लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम
X
सकाळी 7 वाजता उठायचे, जिमला किंवा मॉर्निंग वॉक ला बाहेर पडायचे, परत घरी येऊन मस्त फ्रेश व्हायचे, तोपर्यंत आपल्या आवडत्या व्यक्तीने केलेले पोहे, उपमा किंवा डोसे असा हेल्दी नाश्ता करायचा, रात्री इस्त्रीवाल्याने दिलेले इस्त्रीचे कपडे बाहेर काढायचे, आपला आवडता शर्ट, आवडता ड्रेस शोधायचा. कपडे घालून तयार व्हायचं. आरशासमोर उभे राहून केस विंचरणे, हलका मेकअप करणे आणि मग रात्री काम करत बसलेल्या टेबलावर, सोफ्यावर, टीपॉय वर असलेला लॅपटॉप, वही पेन इ. आपल्या बॅग मध्ये भरणे. मध्ये मध्ये घड्याळ बघणे आपण लेट तर नाही ना. डबा टेबलावर रेडी असतो तो उचलणे आणि बॅगेत भरणे आणि आपल्या हक्काच्या कामासाठी घराबाहेर पडणे. मिळेल ती ट्रेन ,बस पकडणे आणि ऑफिस ला पोहचणे. हा इतका घाईघाईतला तरीही आवडीचा दिनक्रम सगळ्यांचा आयुष्याचा एक मोलाचा भाग आहे. असं सगळ्यांचं आयुष्य ठरल्याप्रमाणे सुरु असताना अचानक एक कुठनंतरी डोळ्यांना न दिसणारा "विषाणू "काय येतो आणि आपलं पूर्ण आयुष्य थबकतं. आपण सगळे जगतमान्य "लॉकडाऊन" मध्ये अडकतो.
लॉकडाऊन हा प्रतिबंधक उपाय असला तरी आजकाल तो काहींच्या जीवावर उठला आहे तर काहींना सुखद वाटतो आहे. म्हणजे घरातच थांबा. आपल्या ऑफिसचे काम ही घरातूनच करा. म्हणजे "वर्क फ्रॉम होम". म्हणजे जे काम आपण रोज तासंतास प्रवास करून ऑफिस ला जाऊन करतो ते आता घरातूनच करा. कुणाचं बेडरूम, कुणाचा हॉल ,कुणाचं dining table, ईतर. याने सध्या ऑफिस रूप धारण केले आहे. अंघोळ करून आल्यावर आहे त्या कपड्यावर थेट आपल्या रूम मध्ये जाऊन काम करत बसणे. हि अतिशय हवीहवीशी कल्पना. पण आता बरेच जण या हवीहवीशी कल्पनेला कंटाळले आहेत. लोकांना बाहेर पडायचे आहे. त्यांना ती ऊर्जा हवी आहे जी त्यांना जगायला कारणीभूत ठरते आणि ती घराबाहेर जाऊनच मिळते. लोकं दूध ,भाजी यासाठी का होईना बाहेर पडून आपली हौस भागवत आहे.
जे फ्रीलान्सर आहेत त्यांना या "वर्क फ्रॉम होम" कन्सेप्ट चा असा काही फरक पडला नाही. ते घरात राहून आपले विश्व उभे करू शकतात. तशी त्यांना सवय असते, पण जे रोज बाहेर जाऊन नोकरी करतात त्यांना ही कन्सेप्ट जरा वैतागाची वाटते. एकतर त्यांना रोजची सवय प्रवास करण्याची. वर्क फ्रॉम होम काही दिवस जरी हे सुखकारक वाटलं असेल तरी आता बांधून घातल्यासारखं फीलिंग येतंय. घरून काम असलं तरी दिवसातून 3 वेळा बॉस ला रिपोर्ट करा, लॉगिन लॉगआऊट टाइम फॉल्लो करा. तुमचे तास मोजून काम करा. कारण पगार त्यानुसारच मिळणार आहे. "वर्क फ्रॉम होम" हे एक असे स्वातंत्र्य आहे जे बंदिस्त आहे. व्हिडिओ मीटिंग, रोजचे तासतास भर कॉन कॉल. परत या सगळ्यांचा रिपोर्ट. हे जरा कंटाळवाणं आहेच आणि आपल्या घरात राहून हे असं काम करणं म्हणजे अजून जास्त कंटाळवाणं.
घर म्हंटलं की कसं हवं तेंव्हा झोपणे, हवं तेंव्हा खाणे, गप्पा मारणे, कॅरॅम, पत्ते खेळणे हे करणं म्हणजे घरी असणं. पण वर्क फ्रॉम होम मुळे घर घर न राहता ऑफिस झाले आहे. कॉन कॉल आला की इतरांनी हळू बोलणे किंवा मौन पाळणे, टीव्ही चा आवाज कमी करणे ,घरच्यांचा आपल्या कामात त्रास न होणे. हे जरा औघडच काम आहे. कारण घरच्यांना असं वागण्याची सवय नसते आणि तसे वातावरणही तयार होत नाही. यामुळे तेही वैतागले आहेत आणि काम करणारे सुद्धा. याकाळात सर्वात वाईट वाटणारी गोष्ट म्हणजे, लहान मुलांनी हट्ट करणं सोडून दिलंय, जरी मागितले तरी ते त्यांना देता येत नाहीये. बाहेर खेळायला जाणं बंद झालय त्यांचा खऱ्या अर्थाने ते बंदिस्त जग अनुभवत आहेत. त्यांच्या मनावर थोडा का होईना परिणाम होत आहे.
यामध्ये सकारत्मक गोष्ट सुद्धा आहे. आपल्या जगण्याचा अर्थ हा आपल्याच प्रवासात असतो तो शोधवा लागतो आणि तो शोधण्यात एक मजा आहे. पण आपल्या "नियोजनबद्ध" जगात तो वेळ आपल्याला कधीच मिळत नाही. हे लक्षात आलं नसेल तर ते ओळखा. ही संधी कधी मिळणार नाही. आपलं घर, आपली माणसं आपली शक्ती वाढवतात मग ती शरीराची असो किंवा मनाची. इतकी मोठी ताकत या घरात लपलेली आहे ती बाहेर काढा. लॉकडाऊन संपल्यावर याची गरज सर्वात जास्त असणार आहे आपलं मन अणि डोकं शांत करण्यासाठी. कारण पुढचा काळ सोपा नसणार आहे.
21 दिवसांचा लॉकडाऊन आपण सर्वांनी पूर्ण केला. यात सगळ्यांनी बरेच नवीन अनुभव घेतले असतील ते ही आपल्याच घरात. आता लोकांना घराबाहेर पडायचे आहे. त्यांना तो प्रवास हवा आहे, त्यांना तो ट्रेन चा आवाज ऐकायचा आहे. त्या गर्दीत त्यांना पुन्हा स्वतःचे अस्तिव शोधायचे आहे. लॉकडाऊन मूळे जग कसं अचानक थांबलं आहे. पण ते कायमचे नाही ते पुन्हा सुरळीत सुरु होण्यासाठीच.
-प्रशांत कांबळे