आई.. तु आम्हाला हवी आहेस कायम
X
आई (आयं),
तु आम्हाला हवी आहेस कायम. तु 71 वर्षांची आहेस, पण तरिही तुझा दवाखाना रोज सुरू आहे. रोज तुझ्याकडे 50-20 पेशंट्स येतायत. तु त्यांना औषधपाणी करतेयस, त्यांना बरं करतेयस. पण तुला काही झालं तर आम्ही काय करू?
माझी आई... डॉ. राजश्री वसंत जोशी. आमच्या आईचं बालपण, शिक्षणाचा काळ खूप संघर्षाचा गेला. बाबांचा ह्रदयरोगाचा कालावधी, ते गेले त्यानंतर तिचं खंबीर उभं राहणं... हे सगळं-सगळं आज आठवतंय. आणि हे माझ्या आणि दादाच्याही आठवणीत पहिल्यांदाच होत असेल की आईविषयी मी काहीतरी लिहीत्येय...
डोंबिवलीत बहुतांश लोकं मला 'जोशीबाईंची' मुलगी म्हणुनच ओळखतात. ती एमएफएएम आहे. डोंबिवली पश्चिमेला ती गेली 42 वर्ष प्रॅक्टिस करते. मला कळायला लागल्यापासून तीने स्वतःहून कधी एखादा पेशंट टाळला आहे असं मला दिसलं नाही. तिच्या 2 एन्जिओप्लास्टी झाल्या आहेत, गॉलब्लॅडरचं ऑपरेशन झालं आहे. तीला बीपी, शुगरचा त्रास आहे. पण तरिही सलग तिची सेवा सुरू आहे. तिला पुरस्कार मिळो न मिळो, कुणी तिच्या सेवेची दखल घेओ न घेओ ती काम करत राहीली.
2015 मध्ये आईची दुसरी एन्जिओप्लास्टी झाली, मी आणि दादा तीला हॉस्पिटलमधून घरी घेऊन आलो, तर आमच्या घराच्या मेन दारातच एक पेशंट उभी होती, तिला आई समोर दिसल्यावर ती थांबली. आणि तीने आईला तिला काय त्रास होतोय हे सांगायला सुरूवात केली. आईला जरा हात देऊन, आम्ही घरात गेलो, पेशंट मागे-मागे आली. आईने तीला हॉलमध्येच बसून औषध दिलं. मग ती बेडरूमध्ये जाऊन आडवी झाली. ना मी आणि दादा काही बोललो ना आईने कोणती तक्रार केली. आम्ही त्यावेळी बोललो नाही कारण आईला, तिच्या पेशंट्सना आम्ही काही बोललेलं आवडत नाही आणि तीने तिच्या उभ्या प्रॅक्टिसच्या काळात कधी तक्रार केल्याचं आम्हाला आठवत नाही.
असे अनेक प्रसंग आज आठवतायत, जेव्हा तिने तिच्या पेशंट्सना प्रायोरिटी दिली आणि मला किंवा दादाला, आमच्या गरजांना दिली नाही. हे खूप सलत राहायचं-पेशंट्सचा राग यायचा. आई मात्र ठाम होती, आहे कायम....
ती जितकी पेशंट्सची तितकीच आमच्या बागेतल्या झाडांची. कुठुनही, कसंही रोपटं आणावं आणि ते जगावं, भरभरून फुलावं, बहरावं.
‘हाताला गुण आहे’ असं जितकं पेशंट्स म्हणतात, तितकंच आमच्या बागेतली झाडंही म्हणतात. जे लावेल ते बहरेल असा आईचा हात आहे. ही अतिशयोक्ती नाही, वास्तव डोंबिवलीच्या घरातल्या बागेत तुम्ही अनुभवाल. तिच्या सान्निध्यात तिच्या मुलांना, तिच्या बहिणींना, नातेवाईकांना, पेशंट्सना आणि आमच्या घरातल्या कुत्र्यांना कायमच सुरक्षित आणि शांत वाटत आलंय.
आई, मला पूर्ण कल्पना आहे, तु काही ऐकायची नाहीस, थांबायची नाहीस, दवाखाना बंद करायची नाहीस... आणि तू ते करावस असं मी सांगणार नाही. पण तु कोरोनाचं संकट ओसरल्यावरही आम्हाला हवी आहेस...
मी आज लांब आहे तुझ्यापासून. तुझ्यासाठी काल संध्याकाळी 5 वाजता मी टाळ्या नाही वाजवू शकले कारण मी ऑन एअर होते.
आई म्हणुनही आणि डॉक्टर म्हणुनही मला आणि दादाला तुझा सार्थ अभिमान आहे. आज मी जी काही घडल्येय ते तुझ्यामुळेच...
तु फेसबुकवर नाहीस, पण कुणितरी तुला हे वाचून दाखवेल आणि माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोचतील म्हणून लेखनाचा प्रपंच...
-सुवर्णा जोशी
News 18 Lokmat
(Associate Editor & Anchor)