Home > Max Woman Blog > हातापायांवरचे केस लपवता येतात पण तोंडावरच्या केसांचं काय करावं बाई?

हातापायांवरचे केस लपवता येतात पण तोंडावरच्या केसांचं काय करावं बाई?

महिलांना देखील चेहऱ्यावर केस येतात पण का? आणि त्यांच्या चेहऱ्यावर केस आले तर त्यांचं सौंदर्य नाहीसं होतं का? ही नेमकी भानगड काय आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर हिमाली कोकाटे यांनी प्रकाश टाकलेला हा लेख जरूर वाचा....

हातापायांवरचे केस लपवता येतात पण तोंडावरच्या केसांचं काय करावं बाई?
X

रात्रीचे अकरा वाजून गेले असतील न तिकडे आता म्हणजे मग या 'अशा' पोस्टीचं टायमिंग बरोबर आहे बहुतेक असं स्वतःला सांगून लिहीतेय. त्याचं काय आहे की दिवसभर सगळं छान, छान'च' पहायचं, ऐकायचं असतं. जराही अवघडलेपण यायला नको म्हणून मग हे आता. थोडी लाज वाटली, बरंचसं अवघडलेपण वाटलं तरी रात्रीचा काळोख सावरून घेतो. सकाळी उठून पहिले पाढे पंचावन्न झाले तरी हरकत नाही


तर त्याचं काये की एक आजार (?) आहे - PCOD/PCOS म्हणतात त्याला - Polycystic Ovarian Disorder/Syndrome. स्त्रियांना होतो. कधीकधी अनुवांशिकतेने तर कधीकधी सवयींमुळे. या 'वाईट' सवयी - कमी व्यायाम, बाहेरचं वरचेवर खाणे, पाळी पुढे-मागे ढकलण्यासाठी घेतलेली औषधं, वाढलेली जाडी, विशेषतः पोटावरची चरबी वाढणे ई. या सवयी आता आयुष्याचा भाग आहेत. करियर, घर यांच्यातल्या रस्सीखेचातून यांचा जन्म झाला असावा. काहींच्या बाबतीत ही रस्सीखेच नसली तर जन्मजात आळस असतो, खोटं कशाला बोला. तर हा का होतो वैगेरे असं टाईपलं की गुगल आत्या एका मिली सेकंदात २ लाख का काय त्या हिट्स दाखवतात त्यामुळे खरंच कुतुहल असेल तर विचारा आत्याला


ही पोस्ट त्यासाठी नाही

ह्या Syndrome म्हणजेच लक्षणसमुहातलं एक लक्षण म्हणजे Hirutism - यात काय होतं की बाईला दाढी, मिशी येते. अंगावर राठ, दाट केस वाढतात, सगळीकडे. यांची वाढही अतिशय वेगाने होते. म्हणजे पार अनिल कपूर नाही होत पण ज्याला आपण नाजूक लव म्हणतो तितकी कमी पण नसते. आता बाईला दाढी, मिशा म्हणजे यक्क नाही का?? बाई की बाब्या हा??? बिना वॅक्सिंग करून स्लीवलेस घालतेय, कॅप्री पॅंट घालतेय - बावळट कुठली. So LS च म्हणजे





तरी हातापायांवरचे, पोटावरचे केस लपवता येतात, झाकतां येतात पण तोंडावरच्या केसांचं काय करावं बाई? आता आजार आहे, होतोय त्रास पण तरी बाईच्या तोंडावर केस??? जगबुडीच होणार. मग ती बाई/मुलगी वडिल/दादाचा रेझर एकदा वापरून पाहते. गुळगुळीत त्वचा होते. कोणी हसणार नाही आणि हे पटकन करताही येतं म्हणून ती खुश होते पण या आजारात केसांची वाढ इतकी पटापट असते की सकाळी उठून ती आरशात पाहते आणि रात्रीत बबलीचा बंटी झालेला असतोय. मग परत शोधा तो रेझर. तर असं हे बंटी-बबली-बंटी प्रकरण चालू राहतं. औषधं घेतली जातात, वजन कमी करण्याचा सल्ला मिळतो. ते जसं जमेल तसं केलंही जातं पण केस वाढतात ते वाढतातच. जिते असे पर्यंत त्याला आता मरण नाही. लेझर करायला खूप पैसे आणि upkeep लागते. वॅक्सिंग करायला सतत कोण पार्लरला जाणार किंवा ते रोज करत बसणार? अपुऱ्या वेळेच्या गणितात रेझरच फिट होतो. पण शोलेतलं सोडलं तर इतर प्रत्येक नाण्याला दुसरी वेगळी बाजू असते. ते रेझर रोजच्या रोज (होय) वापरलं की चेहऱ्यावरची त्वचा, तेवढा भाग काळसर, निळा होतो. स्पर्शाला कोरडा आणि 'पुरुषी' वाटतो. मग ते लपवण्यासाठी मेकअप करा, कन्सिलर लावा वगैरे. आजार आहे तिथेच आहे पण आपल्याकडे दिसणं, ते ही बायकांसाठी इतकं इतकं महत्वाचं आहे की लक्षणं लपवण्यातच बायांचा वेळ आणि पैसा दोन्ही जातो



हा नवीन शतकाचा, आधुनिकतेतुन जन्मलेला आजार आहे मान्य पण बाईचं अंग तुळतुळीत लोण्यासारखंच हवं ही अपेक्षा आता आऊटडेटेड व्हायला हवी की नकोय?

मग फेबुवर फोटो अपलोड केला की अप्परलिप्स केले नाहीस वाट्टं, मिशी आलिये वाट्टं अशा फालतू कमेंट्स करणं टाळायला हवं ना? तरी हे कमीच आहे. अशा बायकांना छक्का म्हणून चिडवताना मी ऐकलंय. अंगावर केस असणं हे नॉर्मल आहे. काहींना PCOD नसूनही, जन्मतःच असतात. Some women are hairy. Period. मग त्या कशा बाईसारख्या दिसत नाहीत हे सांगायचा विडा उचललेला असतोय का आपण? दिसला बाईच्या ओठांवर केस किंवा हनुवटीवर केस तर इतकं अवघडलेपण वाटायला होतं काय नक्की??


Our bodies are beautiful BUT our bodies are also gross. It's normal. हे स्वीकारणं इतकं जड का?

PCOD तशीही त्या बाईच्या डोक्याची मंडई करायला पुरेसा असतो मग जर आपण त्यावर परत ह्या दिसण्याच्या अपेक्षा लादून देत असतो. बऱ्याच बायका मग वाईट वाटून घेत राहतात, स्वतःच्या शरिराला कोसत, दोष देत राहतात. बऱ्याच कोवळ्या वयातल्या मुली बुलींगच्या शिकारी होतात आणि शरिराबाबतचा न्यूनगंड मनात ठेवून जगत राहतात. ते ही कशासाठी तर बाईने सेक्सी बाईसारखंच दिसलं पाहिजे ह्या चौकटीपाई?? दुर्दैव आहे हे


अगदी बायांनी दाढी मिशा वाढवून त्याचे फोटोज सोशल मिडीयावर टाकून हॅश टॅगच चालवावा चामारी असं सांगत नाहीये मी (लिहावं लागलं कारण आजकाल कशाचा हॅश टॅग बनेल काय भरवसा नाय बाबा) पण चुकून एखाद्या मैत्रिणींचं असं काही दिसलं, जाणवलं तर त्यावर पांचट कमेंट न करणं हे ॲक्च्युली शक्य असतंय. करून पहा. जमतं हळू, हळू


हे सगळं कैच्याकै आहे असं वाटत असेल तर गुगल आत्याला विचारून पहा

लेखक

हिमाली कोकाटे

Updated : 20 May 2022 10:50 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top