Home > Max Woman Blog > पक्षांची 'माझं कुटूंब माझी जबाबदारी' आणि माणूस

पक्षांची 'माझं कुटूंब माझी जबाबदारी' आणि माणूस

आपल्या आजुबाजुला असणाऱ्या पक्षांच्या किलबिलाटाचा कधी अर्थ काढण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का? पक्ष्यांमध्ये माणसांप्रमाणे मादी (स्त्री) जातीलाच पिलांचं पोषण करण्याची जबाबदारी असते की, दोघांवर? यासह पक्षांच्या अनेक गमतीजमती समजून घेण्यासाठी वाता डाॅ. हेमलता पाटील यांचा लेख

पक्षांची माझं कुटूंब माझी जबाबदारी आणि माणूस
X

आज सगळ्यांशी मी स्वतः हस्तगत केलेले ज्ञान शेअर करण्याचा मुड आहे. अर्थात त्याला कितपत शास्त्रीय आधार आहे हे मला माहित नाही. पण महत्त्वाचे असे की हे ज्ञान WhatsApp किंवा गुगल इंडस्ट्री मधून आले की, पाठव पुढे अशा पठडीतील नाही किंवा यात अंधभक्तांसारखी ठोकमठाक ही नाही. तर करोना काळात श्वास गुदमरत असताना "उघडा डोळे बघा नीट" या न्यायाने आत्मसात केलेले आहे. हे दिव्य ज्ञान मघाशी सांगीतल्या प्रमाणे माझी स्वतःची निरीक्षणे आहेत. ती चुकीची असण्याची दाट शक्यता आहे. पक्षी मित्रांनी ती दुरूस्त करावीत. अर्थात यात थोडीफार ठोकमठाक आहे. पण ज्या ठिकाणी ठोकमठाक आहे. त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे स्माइली टाकेण. त्या वर कृपया जाणकारांनी स्पष्टीकरण देण्याच्या फंदात पडू नये. मला वाटते एवढे नमनाला घडाभर तेल पुरेसे आहे.

तर मुद्दा हा की मागे सांगीतल्याप्रमाणे मला कधी कधी ऋषी कन्येचा फील येतो आणि आपल्याला प्राणी/पक्षांची भाषा कळतेय असं वाटालया लागते. विशेषत:भल्या पहाटे चार साडेचार ला पक्षांची किलबील सुरू होते. विविध सुरांचे तरी ही एकजिनसी वाटणारे हे मिश्रण असते. तेव्हा मी हे आवाज टिपते. कालांतराने माझ्या लक्षात आले की, वेगवेगळ्या मुड मध्ये त्यांच्या आवाजात किंचीत वेगळा फरक असतो आणि त्याच वेगवेगळ्या टोन वरून भीती/आनंद अशा वेगवेगळया भावना व्यक्त करीत ते संवाद साधतात.

उदा. मध्यंतरी एक भारद्वाज चुकून माझ्या घरात शिरला. घाबरून तो खर्जातला पक्वाक पक्वाक असा आवाज काढायला लागला. मी खिडक्या उघडल्या तरी कसे बाहेर जावे. हे न कळल्यामुळे तो गोंधळला. तो बहूधा नर असावा कारण समोरच्या फांदीवर बसलेली मादी तार सप्तकात प्वsssवावाsssवाक अशी ओरडली. थोडक्यात तिने असे म्हटले

"अरे माठ्या तुझ्या डोस्क्यावरची खिडकी उघडी आहे. डोळे फुटले का तुझे? मी आहे म्हणून आत्तापर्यंत तुझे निभावले!! नाहीतर काही खरं नव्हतं तुझं. इकडे तिकडे कुठेच न बघता सरळ वर पंख मार ".. आणि काय आश्चर्य अज्ञाधारक त्याने क्षणार्धात वरच्या दिशेने झेप घेतली आणि डायरेक्ट तो तिच्या जवळ गेला. मग कितीतरी वेळ मध्य सप्तकातील त्यांचे पव्क पव्क असे चालू होते.

...तर सांगायचा मुद्दा हा की संकट आल्यानंतर, सावध करताना आणि सुटका झाल्या नंतर वेगळा पॉक असतो. आणि सर्वात महत्त्वाचे हे की भारद्वाज भारदद्वाजनीच्या शब्दाबाहेर नसतो...


आता या फोटोत दाणे टिपणाऱ्या चिमण्या आहेत ना? त्या मध्ये गळ्यावर काळे म्हणजे चिमणा आणि काळे नसणारी चिमणी. चिमणा दिसायला देखणा असतो. त्या मानाने चिमणी animic दिसते. बहूतांश वेळा ते एकत्र फिरतात. धान्य जितक्या आवडीने खातात. तितक्याच आवडीने कीडे पण खातात. बोट दिले की हात धरणारी अशी ही जमात आहे. म्हणजे अंगणात टाकलेले धान्य खाता खाता त्याच निर्धोकपणे त्यांचा घरात वावर सुरू होतो आणि मग पावा चे बिस्किटचे कण खाता खाता त्या आपल्याला "लब्बाड रामदेव बाबा कुठली स्वतः चवीचे खाते आणि आम्हाला बिनशिजवीलेले अन्न खायला सांगते" असंच काहीसं म्हणत रहाते.

बाकी पक्षांमध्ये साळुंखी थोडीफार जवळून जाईल. पण बाकीचे पक्षी घरात डोकावण्याच्या भानगडीत पडत नाहीत. पण चिमणी मैत्रीचा हात लवकर पुढे करते. चिमणा आणि चिमणी खाताना एकमेकांशी फार संवाद न करता टिपत रहातात. बराच वेळा एकमेकांकडे पाठ करून ते खात रहातात...

पण जर दोन मादी चिमण्या एकत्र आल्या की, मात्र त्या अखंड बडबड करतात. त्यांचे टॉपिक सांगीतले तर प्रबंधच होईल . दुसरे असे की आजकाल त्यांना आपण वनरूम किचन प्रोव्हाईड करून चांगलेच आळशी केलेय. त्यामुळे आता घरटे बांधायच्या त्या फंदात पडत नाहीत तर त्या या रेडिमेड घरट्यात अंडी घालतात. पिल्ले झाल्यानंतर त्या सतत पिलांना खायला घालतात. पिल्ले पण आई घराजवळ आली की, चिक असा आवाज काढून छिद्रातून चोच बाहेर काढतात आणि आईच्या चोचीतले अक्षरशः हिसकावून घेतात. या फोटोमध्ये जी पिल्ले दिसतात. ती काल सकाळी त्यांच्या आई वडिलांसकट या घरातून गायब झाली.

सकाळपासून चिमणा/चिमणी पण तिकडे फिरकली नाहीत. म्हणून मी प्रचंड अस्वस्थ झाले. पण सकाळ सकाळी नवऱ्याने चिमण्यांचे जोडपे आणि त्यांचे नुकतेच पंख धरायला लागलेले अशक्त पिल्लू गॅलरीत दाखवले. पिले उडण्यासारखी झाली की ते घरटे सोडतात का? आणि पिल्लू घरट्यातुन बाहेर पडले की, ते परत त्या घरट्यात जात नाहीत का? म्हणजे आपल्या सारखे फुकटचा वनरूम किचन मिळाला म्हणुन काय झाले? उगीच कशाला हक्क सोडायचा? असा काही मामला त्यांच्यात नसतो का? जाणकारांनी कृपया स्पष्टीकरण करावे.


आत्ता हा जो सिझन चालु आहे. याच कालखंडात बऱ्याच पक्षांची अंडी घालून झाली आहेत. बहूसंख्य ठिकाणी टॅह टॅह पण सुरू आहे. एक एक काडी आणुन घरटे बांधण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास मी अगदी जवळून पाहिला आहे. बाकीच्या पक्षांनी चिमण्यांसारखे रेडिमेड घरटे प्रेफर केले नाही. हे पक्षी घरटे करताना उंबर, भोकर, पिंपळ, वड अशी झाडे सिलेक्ट करतात. खरं तर पक्षी आपल्या देशी झाडांशी ज्यास्त कंफर्टेबल असतात.

मोठे पाम, फायकस, झाडू बांबू या झाडांशी त्यांना विशेष ममत्व नसते. माझ्या घरी सगळीच देशी झाडे असणे. हे ही कारण पक्षांची एवढी मांदियाळी भरण्याचे असावे. सागाच्या झाडावर ते विसावतात पण उंबर, पिंपळ, पेरू, भोकर त्यांना विशेष प्रिय. मला एक अतिशय सुंदर पिवळ्या पक्षांची जोडी रोज दिसते. पण ते चक्क बाभळी वर रहातात. बाभळीबाबत पण जाणकारांनी प्रकाश टाकावा. कारण त्यांचे बाभळी प्रेम काही केल्या माझ्या पचनी पडत नाही.

कुसुमाग्रजांनी उगीच म्हटलंय का प्रेम कुणावरही करावे... त्या सुंदर पक्षांना पहायचं असेल तर ते तुम्हाला हमखास बाभळीवरच दिसणार.

माझ्या घरचे उंबर अगदीच डेरेदार. तिथे दोन वेगळ्या फॅमिलींनी घरटे बांधले. एक फॅमिली spot breasted fantail(नाचण) त्यांनी अगदीच झाडाचे टोक सिलेक्ट केले. मला तर भितीच वाटायची बापरे हे टिकणार कसे? एका घरट्यात तीन राखाडी रंगाची अंडी आली. दुसऱ्या फॅमिलीने oriental magic Robin(दयाळ) जरासे ऐसपैस घरटे बांधले. हे महाशय मुड मध्ये आले की मस्त शिळ मारतात. हे पक्षी घरटे बांधताना पण झाडाच्या फांदीचा एक विशिष्ट कोन शोधतात. हे पक्षी म्हणजे आदर्श पालक असतात.

बहूदा साळूंखी, सरडा, साप आणि कावळे यांचा या अंड्यांवर डोळा असतो. परत जाणकारांनी माहिती द्यावी. कारण मला तसा फिल आलाय... नर आणि मादी या पैकी कोणीतरी एक सतत या अंड्यांजवळ असतो. क्वचितच थोड्या वेळा साठी कोणी नसेल तर ते समोरच्याच फांदीवरून टेहाळणी करीत असतात. एकदा अचानक दोन साळुंख्या आल्या तेंव्हा त्या चिमुकल्या पाखरांनी ज्या पद्धतीने त्यांना हाकलून लावले तो थरार अनुभवण्या सारखाच होता. कावळ्यांना ही हे पक्षी दाद लागू देत नाहीत.



एका फोटोत नुसतेच एक उथळ घरटे दिसतेय. त्यात ती राखाडी तीन अंडी होती. एक दिवस त्या पक्षांनी माझ्या समोर ती तीन अंडी दुसरीकडे हलविली. मला अक्षरशः धस्स झाले. असे काय घडले? ती अंडी का हलविली? काहीच कळेना. मी प्रचंड अस्वस्थ कशातच लक्ष लागेना.

रात्री ताउक्ते वादळाचा प्रभाव जाणवू लागला प्रचंड वारा सुटला. रूममधुन उंबरा ची १८० डिग्री मधली हालचाल जाणवायला लागली. आमच्या संपुर्ण घराला माॉनेस्ट्रीमध्ये असतात तशा घंटा टांगल्या आहेत. त्यांचा होणारा टण टण आवाज... वारा, पाऊस आणि लाईट गायब आणि मग अंडी गायब होण्यामागचा एक आशावाद उगीचच वीजे सारखा माझ्या मनात तरळून गेला. कदाचित आजच्या वादळाची या पक्षांना चाहूल लागली असावी का? म्हणून तर सकाळीच सुरक्षित जागी स्थलांतर केले असावे का? कदाचित असेच असावे अगदीच दिलासा देणारे हे विचार. पण आणखी एका घरट्यात तीन अंडी आहेत त्याचे काय?

रात्री चे दोन वाजले असावेत. मी टॉर्च घेऊन गॅलरीत आले. पण मिट्ट काळोखात काहीच दिसेना. माझा नवरा पण पाने, फुले, पक्षी यांच्याशी खूप ज्यास्त कनेक्टेड आहे. किंबहूना पक्षांच्या बारीकसारीक गोष्टींचा तपशील तो ठेवतो आणि त्याचे आडाखे ही बरोबर असतात पण तो ही घाबरला. रात्रभर उंबराच्या फांद्या आणि मी एकाच लयीत या कुशी वरून त्या कुशीवर करीत होतो.

शेवटी एकदाचा ब्रम्ह मुहुर्त आम्ही गाठलाच. दोघेही पळत पळत परत गॅलरीत आलो अस्पष्ट दिसले. ते दृष्य पाहून आम्हाला शब्दच फुटेना. पावसात कुडकुडत तो पक्षी त्या अंड्यावर स्थिर बसुन होता आणि त्या उंबरा ने आपल्या सहस्त्र हाताने त्या घरट्या ला संभाळले होते.

दोनच दिवसांनी सकाळी सकाळी नवऱ्याने जोरात हाक मारली. मी पळत पळतच गॅलरीत गेले तर घरट्यात तीन नवागतां चे आगमन... अगदी सरपटणारे जीव... मग सुरू झाले पॅरंटिंग. दोघे मिळून त्यांना घास भरविणे,पक्षांना पिटाळून लावणे.. हे पक्षी आदर्श पालक असतात... म्हणजे आपल्या सारखं यांच्यात नसते म्हणजे असे... "आई जरा ये ना माझ्या कडे मला याला संभाळणे जड जातंय" किंवा शेजारच्या ना सांगुन "मी जरा बाहेर जाऊन येते तो पर्यंत आमच्या बंड्याकडे लक्ष द्या रांगायला लागलाय आताशा तो".


असला काही मामलाच नाही मुख्यमंत्र्यांच्या आवहनाप्रमाणे "माझे कुटूंब फक्त माझीच जबाबदारी" हे घोषवाक्य अगदी शंभर टक्के अंमलात आणणारी जमात म्हणजे हे पक्षीच. जेव्हा ही पिल्ले घरट्या बाहेर पडली की मग हे लोक एकमेकांना भेटतात की नाही? ओळखतात की नाही? काहीच माहीत नाही. पक्षी मात्र, आपल्याच प्रजातीत वावरतात म्हणजे मला कधी दोन साळुंख्या दोन कावळे दोन चिमण्या दोन बगळे शिळोप्याच्या गप्पा मारताना दिसले नाहीत. मी तर असे मार्क केलेय की त्यांची आवडीची झाडे सुद्धा वेगवेगळी असतात.जशी की महावीर कॉलनी, जैन कॉलनी, सिंधी कॉलनी, तांबट लेन.. इ.इ.

बहुतेक वेळी पक्षी जोडीनेच दिसतात. पण पार्टनर तोच असतो की, रोज बदलतो माहित नाही. बहुतेक "हम है राही प्यार के हम से कुछ न बोलिये जो भी प्यार से मिला हम उसिके हो लिए" असाच मामला असावा.

पक्षांचे जग नक्कीच अदभुत आहे. अनेक भावभावनांचा संगम जवळ बाळगत ते अखंडपणे जीवन गाणे गात रहातात हे मात्र नक्की. मी अनुभवलेले आणि माझ्या बुद्धी नुसार आकलन केलेले हे अनोखे विश्व... तुर्तास इतकेच

डॉ. हेमलता पाटील (सदर पोस्ट डॅा. हेमलता पाटील यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Updated : 30 May 2021 7:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top