Home > Max Woman Blog > ...आणि सविता कुंभार यांनी पुन्हा एकदा कुंकवाचा करंडा हातात घेतला

...आणि सविता कुंभार यांनी पुन्हा एकदा कुंकवाचा करंडा हातात घेतला

पतीच्या निधनानंतर महिलेला कुंकू लावण्यास बंदी घालणं कितपत योग्य आहे. दुखा:चा डोंगर डोक्यावर कोसळलेल्या असतानाही शेती, उद्योगधंदे, घरं चालवणे, मुलांचं शिक्षण या सर्व जबाबदाऱ्या महिला आपलं कर्तव्य समजून पार पाडतात. तरीही अशा महिलांना समाजात सापत्न वागणूक का? वाचा सागर गोतपागर यांचा लेख

...आणि सविता कुंभार यांनी पुन्हा एकदा कुंकवाचा करंडा हातात घेतला
X

स्मार्ट ऍग्रोचा उत्कृष्ठ शेतकरी पुरस्कार सविता अशोक कुंभार यांना जाहीर झाला होता. पुरस्कार स्विकारण्यासाठी त्या स्टेजवर गेल्या. त्याच क्षणाला सत्कार करून त्यांच्या कपाळाला हळदी कुंकू लावण्यासाठी प्रमुख पाहुण्या कुंकवाच्या करंडीत बोट घालतात. हे पाहताच काही तरी अनर्थ घडत असल्याच्या भीतीने त्या मागे सरल्या. पतीच्या निधनानंतर अंगावरील उतरलेला साज पुन्हा मरेपर्यंत कधीच घालणार नाही. असे म्हणत त्यांनी हळदी कुंकवाला नकार दिला. या नंतर तिथे इतरही विधवा स्त्रिया होत्या. त्यांनी कुंकू लावले होते. त्यांना हे समजावल्यावर त्यांनी कुंकू लावून घेतले. इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा त्यांच्या कपाळावर कुणीतरी हळदी कुंकू लावले होते.

पतीच्या निधनानंतर सविता कुंभार यांनी अनेक हाल अपेष्टा सहन करत कुटुंबाचा गाढा हाकला. मोडून पडलेला संसार उभा केला. पुरुषांची समजली जाणारी सर्व कामे जबाबदारीने पार पाडली. घरात करता पुरुष नाही म्हणून केवळ रडत बसण्याऐवजी ट्रॅक्टरच्या स्टिअरिंग पासून ते मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. पण जेंव्हा मुलाच्या लग्नात त्यांच्या अंगावर अक्षदा टाकण्याची वेळ आली. त्याच वेळेस विधवा असल्याने त्यांना अक्षदा टाकण्यास नकार देण्यात आला. त्यांना या प्रसंगाचे खूप वाईट वाटते.

आजही हा प्रसंग आठवला की त्यांचे डोळे ओले होतात. स्वतः वाढवलेल्या मुलाच्या अंगावर अक्षदा न टाकण्याची वेळ त्यांच्यावर या कु प्रथेमुळे आली. याची सल त्यांच्या मुलाच्या मनात सतत बोचत राहिली. एका दिवाळीच्या सणाला मुलाला त्यांनी अभ्यंग स्नान घातले आणि ओवाळायच्या क्षणाला त्या मागे सरल्या. कारण ओवाळणीच्या ताटात असतो हळदी कुंकवाचा करंडा. आपण विधवा त्याला हात कसा लावायचा ? पण मुलाने त्यांचा हात धरत त्यांच्याकडून जबरदस्तीने जबरदस्तीने ओवाळून घेतले. थरथरत्या हाताने त्यांनी कुंकवाच्या करंड्यात अंगठा घातला. मुलाला नाम ओढून त्याचे औक्षण केले. अशा रीतीने त्यांनी पहिल्यांदा विधवांना तुच्छ लेखनाऱ्या या प्रथेविरुद्ध बंड सुरू केले.

पुढे आटपाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या अनिता पाटील यांनी सुरू केलेल्या "विधवा नव्हे स्त्री मी" या चळवळीत सहभागी होत त्यांनी विधवांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या कामात सहभाग घेतला. आणि इतर विधवा महिलांच्या सन्मानार्थ काम सुरू केले. विधवा नव्हे स्त्री मी हा उपक्रम ८ मार्च २०१९ पासून सामाजिक कार्यकर्त्या अनिता पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडी या तालुक्यातून सुरू केला. त्यांच्या वडिलांच्या मृत्युनंतर आईच्या वाट्याला आलेले विधवेचे जगणे. त्यांनी जवळून पाहिले. त्या शिक्षणासाठी पंढरपूर येथे राहत असत. वडीलांच्या निधनानंतर त्यांची आई शोभा पाटील यांना त्यांनी या प्रथेतून बाहेर काढले. या विषयी शोभा पाटील सांगतात.

"माझे पती मरण पावले. तो माझ्यासाठी धक्का होता, त्यानंतर मी उदास आयुष्य जगत होते. मी कधी आरसा पाहिला नाही. कंगवा घेऊन केस विंचरले नाहीत. अंगावरचा सर्व हिरवा साज काढण्यात आला होता. मुलीने पंढरपूरला नेले व व्यवस्थित राहायला सांगितले. मला खूप समजावले. त्यानंतर मी माझे आयुष्य पुन्हा नव्याने सुरू केले."

स्वतःच्या विधवा आईच्या कपाळावर कुंकू लावण्याचा विद्रोह अनिता पाटील यांनी केला. या घटनेनंतर इतर महिलांसाठी देखील काम करावे. असे त्यांना वाटू लागले. यातूनच विधवा नव्हे स्त्री मी या उपक्रमाची सुरवात झाली. याबाबत त्या सांगतात पती नसलेल्या स्त्रिया मुलांना सांभाळतात. घरकाम करतात उत्कृष्ट शेती करतात त्यांची जबाबदारी असलेले सर्व काम त्या व्यवस्थितपणे पार पाडतात. पण जेंव्हा समाजात सन्मानाची वेळ येते. तेंव्हा त्यांचे हक्क हिरावून घेतले जातात. त्यांना मान सन्मान दिला जात नाही. यासाठी विधवा स्त्रियांची ओठी भरणे, हळदी कुंकू लावणे. हा उपक्रम मी सुरू केला सुरवातीला विरोध झाला. पण आता अनेक विधवा महिला कुंकू लावत आहेत.

अनेकांचा विरोध आज मावळला आहे. मी करत असलेले काम चांगले आहे. असे अभिप्राय आता समाजातील लोकांकडून मला येत आहेत. माझ्या घरी जेंव्हा कधी कोणी स्त्री येते. त्यांची मी नियमितपणे ओटी भरून त्यांना हळदी कुंकू लावत असते. मी आजपर्यंत अनेक विधवा स्त्रियांना हळदी कुंकू लावण्यासाठी प्रेरित केले आहे. याची सुरवात मी माझ्या आई पासून केली. समाजातील इतर महिलांनी पुढाकार घेऊन विधवा स्त्रियांच्या मान सन्मानासाठी पुढे यावे असे आवाहन त्या करतात.

एखाद्या व्यक्तीचे निधन झाले की, पत्नीच्या कपाळावर कुंकवाचा मळवट भरला जातो. याचा अर्थ हे लावलेले कुंकू हे तिचे शेवटचे असते. कपाळाला कुंकू लावण्याचा तिचा अधिकार या प्रथेनुसार संपतो. तिसऱ्या दिवशी तिचे कुंकू पुसले जाते, हातातील हिरव्या बांगड्या फोडल्या जातात. त्या क्षणापासून हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, हळदी कुंकू हा महिलांचा साज न घालण्याचे बंधन असते. समाजात वावरत असताना विधवा ही एक वेगळी ओळख पहिल्या पाहण्यात कळते.

या स्त्रियांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. विधवा असहाय्य म्हणून अन्याय अत्याचाराचे प्रसंग देखील ओढवतात. म्हणून विधवा ही वेगळी ओळख ज्यामुळे निर्माण होते. त्या गोष्टी नष्ठ करण्यासाठी व्यापक जनचळवळ व्हायला पाहिजे. ग्रामीण भागातील सर्वच कार्यक्रमात हळदी कुंकू ही मुख्य प्रथा असते.

सुवासिनी म्हणून ज्या स्त्रियांना मानले जाते. त्याच स्त्रियांना अशा कार्यक्रमांना बोलावले जाते. या वेळी विधवा स्त्रियांच्या बाबतीत भेदभाव केला जातो. विधवा स्त्रियांच्या हातून औक्षण करून घेणे अपशकून मानले जाते. अशा कार्यक्रमात विधवा स्त्रियांना निमंत्रण नसते. यातून त्यांना जीवनाविषयी नैराश्य निर्माण होते. आपले आयुष्य संपलेले आहे. आता आयुष्यात काही राहिलेलं नाही. अशी त्यांची धारणा निर्माण होते. यातून या स्त्रिया स्वतःकडे स्वतःच्या राहणीमानाचा विचार करत नाहीत. नीटनेटके राहत नाहीत. उर्वरित आयुष्य निराशेत ढकलतात. अशा उपक्रमांमुळे या स्त्रियांच्या आयुष्यात जगण्याची नवी उमेद तयार होत आहे. त्यांचे नैराश्य कमी होत आहे.

महाराष्ट्र हे समाज सुधारकांचे राज्य आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या या वारश्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी राज्य अशी मान्यता मिळालेली आहे. महात्मा फुले सावित्रीबाई फुले नाना शंकरशेठ, गोपाळ गणेश आगरकर यांसारख्या समाजसुधारकांनी विधवांच्या प्रश्नावर एकोणिसाव्या शतकापासून काम केले. विधवांच्या केशवपणाच्या बंदीसाठी महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला होता. हा सामाजिक वारसा असताना या कु प्रथेची पाळेमुळे अजूनही शिल्लक असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

शासनस्तरावर या प्रथेच्या निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. पती नसलेल्या स्त्रिया उद्योग, शेती सारख्या क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देत आहेत. त्यांचा सन्मान केला गेला पाहिजे. समाजातील इतर स्त्रियांप्रमाणे त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजामध्ये या प्रथांच्या ओझ्याखाली दबलेल्या असंख्य स्त्रिया आहेत. ज्याची आयुष्यात सर्व काही संपलं आहे. अशी भावना निर्माण झाली आहे. या स्त्रियांच्या आयुष्यात नवी पहाट येण्यासाठी शासन तसेच सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा.

Updated : 14 March 2021 2:23 PM IST
Next Story
Share it
Top