'बाबा तुमच्या आठवणी हृदयात लॉकडाऊन झाल्यात.'
जरी मुलांची नाळ आईसोबत जोडली गेली असली तरी तिचं रक्षण आणि पोषण करणारा देव माणूस म्हणजे "वडील"... आपल्या वडिलांच्या शिकवणीतून यशस्वी जीवनाची वाटचाल करणारे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी निखिल शाह यांनी स्वाभिमानी पित्याच्या आठवणींना दिलेला उजाळा…
X
#नवीनभाईशाहयांच्याप्रथमपुण्य_स्मरणानिमित्त
प्रत्येक मनुष्याला जगाचे दर्शन घडविणारे आई वडीलच असतात आणि त्यांनाच प्रथम गुरु मानले जाते. आईविना राजा हा तिन्ही जगाचा भिकारी अशी आईची महती सांगितली जाते. हे खरचं आहे. परंतु, वडीलांची महती ही काही कमी नाही. कितीही संकट आले तरी वडील कुटूंबांना सावरतात. एखादी ठेच लागली तर आपण "आई गं' म्हणतो आणि एखादी भयंकर घटना घडली. तर "अरे बापरे' म्हणतो. यावरुनच आईवडीलांची महती मुलांसाठी सारखीच आहे. आई वडील जन्मदाते असले तरी आई ही भाग्य विधाता तर वडीलांचे कर्तृत्व मुलांसाठी त्यांचे अस्तित्व असते.
बाबा, आज तुम्हाला आमच्यातून निघून जावून एक वर्ष होत आहे. तुम्ही शरीराने आमच्या सोबत नसले तरी तुमचे कर्तृत्व,आदर्श व संस्कार आम्हाला पदोपदी आठवत असून त्याप्रमाणेच जीवनाच्या प्रत्येक पावलावर पाऊल टाकत असताना तुमची साथ असल्याची अनुभूती येते.
मनुष्याने जीवन जगताना स्वाभिमान बाळगावा त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला किंवा प्रतिकूल परिस्थिती असली तरी, जीवनाशी झगडत रहावे हीच शिकवण तुम्ही आम्हाला दिली. तिची आज पदोपदी जाणीव होत आहे. आम्ही कितीही कशाचाही हट्ट धरला तर तो योग्य आहे किंवा नाही. याबाबत निर्णय घेवून आम्हाला खडसावणारे तुम्हीचं त्याची आज जाणीव होत आहे. तर तुमचे संस्कार आज जीवनाच्या प्रवासात उपयोगी ठरत आहेत. आम्हाला तुमची साथ उरली नाही याची उणीव भासत असली तरी सदैव तुमची स्मृती जोपासणारी आमची मातोश्री आमच्या सोबत आहे. तुम्ही ज्या कष्टाने संसार थाटला त्याची जाणीव मातोश्री आम्हाला करुन देत आहे. सोबतच तुमचे संस्कार, कुटूंबाची जबाबदारी पेलविण्यासाठी सक्षम ठरत आहेत. लहानपणी तुमचा कडक असलेला स्वभाव पटत नव्हता पण आज तुमचा हाच स्वभाव आज आमच्या यशस्वी जीवनाची वाटचाल करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. हे विसरुन चालणार नाही.
बाबा तुम्ही आपल्या जीवनात अनेक व्यवसाय, नोकरीमध्ये अनेक चढउतार पाहिले. परंतु, कधीही स्वाभिमान डगमगू दिला नाही आणि आपला प्रामाणिकपणा कायम ठेवला. आपण प्रतिकूल परिस्थितीतही आम्हालाच काय कोणालाही दुखावले नाही. हीच शिकवण व आपल्या जीवनातील सचोटी व कसोटी हेच आदर्श आज आम्ही जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहोत. यामुळेच तुमच्या माघारी देखील साथ देणारी तुमचे अनेक प्रियजन आमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहेत. त्यामुळे आज तुम्ही आमच्या सोबत नसले तरी तुमच्या अस्तित्वाची जाणीव होत आहे. तुमची हीच पुण्याई आमच्या सदोदीत पाठिशी राहील व तुमची गुरुकिल्ली यशस्वी जीवनाची वाट दाखवेल.
काळाने मनाच्या आडोश्याला कुंपण घालून ठेवलं बाप लेकाच्या प्रेमात...ज्यात मी अन् तुम्ही पुन्हा भेटू ...खूप गप्पा करू ... अन् तशीच मिठी मारू, ज्यात जाणवतील मला तुमचे हृदयाचे ठोके. बाबा तुम्हाला यावच लागेल रोज मला भेटायला..!" कळलं न बाबा, ऐकाल ना हो, ऐवढे तरी तुमच्या 'सोनू' चं..!
मनातल्या भावना कागदावर उतरवायच्या म्हटल्या की कागद हा नुसता कागद म्हणून उरत नाही तर असंख्य स्मृतींना एकत्र करून बांधलेल तुमचं अन् माझं घर म्हणून सत्यात उतरत...ज्यात फक्त माझ्या आठवणी अन् तुमचं प्रेम. आज वर्ष झालं तरी सुध्दा काळ डोळ्यापुढून सरकता सरकत नाही.. आता मी घरी येईल आणि तुम्ही ओरडाल कुठं होतास इतक्या वेळ...जबाबदारी आहे की नाही, की नुसतं फिरायचं.. अन् मी मान खाली घालून ऐकून घ्यायचं...पण भासातून बाहेर आलं की कळतं हे मात्र आता शक्य नाही..ना आज ..ना उद्या...ना कधीच नाही ! आता फक्त साठवलेल्या त्या सर्व आठवणींना उजाळा देणारी, माझ्या लेखणीची धार होतात तुम्ही...! आज मात्र लिहितांना ती लेखणी गिरकी घेतेय. अश्रूंनी कागद माझा ओला होतोय पण तुमच्या मायेची मंद झुळूक चेहेऱ्याला स्पर्श करून जातेय... हात पकडून शब्द गिरवित शिकवतानाचं भास आज लिहिण्याचा होतोय.. आठवण येती बाबा..! भेटू कधीतरी निसर्गाच्या नियमाने..सांगेल तुम्हाला तुम्ही पोरकं करून गेल्यावरची कहाणी.. आज सर्व आहे पण तुमची कमी ..! जी कधी कोणी भरुच शकत नाही. जरी नाळ आईसोबत जोडली गेली असली तरी तिच रक्षण आणि पोषण करणारा देव माणूस म्हणजे "वडील"... आणि आज हा देवमाणूस सोबतीला नसला तरी त्यांचे संस्कार आणि जपलेले गुण हे माझ्यात झळकतात त्याची प्रचिती कालांतराने येईलच.
आकाशात झळकणाऱ्या ध्रृव ताऱ्याप्रमाणे माझे स्थान अटळ आहे. जो शुक्राच्या चांदणीलाही लाजवेल, बघेल बाबा आज त्या ढगामागे लपलेल्या तुम्हाला ...!
#miss_you_बाबा
#निखिलसोनू_शाह