मोठी तिची सावली...
X
सरोज खान गेल्या... केवढं वैविध्यपूर्ण नि रसरशीत आयुष्य जगल्या. बॉलिवुडच्या सिनेमाला लाजवतील एवढी अतर्क्य, अविश्वासार्ह वळणं त्यांच्या आयुष्यात आली. या वळणांवर झालेल्या बऱ्याच अपघातांमधूनही त्या सावरल्या, पुन्हा भक्कमपणे उभ्या राहिल्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन करीत राहिल्या. हिंदी चित्रपटसृष्टीला मिळालेला ‘बॉलिवुड’ हा शब्द अनेकांना खटकतो. परंतु, सरोजजींच्या तोंडी हा शब्द अनेकदा ऐकायला मिळायचा. किंबहुना कथ्थक, भरतनाट्यम नृत्यांगना यापेक्षा आपली बॉलिवुडची कोरिओग्राफर अशी ओळख त्यांना खूपच आवडायची. ‘देवदास’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्या खूप आजारी पडल्या होत्या. मुंबईतील एका रुग्णालयातील ‘आयसीयू’मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. या चित्रपटामधील ‘डोला रे डोला रे’ हे गाणं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. परंतु, सरोजजींना याची काहीच कल्पना नव्हती. या गाण्यावर थिरकलेली ऐश्वर्या राय त्यांना भेटायला रुग्णालयात गेली. ऐश्वर्याला पाहताच नाकातोंडात नळ्या असलेल्या सरोजजींचे डोळे चमकले. त्यांनी ही सगळी वैद्यकीय उपकरणं बाजूला केली आणि ऐश्वर्य़ाला आधी विचारलं, ‘’डोला गाण्यावर प्रेक्षकांची शिट्टी वाजली की नाही... प्रेक्षकांनी पैसे उधळले की नाहीत...’’ सरोजजींकडून हा प्रश्न ऐकून क्षणभर ऐश्वर्यादेखील आश्चर्यचकीत झाली असावी. परंतु, ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून सरोजजी काय ते समजल्या... असा पुरेपूर बॉलिवुडपणा त्यांच्यात मुरला होता.
वर उल्लेख केल्याप्रमाणे सरोजजींचं सगळं आयुष्यच बॉलिवुडी होतं. भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर सरोजजींचे वडील भारतात-मुंबईत आले. तोपर्यंत त्यांचा पाकिस्तानात चांगला व्यवसाय होता. अगदी गर्भश्रीमंत होते. परंतु, फाळणीच्या एका घटनेनं हातात फक्त चटई घेऊन सरोजजींचे आई-वडील मुंबईत दाखल झाले. स्वातंत्र्यानंतर १९४८च्या नोव्हेंबरमध्ये सरोजजींचा जन्म. मूळ नाव निर्मला नागपाल. वडील पंजाबी आणि आई सिंधी. निर्मला लहान असताना भिंतीवर पडलेल्या आपल्या सावलीला पाहून खुश होई आणि त्यावर तिचा पदन्यास सुरू होई. निर्मलाच्या आईला ही गोष्ट खूप विचित्र वाटली. अगदी आपली मुलगी वेडी आहे की काय, असाही त्यांना संशय आला. त्यावेळी त्या दुसऱ्यांदा गरोदर होत्या. माहिमला डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्या असताना त्यांनी निर्मलाचं हे वागणं डॉक्टरांच्या कानावर घातलं. तेव्हा डॉक्टरांनी निर्मलाला पाहिलं आणि त्यांनी सांगितलं, ‘’अहो, तुमची मुलगी चांगली नृत्यांगना आहे. तिला सिनेमात का नाही पाठवत? चांगले पैसेही मिळतील आणि तुमची थोडी आर्थिक समस्याही कमी होईल. माझ्या काही ओळखी आहेत... मी तिचं नाव सुचवतो...’’
निर्मलाचं कुटुंब जुन्या, कर्मठ विचारसरणीचं होतं. तेव्हा तिची खरी ओळख नातेवाईकांपासून दडवणं गरजेचं होतं. त्यामुळे काहीच दिवसांनी निर्मलाला ‘नजराना’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यानंतर तिचं नाव बदलण्यात आलं. निर्मलाची आता ‘सरोज’ झाली. त्यावेळी ती अवघी ३ वर्षांची होती. अशाप्रकारे दहा वर्षांची होईपर्यंत सरोजनं बालकलाकार म्हणून काम केलं. त्यामुळे शालेय शिक्षणावर विपरीत परिणाम होऊन त्यांना फक्त पाचवीपर्य़ंतच शिक्षण घेता आलं. परंतु, जीवनाच्या शाळेत प्रत्येक प्रसंग त्यांना काही तरी नवीन शिकवायचा. त्यानंतर ना धड बालकलाकार ना धड तरुण वय अशा कात्रीत सापडल्यामुळे सरोजला चित्रपटांमधील ग्रुप डान्समधील एक व्हावं लागलं. परंतु, तिथंही तिनं आपली छाप पाडली. अनेक वर्षं हे काम त्यांनी आवडीनं केलं. ‘हावडा ब्रिज’मधील ‘आईये मेहरबां’ या गाण्यात त्या मधुबालासोबत नृत्य करताना दिसतात. याच सुमारास प्रसिद्ध नत्यदिग्दर्शक बी. सोहनलाल या ग्रुप डान्सर्सना शिकवायला यायचे. सोहनलाल यांच्याकडे पाहून सरोज नृत्यामधील बारकावे शिकली. मास्टरजींकडील कठोर मेहनत आणि शिस्तीची तिला सवय करून घ्यावी लागली. सोहनलाल बऱ्याचदा सरोजला तब्बल तीन तास एकाच जागी एका विशिष्ट पोजमध्ये उभं करीत. थोडं सुद्धा हलण्याची तिला मुभा नसे. मात्र सरोजचं नृत्यातील कसब आणि तिची मेहनत पाहून मास्टरजींनी तिला आपली सहाय्यक बनवली. एवढेच नव्हे तर अवघ्या १३ वर्षांच्या सरोजच्या गळ्यात काळा दोरा बांधून मास्टरजींनी तिच्यासोबत आपलं लग्नही लावून टाकलं. यावेळी मास्टरजींचं वय होतं ४३. लग्न म्हणजे काय असतं, ही गोष्टदेखील तेव्हा सरोजला ठाऊक नव्हती. मात्र तीही तेव्हा मास्टरजींच्या, त्यांच्या कलेच्या प्रेमात पडली होती. सरोजसोबत लग्न करण्यापूर्वी मास्टरजी विवाहबद्ध झाले होते आणि त्यांचं कुटुंब मद्रासला होतं. मास्टरजींच्या या विवाहाची माहिती सरोजला कळली ती आणखी काही महिन्यांनी. तोपर्यंत ती आपल्या पहिल्या अपत्याची आई बनली होती. मास्टरजींची पत्नी बनण्याबरोबरच ती त्यांची प्रमुख सहाय्यकदेखील बनली.
हे ही वाचा
या महिला नेत्या 10 बजावणार भाजपच्या कार्यकारणीत महत्वाची भुमीका…
राज्यात पहिल्यांदाच महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण
बी. सोहनलाल त्यावेळचं नृत्यदिग्दर्शनामधलं मोठं नाव होतं. राज कपूर यांच्या ‘संगम’ चित्रपटातील एका गाण्याचं शूटिंग करण्यासाठी ते युरोपला गेले होते. त्याच वेळी मुंबईत राज कपूर-नूतनवर ‘दिल ही तो है’ या चित्रपटातील एक गाणं चित्रीत होत होतं. दिग्दर्शक होते पी. एल. संतोषी म्हणजे ‘घायल’, ‘दामिनी’फेम राजकुमार संतोषीचे वडील. बी. सोहनलाल युरोपात असल्यामुळे आता या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन कोणी करायचं हा प्रश्नच होता. त्यावेळी कोणी तरी सरोज यांचंच नाव पुढं केलं. पी. एल. संतोषी हे सर्व मदत करणार असल्यामुळे सरोजजींनी सुरुवातीला नकार देऊनही कालांतरानं होकार दिला. संतोषी हे एक हुशार दिग्दर्शक. त्यांनी गोंधळलेल्या सरोजला धीर दिला नि काही शब्द सांगून ते तू कसे सादर करून दाखवशील असं विचारलं. पहिले दोन शब्द होते, ‘निगाहे’ आणि ‘मिलानेको’... तिसरं वाक्य होतं ‘जी चाहता है’... सरोजजींनी हे दोन शब्द आणि या वाक्यावर आपल्या भावना देहबोलीद्वारे करून दाखवल्या. तेव्हा संतोषींनी मग ‘निगाहे मिलानेको जी चाहता है’ हे सगळे शब्द एकत्र करीत हे गाण्याचं नाव असल्याचं सांगून त्यावर सादरीकरण करण्यास सांगितलं. सरोजजींनी ते करून दाखवलं आणि ते संतोषींनी लगेचच संमत केलं. याच गोष्टीला नृत्यदिग्दर्शन म्हणतात, ही बाब कळल्यानंतर सरोजजींनी आपल्या डोक्याला हात लावला होता. अशा प्रकारे त्या अपघातानं नृत्यदिग्दर्शक बनल्या.
बी. सोहनलाल यांच्या प्रमुख सहाय्यक म्हणून सरोजजींनी आपली जबाबदारी एवढी छान निभावली की सर्व कलाकारांना नृत्याच्या स्टेप्स आणि भावमुद्रा समजावून सांगण्याचं काम त्यांच्यावरच येई. सोहनलाल आणि सरोजजींना सगळं समजावून सांगत आणि त्यांच्याकडून आत्मसात केलेलं ज्ञान त्या कलाकारांपर्यंत पोचवीत. एकदा तर सरोजजी प्रख्यात अभिनेत्री वैजयंतीमाला यांना नृत्यदिग्दर्शन करीत होत्या. सरोजजींचं काम पाहून वैजयंतीमाला एवढ्या खूश झाल्या की त्यांनी त्यांना २१ रुपये बक्षीस दिले. हा चित्रपट होता ‘डॉ. विद्या’ आणि त्यातलं गाणं होतं ‘पवन दिवानी’. स्टार्सना शिकवण्याचा हा प्रकार सरोजजींना एवढा आवडला होता की भविष्यात मोठी नृत्यदिग्दर्शिका झाल्यानंतर त्यांनीदेखील आपल्याकडे काम करणाऱ्या नवोदितांना अशाप्रकारे तयार केलं आणि त्यांनाही काम करण्याची सगळी मोकळीक दिली. १९६२ ते १९७३ या कालावधीत सोहनलाल यांच्याबरोबर सरोजजींनी काम केलं. मात्र सोहनलाल यांनी आपल्या मुलांना स्वतःचं नाव लावू न दिल्यामुळे सरोजजी त्यांच्यापासून विभक्त झाल्या नि त्यांचा इथून पुढे वेगळाच संघर्ष सुरू झाला.
मुंबईतील केईएम रुग्णालयात परिचारिकेचं प्रशिक्षण घेऊन त्यांनी सहा महिने कामदेखील केलं होतं. तसंच टाईपरायटिंग शिकून ‘ग्लॅक्सो’ कंपनीत त्यांनी टेलिफोन ऑपरेटर म्हणूनही काम केलं होतं. थोडक्यात, कोणतंही काम करण्याची त्यांची तयारी होती. या संघर्षाच्या काळात त्यांना पहिली साथ मिळाली ती अभिनेत्री साधना यांची. साधना त्यावेळी ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाची निर्मिती करीत होत्या. सरोजजींच्या कामावर फिदा असणाऱ्या साधनाने त्यांना पहिल्यांदा नृत्यदिग्दर्शक म्हणून संधी दिली. यावेळी नृत्यदिग्दर्शक म्हणून सरोजजींकडे कोणत्याही संस्थेचं सभासदत्व नव्हते. तेव्हा साधनानं स्वतः पैसे भरून सरोजजींना हे सभासदत्व मिळवून दिलं. या काळात सरोजजींच्या मदतीला आलेली आणखी एक व्यक्ती म्हणजे शशी कपूर. तेव्हा दिवाळी काहीच दिवसांवर आली होती. सरोजजी शशी कपूर यांच्याबरोबर एक गीताचं नृत्यदिग्दर्शन करीत होत्या. एव्हाना त्यांची सोहनलाल यांच्यापासून फारकत झाली होती. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत त्यांना होती. त्यामुळे दिवाळीत तरी आपल्या मुलांना गोडधोड खायला मिळू दे, या इच्छेनं त्यांनी शशी कपूर यांच्याकडे मदत मागितली. त्यावेळी शशि कपूर यांच्या खिशात दोनशे रुपये होते. ते सगळे त्यांनी सरोजजींना देऊन टाकले. विशेष म्हणजे या पैशांची सरोजजींना एवढी मदत झाली की शशि कपूर यांच्या ऋणातून त्यांना कधीच मुक्त व्हावंसं वाटलं नाही. त्यामुळे त्यांनी या पैशांची कधीच परतफेड केली नाही. याच काळात सरोजजी यांच्या शेजारी एक भजीविक्रेता राहायचा. त्याला सरोजजींवर काय वेळ आलीय, याची कल्पना होती. दिवसभराचा आपला व्यवसाय संपवून तो घरी येई आणि आल्या क्षणी तो सरोजजींना उरलेल्या भजी नि ब्रेड देई. अत्यंत स्वाभिमानी असलेल्या सरोजजींना ही गोष्ट आवडली नाही. परंतु, या भजीविक्रेत्यांना त्यांना समजावून सांगितलं की, तुम्ही हे खाऊ नका. परंतु, तुमच्या छोट्या मुलांची भूक भागविण्यासाठी ही भजी नि ब्रेड नक्कीच उपयोगी येईल. अशा प्रकारे काही दिवस सरोजजींची मुलं या भजी नि ब्रेडवर वाढली.
कालांतरानं मग विनोद मेहरा, बिंदिया गोस्वामी, धर्मेंद्र, हेमा मालिनी या कलावंतांनी आपल्या चित्रपटांमधील नृत्यांसाठी सरोजजींना पाचारण केलं. सुभाष घईंनी ‘विधाता’ चित्रपटातील दोन गाण्यांसाठी सरोजजींना विचारणा केली होती. परंतु, त्याच वेळी इतर कलाकारांचे त्या काम करीत असल्यामुळे तारखा जुळेनात. त्यामुळे नकार देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ही बाब घईंना खटकली. त्यांचा थोडा नाराजीचा नि खडा सूर लागला. परंतु, सरोजजींनी खरी परिस्थिती कथन केल्यानंतर त्यांनीही हा विषय फारसा ताणून धरला नाही. उलट या चित्रपटामधील क्लायमॅक्सचं गीत त्यांनी सरोजजींना करू दिलं आणि त्यानंतरच्या ‘हीरो’ चित्रपटामधील सर्व गाण्यांच्या नृत्यदिग्दर्शनाची धुरा त्यांच्यावरच सोपवली. ‘हीरो’मुळे सरोजजींचं आयुष्यच बदललं. पुढे ‘तेजाब’मधील ‘एक दो तीन’ गाण्याच्या लोकप्रियतेनं त्या शिखरावर पोचल्या. यापूर्वी त्यांना एका गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठी १० ते १५ रुपये मिळायचे. परंतु, आपल्यातील गुणवत्ता कॅश करण्याची हीच वेळ आहे, हे ओळखून सरोजजींनी एका गाण्यासाठी एक लाख रुपये मानधनाचा आकडा निश्चित केला. ‘एक दो तीन’ची नशाच अशी होती की सरोजजींनी एकच काय दोन-तीन लाख रुपये सांगितले असते तरी निर्मात्यांनी त्यांना दिले असते. ‘तेजाब’च्या या गाण्याची क्रेझ एवढी जबरदस्त होती की ‘फिल्मफेअर’सारख्या त्या काळच्या अत्यंत प्रतिष्ठित मासिकाला आपल्या पुरस्कारांमध्ये पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक ही नवीन कॅटेगरी निर्माण करावी लागली. ती निर्माण झाल्यानंतर सरोजजींनी सलग तीन वर्षं (१९८९-१९१) हा पुरस्कार ‘तेजाब’, ‘चालबाज’ आणि ‘सैलाब’ या चित्रपटांसाठी मिळवून हॅटट्रीक साधली होती. फिल्मफेअर पुरस्कारांवर सरोजजींचा एवढा करिश्मा होता की हा पुरस्कार त्यांनी आपल्या कारकीर्दीत तब्बल आठ वेळा मिळवला. ‘तेजाब’नंतर सरोजजींकडे चित्रपटांची रांगच लागली. ‘बेटा’, ‘खलनायक’, ‘नगीना’ अशा अनेक हिट चित्रपटांमधील हिट गाणी त्यांनी दिली. माधुरी दीक्षित आणि श्रीदेवीला मोठं करण्यात सरोजजींचा मोठा वाटा होता. या दोघींपैकी माधुरीची नृत्यनिपुणता सरोजजींना खूप भावली, तर श्रीदेवीचा भावनाप्रधान चेहरा त्यांना कमालीचा आवडला. विशेष म्हणजे या दोघीही नम्रपणे आपल्या यशात सरोजजींच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख करीत.
कोणत्याही कलाकाराला आपला व्यवसाय म्हणजे रोजी-रोटी असतो. सरोजजींनी नृत्यप्रकाराला तर आपला देवच मानलं होतं. एखाद्या स्टुडिओत नृत्यदिग्दर्शनासाठी जायची वेळ आली की त्यांना आपण एखाद्या मंदिरात जात असल्यासारखंच वाटायचं. गुरुंवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. भले सोहनलाल यांच्याबरोबर वैयक्तिक जीवनात त्यांनी फारकत घेतली असली तरी अडचणीच्या क्षणी त्य़ांना आपल्या या गुरुची आठवण येई आणि मार्ग सापडे. नृत्य प्रकाराचा उल्लेख त्या कर्ते की विद्या अशा शब्दांमध्ये करीत. म्हणजे ज्याला मनापासून नृत्य करायचं आहे, त्याच्यासाठी काहीच अशक्य नाही, असं त्या बोलून दाखवत. माधुरी, श्रीदेवी, वैजयंतीमाला या नृत्यात निपुण असल्या तरी हेलन यांचं नृत्यकौशल्य वेगळंच होतं, असं त्या आवर्जून म्हणत. मात्र बराच काळ नृत्यापासून दूर राहून ‘खामोशी दि म्युझिकल’ या चित्रपटाद्वारे पुन्हा नृत्याकडे वळलेल्या हेलन यांना एकेक पाऊल उचलण्यासाठी किती त्रास झाला होता, याचा अनुभव सरोजजींनी घेतला होता. आपल्या कामावर प्रचंड निष्ठा असणाऱ्या सरोजजींनी म्हणूनच दिग्दर्शकाला शूटिंग पुढं ढकलायला सांगून तब्बल एक महिनाभर हेलन यांच्याकडून नृत्याची प्रॅक्टिस करवून घेतली होती. त्या स्वतः भरपूर कष्ट करीत नि इतरांकडूनही तशीच अपेक्षा ठेवत. ‘छडीमें दम होना चाहिए, तो कुत्ताभी नाच लेता है’ असं त्यांचे गुरु सोहनलाल म्हणत. केवळ म्हणण्यापुरतंच मर्यादित न राहता सोहनलाल यांनी आपल्या घरातील कुत्र्याकडून नृत्य करवून घेतलं होतं. ही बाब सरोजजींनी आयुष्यभर लक्षात ठेवली होती.
सरोजजींनी हिंदी चित्रपटसृष्टीतील नायिकांबरोबरच नायकांनाही नृत्यपारंगत केलं. आमिर खान त्यांचा विशेष लाडका. मात्र सर्वोत्तम नर्तक म्हणून त्यांची सर्वाधिक पसंती होती ती गोविंदाला. गोविंदासारखं सहज नृत्य कोणी करू शकत नाही, असं त्या नेहमी म्हणत. नॉनडान्सर्स नायकांना नृत्य शिकवायला, त्यांच्याकडून काम काढून घ्यायला त्यांना अधिक आनंद मिळे. गेल्या दशकभरात हिंदी चित्रपट कमालीचा बदलला. सर्व तरुण मंडळी आली. त्यामुळे सरोजजींना काम मिळेनासं झालं. परंतु, त्यामुळे त्या नाउमेद झाल्या नाहीत. त्यांना माहिती होतं की आणखी काही वर्षांनी पुन्हा काळ बदलेल आणि आपल्या पद्धतीच्या नृत्यशैलीला पुन्हा मागणी येईल. अगदी तसंच घडलं नि जान्हवी कपूरसह इतर नवोदितांनी दिग्दर्शकांकडे सरोजजींच्या नावाचा आग्रह धरला. तसेच केवळ पैशांसाठीही पैसे नाकारले नाहीत. मराठी तसेच इतर प्रादेशिक भाषांमधल्या चित्रपटांचं बजेट कमी असल्याची त्यांना कल्पना होती. तरीदेखील त्या कमी पैशांमध्ये या चित्रपटांचं काम करीत. मात्र, आपल्याकडून त्या नेहमीच १०० टक्के देण्याचा प्रयत्न करीत. आयुष्यात एवढे दुःखाचे प्रसंग येऊनही सरोजजी खचल्या नाहीत. त्यांच्याकडे ‘स्वीच ऑफ’ आणि ‘स्वीच ऑन’ होण्याचं खूप छान कसब होतं. त्यामुळे घरात कितीही गंभीर गोष्ट घडली असली तरी सेटवर आल्यानंतर संगीताचे सूर कानी पडले की त्या सगळं विसरून जात. पाश्चिमात्य नृत्यापेक्षा भारतीय नृत्यामध्ये कलाकाराच्या अदाकारीचा कस लागतो, हे त्या आवर्जून सांगत. कारण पाश्चिमात्य संगीताचा रिदम एवढा वेगवान असतो कलाकाराचे एक्स्प्रेशन्सच प्रेक्षकांपर्यंत पोचत नाहीत. त्याउलट भारतीय नृत्यामधील ठेहराव हा कलाकाराला आपले कलागुण दाखविण्याची पुरेपूर संधी देतो, याची जाणीव सरोजजी आपल्याकडे येणाऱ्या निर्माता-दिग्दर्शकांना कायम करून देत. तसेच कोणतंही नृत्य चांगलं जमण्यामागच्या प्रमुख दोन गोष्टी म्हणजे नृत्याचं चित्रीकरण आणि कलावंतांनी प्रत्यक्ष सादर केलेलं नृत्य. आपल्या सावलीकडे पाहून नृत्य करणाऱ्या सरोजजींच्या प्रेमाच्या सावलीचा अनुभव अनेक नायक-नायिका, निर्माते-दिग्दर्शकांनी घेतला. हे सावली देणारं झाडच आता उन्मळून पडलं आहे.
- मंदार जोशी