर्णब जे सांगत आहे तो विचार आज वरचढ वाटत असला तरी बहुजन आणि अल्पसंख्यांकाच्या हिताचा नाहीय. मला या मुद्द्याला आरक्षण वगैरे चर्चेवर ही न्यायचं नाहीय. त्यामुळे सध्या यावर खोलात चर्चा करत नाही. पण, या निमित्ताने अर्णबला प्रश्न विचारावासा वाटतो की खरंच इक्वॅलिटी आहे का, दिसतेय का? असं असेल तर ती अर्णबच्या चॅनेलमध्येही कधी का दिसली नाही. अर्णबच्या चॅनेलवर मागास जाती-जमाती सोडा पण कधी ‘रूरल इंडिया’चा अजेंडा ही दिसला नाही. अर्णबच्या ‘इंडिया वॉन्टस टू नो’ मध्ये “भारत” कधीच का नव्हता? स्वत: आपण बातम्यांमध्ये कधी ही समानता आणू शकलो नाही, तिथे कधी इक्वॅलिटी दिसली नाही, मग देशात अर्णबला अचानक इक्वॅलिटी कशी काय दिसली असेल.
बाबरीकांड नंतर पहिल्यांदा धर्म ही कळला असं अर्णब सांगतो. खरंय. या सर्वांच्या पलिकडे भारताला गेलं पाहिजे. पण असं बोलत असताना अर्णब अचानक सेक्युलरीजम ची स्वत:ची व्याख्या ही सांगतो. तो सांगतो की, मी शनिशिंगणापूर वर बोलेन तसं ‘तीन तलाक’ वर ही बोलेन. जे देशातील इतर मिडीया बोलायचं टाळतेय. यातलं अधोरेखित करायचं म्हणजे आज पर्यंत ‘स्युडोसेक्युलरिज्म’ असा नवीन शब्द रूजवणाऱ्या विचारधारेचं ही असंच काहीसं म्हणणं असतं. तीन तलाकवर मी सर्वच वाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये चांगलीच डिबेट पाहिलीय. अर्णब अशा गोष्टींचा उपयोग २०१४ वाल्या लोकांसारखा आपलं मार्केट गरम करण्यासाठी करतोय असं वाटतं.
अर्णब ने यू-२५ ला टार्गेट केलंट. यू-२५ म्हणजे अंडर २५. तरूणांच्या जीवावर आपलं रिपब्लिक हे चॅनेल चालवायचं ठरवलंय. या वयातील विद्यार्थ्यांसमोर अर्णब सारख्या पर्सनॅलिटीने येऊन सांगीतलेलं त्यांच्या मनात आयुष्यभर कोरलेलं राहू शकतं. आज अर्णब या मुलांच्या समोर देशातील सर्वच पत्रकार आणि माध्यमांना विकाऊ ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. असंच २०१४ वाल्यांनी पण केलं होतं. आज अर्णबला ठणकावून सांगण्याची गरज आहे की, अर्णब नव्हता तेव्हा ही या देशातील पत्रकारिता जीवंत होती. काही अपवाद वगळता ती विकली गेली नव्हती.
अर्णबने आरोप लावला आहे की देशातील काही लोक त्याचं नवीन चॅनेल लाँच होऊ नये म्हणून प्रयत्न करतायत. काही पॉवरफुल मिडीया हाऊसेस ही प्रयत्न करतायत. हे खरं ही असू शकतं. कारण आजही मार्केट मध्ये असे फोर्सेस आहेत ज्यांना फ्री किंवा इंन्डीपिन्डेट मिडीया, स्वतंत्र मिडीया नकोय. अर्णबमुळे त्यांच्या जीवाला घोर लागला पाहिजे. त्यासाठी अर्णबला शुभेच्छाच दिल्या पाहिजेत. पण, त्याचवेळी अर्णबने त्याच्या या मिडीया स्टार्टअपमध्ये कुणा-कुणाचा पैसा असणार आहे याची माहिती ही जगजाहीर केली पाहिजे. प्रेक्षकांना हे तुमचं चॅनेल आहे असं सांगून पळवाट शोधून काढू नये..आणि प्रश्न विचारणाऱ्यांना अँटीनॅशनल ही घोषित करू नये.
अर्णबने तरूणांची एनर्जी गोळा करायला सुरूवात केली. आपली आक्रमक भूमिका अशीच कायम राहिल असं ही त्याने आपल्या भाषणांत सांगीतलंय. अर्णब युवकांशी संवाद साधतोय. त्यांना मला सपोर्ट करणार की नाही असं मोदी स्टाइल प्रश्न ही विचारतोय ‘आय रिजेक्ट युअर जर्नालिजम’ असं घोषित करून अर्णब भारतीय मिडीयाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोय. माध्यमांची भीती संपत चाललीय ती भीती परत आणू असं ही अर्णबने जाहीर केलंय… इथपर्यंत सर्व ठीक आहे. हे सर्व करत असताना ज्या ज्या गोष्टींचा अर्णब सहारा घेत आहे ते सर्व अतिउजव्या विचारधारेच्या जवळ जाणारं आहे, आणि जर अर्णबचं हे रिपब्लिक ही तसं असेल तर अर्णबला सांगावं लागेल की, ‘आय रिजेक्ट यू अर्णब, आय रिजेक्ट यू!’
– रवींद्र आंबेकर