डियर जेसिंडा, वी लव्ह यू!
जगभरात धार्मिक ध्रुवीकरण करुन सत्ता मिळवण्याची स्पर्धा लागली असताना न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन तब्बल 49 टक्के मतं घेऊन पुन्हा एकदा सत्तेत आल्या आहेत. न्यूझीलंडची खरी ओळख बहुलता, विविधता आणि सहिष्णुता ही आहे. अशा म्हणणाऱ्या जेसिंडा चा विजय काही झालं तरी 'जा पाकिस्तानात' म्हणणाऱ्यांसाठी मोठी शिकवण च म्हणावी लागेल... वाचा श्रीरंजन आवटे यांचा लेख...
X
राजकीय नेतृत्वावर भरभरून प्रेम करावं अशी स्थिती क्वचितच असते. न्यूझीलंडच्या पुन्हा नव्याने पंतप्रधान होणाऱ्या जेसिंडा आर्डन यांचं व्यक्तिमत्त्व प्रेमात पडावं असं दुर्मिळ नेतृत्व आहे. काल न्यूझीलंडमधील निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. तब्बल ४९ % मतं मिळवत आणि १२० पैकी ६४ जागा जिंकत जेसिंडा यांची लेबर पार्टी पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे. १९९६ पासून प्रमाणबद्ध प्रतिनिधीत्वाचा स्वीकार केल्यापासून असे बहुमत मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.एखादा पंतप्रधान पुन्हा निवडून आल्यानंतर लोकांना आनंदही होऊ शकतो आणि त्याचं दमदार सेलिब्रेशनही होऊ शकतं.
निवडून आल्यावर जेसिंडा म्हणाल्या," दिवसेंदिवस जग कृष्णधवल रंगात रंगवलं जातंय. मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झालंय. आपल्या मतापेक्षा वेगळा दृष्टिकोन समजून घ्यायला आपण कमी पडतोय. न्यूझीलंडची खरी ओळख बहुलता, विविधता आणि सहिष्णुता ही आहे. नागरिकांची मतं आम्ही कधीच गृहीत धरणार नाही, त्यांना दिलेली वचनं पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू."
कोविड १९ ची साथ आलेली असताना जेसिंडा यांनी ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली त्याचं जगभर कौतुक झालं. मागे न्यूझीलंडमध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हाही जेसिंडा यांचं कणखर आणि कनवाळू नेतृत्व दिसून आलं होतं. हा हल्ला झाला तेव्हाही त्या म्हणाल्या होत्या, "द्वेष किंवा विखार ही न्यूझीलंडची ओळख नाही. न्यूझीलंडची खरी ओळख प्रेमातून आणि धर्मनिरपेक्षतेच्या शिकवणीतून होते."
एवढं बोलून त्या थांबल्या नाहीत तर ज्यांच्याकडे अनाठायी बंदुकांचा परवाना आहे. त्यांच्याकडून शस्त्रं परत घेऊन ती नष्ट करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. जेसिंडा यांचं अजूनही लग्न झालेलं नाही. मागच्या वर्षी त्यांना मूल झालं. क्लार्क गेफोर्ड हा त्यांचा जीवन साथीदार घरी राहून मुलाला सांभाळतो तर जेसिंडा संसदेत जाऊन कामकाज पाहतात, हे चित्र केवळ अभूतपूर्व आहे. अमेरिकेतही हे होऊ शकत नाही. (आपल्याकडे तर क्लार्क गेफोर्डला घरकोंबडा बायकी पुरुष म्हणून टोमणे ऐकतच जगावं लागलं असतं.) लिंगभवातले सारे स्टीरीओटाईप तोडत जेसिंडा आणि क्लार्क मस्त रसरशीत समृद्ध सहजीवन जगत आहेत.
धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, लिंगभाव, लोकशाही या साऱ्याच पातळ्यांवर जेसिंडा यांनी आशेचा किरण दाखवला आहे. अक्षरशः 'Beacon of Hope in tumultuous times' अशाच प्रकारे वृत्तांकन झालं आहे. विचित्र कर्णकर्कश्श कोलाहलातला हा मंजुळ स्वर आहे. म्हणून तर हरीश अय्यर यांनी मागील वर्षी लिहिलं होतं: न्यूझीलंडचा मला हेवा वाटतो.
डियर जेसिंडा, वी लव्ह यू, वी आर प्राउड ऑफ यू ! भक्तांसाठी विशेष सूचना: इथून पुढे 'जा पाकिस्तानात' म्हणण्याऐवजी 'जा न्यूझीलंडला' असे म्हणावे. शक्य झाल्यास व्हिसाचीही व्यवस्था करावी.
- श्रीरंजन आवटे