Home > Max Woman Blog > तिला घरासाठी राबणारी बाई म्हणून घाण्याला जुंपणं सोपं असतंय : आनंद शितोळे

तिला घरासाठी राबणारी बाई म्हणून घाण्याला जुंपणं सोपं असतंय : आनंद शितोळे

तिला घरासाठी राबणारी बाई म्हणून घाण्याला जुंपणं सोपं असतंय : आनंद शितोळे
X

महिला दिनाला मुठभर महिलांची सक्सेस स्टोरी छापून येणे किंवा केवळ महिलांचा कार्यक्रम घेणे हा उपचार झाला. त्यागमूर्ती बनवून त्यांना देवी वगैरे म्हणवून मखरात बसवून पूजा केली की तिचे सगळे अधिकार,हक्क,स्वप्न बासनात बांधून तिला घरासाठी राबणारी बाई म्हणून घाण्याला जुंपण सोपं असतंय.जागतिक महिला दिनानिमित्त लिहिलेला आनंद शितोळे यांचा लेख आम्ही नक्की वाचा ...

महिला दिनाला मुठभर महिलांची सक्सेस स्टोरी छापून येणे किंवा केवळ महिलांचा कार्यक्रम घेणे हा उपचार झाला. नैसर्गिक रचनेत भेद असला तरी, स्त्रिया अर्थार्जन करत असल्या, बहुतांशी काम स्त्री पुरुष करत असले तरीही समानता अजूनही लांब आहे.

भारतीयांना आणि त्यातल्या त्यात स्त्रियांना त्यागाच आकर्षण असतंय, त्यागमूर्ती बनवून त्यांना देवी वगैरे म्हणवून मखरात बसवून पूजा केली की तिचे सगळे अधिकार,हक्क,स्वप्न बासनात बांधून तिला घरासाठी राबणारी बाई म्हणून घाण्याला जुंपण सोपं असतंय.

अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांना आपण कमवलेल्या पैशांचा विनियोग करण्याचा अधिकार, निर्णय स्वातंत्र्य मिळणे , त्या निर्णयाला कुटुंबाचा पाठींबा आणि सहभाग मिळणे, कुटुंबप्रमुख या अर्थाने लिंगभेद नष्ट होऊन स्त्रियांना अधिकार मिळणे आणि त्यांनी तो सक्षमपणे वापरणे या गोष्टी झाल्या तर महिला सबलीकरण या संज्ञेला अर्थ आहे.

निर्णय स्वातंत्र्य हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे.

समाजाची व्यवस्था पुरुषसत्ताक आहे, समानतेवर आधारित नाही हे आपणच मान्य केलेलं आहे आणि तेच अदृश्य साखळदंड पायात अडकवून घेतलेले आहेत.

अगदी होममेकर हजबंड संकल्पना प्रत्यक्षात दिसायला लागलेली असली तरीही त्यामध्ये निर्णयस्वातंत्र्य नेमक कुणाला आहे हा कळीचा मुद्दा असतो, हे होममेकर हजबंड होण आर्थिक पातळीवर असलेली अगतिकता आहे कि मनापासून स्विकारलेल आहे हे तपासलं तर त्यातला सच्चेपणा समजून येतो.

होममेकर वाईफ किंवा हजबंड हेही दोन टोकाचे दोन बिंदू झाले, त्यामध्ये असणारा सुवर्णमध्य साधायला का जमू नये ? काम,हक्क,जबाबदारी,निर्णयस्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी दोघांच्या का असू नयेत ? दोन भिन्न व्यक्ती म्हणून ओळख जपताना दोन्ही व्यक्तींचं सिंक्रोनाईज होणं अवघड असलं तरी अशक्य नाहीच.

इतके मोठे बदल , सध्या स्त्रियांना पुन्हा देवीचं रूप देऊन मखरात बसवून, त्यांच्या कपड्यांची, आभूषण यांची उठाठेव करणाऱ्या काळाची चक्रे उलटी फिरवून मध्ययुगीन काळाकडे धावायला लागलेल्या समाजात घडण्याची अपेक्षा करण दिवास्वप्न वाटतय पण उम्म्मिद पे दुनिया कायम है.

महिला दिन वेगळा साजरा करण्याची आणि ठराविक सोपस्कार पार पाडण्याची गरज नाहीशी होईल तेव्हा समानता शब्दाला अर्थ येईल.

तोवर सगळे फक्त सोपस्कार आणि मनाची समजूत.

आनंद शितोळे

Updated : 26 March 2023 8:11 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top