इसलिए अर्णब आपके आपके हर सवालों पर थूकता है भारत
X
खरं तर पत्रकारितेची लाज वाटायाला हवी अशी पत्रकारता सध्या देशात सुरू आहे. रिपब्लिक भारत नावाच्या चॅनेलचा संपादक अर्णब गोस्वामी म्हणजे पत्रकारितेवर कलंक आहे. असंच आता वाटायला लागलंय. हाथरासमध्ये घडलेल्या घटनेवर 'पूछता है भारत' या शोच्या माध्यमातून हे संपादक महाशय किती खालच्या स्तरावर जाऊन वाट्टेल ते बोलतायत, हे बघत असतांना स्वतःची स्वतःला लाज वाटायला लागते. आपण सुद्धा एक पत्रकार आहोत. यामुळं खेदाने म्हणावं लागतंय “अर्णब पूछता है भारत नही, आपके हर सवालों पर थूकता है भारत...” काही दिवसांनी तर अश्या संवेदनहीन, विकृत असलेली तुझी पत्रकारिता बघून, आमच्यावर देखील लोकं पत्रकार म्हणून थुंकायला लागतील.
अर्णब तुला हे प्रश्न पडत का नाहीत?
हाथरास प्रकरणात अर्णब गोस्वामी पीडित मुलीवर झालेल्या अत्याचारावर जोर टाकून बोलतांना दिसत नाही. मीडियाला गावात 2 दिवस बंदी केली गेली. यावर सुद्धा काहीच बोलत नाही. आई-वडील, नातेवाईकांना त्या मुलीचं शव न देता मध्यरात्री तिचं प्रेत जाळण्यात येतं यावर देखील अर्णब काहीच बोलत नाही. स्थानिक डीएमचं स्टिंग ऑपरेशन बाहेर आलंय. जिल्हाधिकारी लेव्हलचा प्रशासनातील एक उच्चाधिकारी कसा दबाव आणतोय, मात्र हा स्टिंग ऑपरेशनचा व्हीडिओ फुटक्या चष्म्यातून अर्णब सारख्या संपादकाला का दिसत नाही?
व्यक्तिद्वेष भरलेल्या अर्णब गोस्वामी यांना पीडित युवतीच्या कुटुंबासोबत 'काँग्रेसने परिवार को दिया 50 लाख लालच'। 'पीड़िता के भाई पर झूठ बोलने का दबाया बनाया'। असे फालतू प्रश्न निर्माण करून ज्या महत्वाच्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे, ते सोडून भलतंच काही तरी दाखवून मूळ विषयाला बगल देण्याचं काम केल्या जातंय. 'पूछता है भारत - पूछता है भारत' असं जोर जोरात, ओरडून ओरडून, घसा फाडून व्यक्तिद्वेषापोटी आणि कुणाच्यातरी बाजूने पत्रकारिता करायची हेच यातून दिसतंय. इसलिए अर्णब पूछता है नही, आपके हर सवालों पर थूकता है भारत...
अर्णब पीआर पत्रकारितेत तुझ्यातल्या संवेदना मेल्यात का?
काही अपवाद सोडले तर, राजकीय मुद्द्यावरून बरेच पत्रकार एखाद्या पक्षाची किंवा नेत्यांची बाजू घेऊन मांडतात दिसतात. आजकाल तसं ही पत्रकारिता सामाजिक कमी आणि व्यावसायिक जास्त झाली आहे. बहुतांश पत्रकार कुण्यातरी पक्षाला संलग्नित किव्हा त्या विचारधारेला धरून काम करतात. बऱ्याचवेळा पत्रकारांवर सुद्धा आरोप लावले जातात, हा या पक्षाचा आहे, तो त्या पक्षाचा आहे, आणि हे वास्तव देखील आहे. मध्यंतरीच्या काळात पीआर पत्रकारिता जन्माला आली. त्यामुळं राजकीय मुद्द्यावरून कुणा न कुण्यातरी राजकीय पक्षाची बाजू मांडतांना बरेच पत्रकार दिसतात. माध्यमं पीआरवादी झालेत इथपर्यंत ठीक आहे, हे आपण एका अर्थाने व्यवसायिकरणाचा भाग म्हणून समजून सुद्धा घेऊ शकतो. पण जेव्हा एका युवतीवर सामूहिक बलात्कार होतो. अशा वेळी तरी माणूस म्हणून, एक बाप म्हणून, एक भाऊ म्हणून अर्णब आपल्यातील संवेदना जागृत असायला पाहिजे! राजकारणी राजकारण करतील, मात्र पत्रकार म्हणून आपली भूमिका अश्यावेळी मानवतावादी असायला हवी. त्यामुळं असंवेदनशील होऊन भलतेच प्रश्न निर्माण करायचे इसलिए अर्णब पूछता है भारत नही, आपके हर सवालों पर थूकता है भारत।
अर्णब तुझ्या हाड नसलेल्या जिभेला पीडितेची कापलेली जीभ का दिसत नाही?
उत्तरप्रदेशमध्ये सरकार भाजपचं आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत. सरकार कुणाचंही असू द्या! मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना जेव्हा घडतात, तेव्हा आपण पक्षाचे कार्यकर्ते आहोत म्हणून चूप बसणं कितीपत योग्य आहे? काहीजण तर त्यामुलींच्या अत्याचारावर कमी आणि मागील काही तरी जुन्या गोष्टी उरकून काढायच्या आणि त्याला धरून युपी सरकार व योगी समर्थनार्थ पीडित मुलीच्या बाजूने बोलणाऱ्यावर व लिहिणाऱ्यांना ट्रोल करण्याचं काम अत्यंत पद्धशिरपणे करतांना दिसतायत. जणू काही आता निवडणुका जिंकण्यासाठी युपीमध्ये निवडणुकांचा महासंग्राम सुरू आहे. ट्रोलरांचे ट्रोल एकवेळ आपण समजू शकतो, पैसे घेऊन ट्रोल करत असतील, किव्हा भक्त म्हणून करत असतील, मात्र अर्णब सारख्या पत्रकारांना पीडित मुलीच्या कापलेल्या जिभेचे अबोल शब्द समजून घेऊन, न्यायाची भूमिका घेण्याऐवजी, जिभेला हाड नसल्यागत पत्रकार कमी आणि प्रवक्ता म्हणून बोलतांना याची जीभ लचकत का नाही. इसलिए अर्णब पूछता है भारत नही, आपके हर सवालों पर थूकता है भारत.....
अर्णब तुझी पत्रकारिता सिस्टिमच्या विरोधात की व्यक्तिद्वेष?
एक पत्रकार म्हणून मला असं वाटत पत्रकारांची भूमिका सरकारच्या धोरणा विरोधात असायला हवी. व्यक्ती विरोधात नसावी, खऱ्या अर्थाने सिस्टीमच्या व हुकूमशाही विरुद्ध असली पाहिजे. युपीमधे आज सरकार भाजपचं आहे, कदाचित उद्या काँग्रेस, समाजवादी पार्टी, बीएसपी किव्हा अजून कोणत्याही पक्षाचं असेल. सत्ता परिवर्तन होत राहणार. पत्रकार म्हणून सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्याची भूमिका आपली असली पाहिजे. आज जेव्हा हाथरासमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडतेय तेव्हा सरकारला पत्रकारांनी जाब विचारला तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना तो गुन्हा का वाटतो? अशा निर्दयी घटना घडतात तेव्हा कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याना अशा घटनेत स्वतःची आई, बहीण, मुलगी का दिसत नाही?
निवडणुका येतात तेव्हा तुम्ही पक्षधर्म नक्की पाळा. कारण ते निवडणुकांच महायुद्ध समजून एकेमकांवर आरोप करणं, पक्षाचा, नेत्यांचा बचाव करणं हे तुमचं आद्यकर्तव्य म्हणून आम्ही समजू शकतो. पण एखाद्या स्त्रीवर झालेला अमानुष अत्याचार असेल, किव्हा बलात्काराच्या घटना घडतात तेव्हा पीडितेला न्याय देण्यासाठी प्रत्येक पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बाजूला ठेवून माणूस म्हणून पुढं आलं पाहिजे. खरं तर निर्भीड, निःपक्षपाती पत्रकार हा भाजप, काँग्रेस, बीएसपी, किव्हा समाजवादी पार्टी यापैकी सरकार कुणाचेही असेल, तरी आम्ही सत्तेत असणाऱ्या आणि आमचं पालकत्व स्वीकारलेल्या पीएम, सीएम, व मंत्र्यांना सुद्धा जाब विचारू. पण अर्णब तू निर्भीडपणे पत्रकारिता करतांना दिसत नाही. तू सिस्टिमच्या विरोधात जाऊन न बोलता, एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यां प्रमाणे, व्यक्तिद्वेष असल्यासारखं सुपारी घेऊन बोलतोय, हे आता हाथरसच्या निमित्ताने लक्षात येतंय. इसलिए अर्णब पूछता है भारत नही, आपके हर सवालों पर थूकता है भारत...