करूणा मुंडेंना ISI ची एजंट म्हणून घोषित करा!
X
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आलेल्या करूणा शर्मां-मुंडेंना काल अटक केली गेली. जातीवाचक शिवीगाळ केली व पिस्तुल बाळगल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना चौदा दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे. करूणा शर्मा प्रकरणात दिसलेली पोलिसांची तत्परता पाहून सत्ता किती ताकदवर असते? याचा प्रत्यय आला. पोलिसांनी करूणा शर्मा यांना फक्त पाकिस्तानच्या आय एस आय या संस्थेची एजंट असल्याचे घोषित करणे बाकी ठेवले आहे. कदाचित करूणा शर्मा शांत झाल्या नाहीत. त्यांनी त्यांचे बंड चालु ठेवले तर येणा-या काळात त्यांना पाकिस्तानी एजंट असल्याचेही घोषित केले जाईल. त्यांच्या घरात आरडीएक्स सापडेल असे वाटते.
करूणा शर्मा परळीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घ्यायला आल्यावर त्यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचे व त्यांनी पोटात चाकू खुपसल्याचे आरोप करण्यात आले आहेत व तसे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले आहेत. तसेच त्यांच्या गाडीत पिस्तुल सापडले म्हणूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजचा सगळा हा लवाजमा, पोलिसांची तत्परता पाहता पोलिस सत्तेचे गुलाम असतात. सरकारवाले पोलिसांना आपल्या तालावर हवे तसे नाचवू शकतात. कुणाचीही कशीही वाट लावू शकतात हे सिध्द होते. करूणा शर्माचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर किती केसेस टाकल्या जातायत? त्यांना किती गुन्ह्यात अडकवले जात आहे? त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले आहेत ते कितपत खरे आहेत? हा संशोधनचा विषय आहे. धनंजय मुंडे हे सामाजिक न्यायमंत्री आहेत. त्यांच्यावर आरोप करणा-या त्यांच्याच कधी काळच्या प्रियसीवर असे गुन्हे लादले जात असतील तर ते इतरांना काय सामाजिक न्याय देणार आहेत ?
करूणा शर्मा बरोबर की चूक हा नंतरचा भाग पण त्यांच्यावर सत्तेचा वापर करून असे गुन्हे लादणे कितपत योग्य आहे? त्यांनी परळीत येवून पत्रकार परिषद घेणार म्हंटल्यावरच अँट्रॉसिटीची तक्रार द्यायला लोक कसे पुढे आले? कालच कसा त्यांनी चाकू हल्ला केला? इतके दिवस हे सर्व तक्रारदार कोठे होते? पोलिसांनीही इतक्या तत्परतेने कशी काय केस दाखल केली? राज्यात इतर ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ झालेल्या असतात. तिथे पोलिस तक्रार नोंदवून घेत नाहीत. अशा तक्रारकर्त्याला पोलिस ठाण्याककडे फिरकूही देत नाहीत. मग त्याची तक्रार दाखल करून घेणे दुरची गोष्ट. सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यात एका दलिताचे घर जेसीबीने पाडले आहे. तिथे अजून पोलिस पोहोचले नाहीत. मग करूणा शर्मा प्रकरणातच इतक्या तत्परतेने गुन्हे कसे काय दाखल होतात? हे सगळे आरोप आणि दाखल केलेले गुन्हे सरळ सरळ खोटे वाटतायत.
करूणा शर्मा तोंड उघडतील, धनंजय मुंडेंच्या, अजित पवारांच्या विरोधात काहीतर बोलतील, आरोप करतील म्हणून त्यांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न चालला असल्याचे दिसते आहे. पूर्ण ताकदीने त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रकार चालू असल्याचे दिसते आहे.
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडे या दोघांच्या प्रेम प्रकरणाबाबत आम्हाला काय बोलायचे नाही. तो त्यांचा खासगी मामला आहे. दोघांनीही स्वेच्छेने तो मार्ग पत्करला आहे. दोघेही सद्नान आहेत. त्यांना योग्य-अयोग्य कळते आहे. सदर प्रकरणात गुंतलेल्या करूणा शर्मांची पाठराखण करण्याची किंवा त्यांना सहानूभुती दाखवण्याची गरज नाही. मुळातच विवाहीत असणा-या धनंजय मुंडेसोबत त्यांनी प्रेमसंबंध ठेवले होते. मुंडेच्या विवाहाची त्यांना कल्पना होती तरीही त्यांनी प्रेम संबंध ठेवले. हा त्यांचा व्यक्तीगत विषय आहे. पण काल ज्या प्रकारे करूणा शर्मांना अटक करून त्यांची फरफट चालवली आहे ते लोकशाहीला शोभणारे नाही. एका महिलेवर जर अशा प्रकारची कारवाई केली जात असेल तर अधिक गंभीर आहे.
सरकार एका महिलेला अटक करण्यासाठी मर्दानगी दाखवत असेल, तिच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असेल तर हा प्रकार खुपच गंभीर आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्राला हे लांच्छन आहे. राज्याचे गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत. त्यांना वाचविण्यासाठी जर खोटे गुन्हे दाखल करून एखाद्या महिलेचा बळी दिला जात असेल तर शिवरायांच्या महाराष्ट्राचा अवमान आहे. करूणा मुंडे चुकीच्या असतील, ब्लँकमेल करत असतील तर त्याची धनंजय मुंडेंनी रितसर पोलिसात तक्रार करावी. पण हे असलं नपुंसकासारखे पोलिसांच्या आडून त्यांचा आवाज बंद करणे योग्य नाही.
लोकं खुळी नाहीत याचे भान राष्ट्रवादीने व त्यांच्या दबावात असलेल्या पोलिसी यंत्रणेने ठेवावे. नरेंद्र मोदी दडपशाही करतात, लोकशाही धोक्यात आणली आहे अशी सतत बोंब मारणाऱ्यांनी लोकशाहीचे का धिंडवडे काढले आहेत? मोदी केंद्रात जे करतायत तेच जर तुम्ही इथे करत असाल तर तुम्हाला लोकशाहीच्या नावाने गळा काढण्याचा काय अधिकार? सत्ता हाताशी धरून कुणाचाही गळा आवळायचा आणि पुन्हा लोकशाहीच्या नावाने गळा काढायचा हे कसं चालेल ?
दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो. 9561551006