मुलांच्या भावनिक होरपळीला क्लास असतो का ?
मुलांचे जैविक आई-वडील ते सुजाण पालक बनण्याचा प्रवास कसा असावा? पालक म्हणून सपशेल अयशस्वी झाल्यास मुलांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? बापाच्या किंवा आईच्या कर्मामुळे समाजाचा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि मुलांची होणारी भावनिक होरपळ यासंदर्भात पालकत्वाला नवी दृष्टी देणारा संजीव लाटकर यांचा लेख
X
तिचं काय होणार? ही आधीची पोस्ट वाचणाऱ्या आणि त्यावर रिॲक्ट होणाऱ्या तसेच आपलं मत मांडणाऱ्या fb परिवारातल्या प्रत्येकाचे आभार. यात काही मित्रांचा स्वाभाविक सूर असा होता, की त्या मुलीच्या आई - वडिलांचा वर्ग वेगळा, मूल्य वेगळी, संवेदना वेगळी म्हणून या सगळ्याकडे जगण्याचा त्या मुलीचा चष्मा सुध्दा निराळा. तेव्हा तुम्ही लिहिलंय ते संवेदनशीलता म्हणून ठीक आहे. पण अशा विचारांना त्या वर्गात थाराही नसेल.
असं मत व्यक्त करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. म्हणून पुन्हा लिहितोय.
१) मुलांच्या मानसिक आणि भावनिक होरपळीचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला मुलांच्या प्रश्नाकडे वर्ग विरहित भावनेतून बघावं लागतं. म्हणजे मुलांच्या मूल म्हणून होणाऱ्या भावनिक होरपळीला क्लास नसतो. पालक ही मुलांना भक्कम आधार, प्रेरणा, प्रोत्साहन, पाठिंबा, योग्य पोषण, संस्कार, विचार, आश्रय आणि योग्य आदर्श घालून देणारी संस्था असावी, अशी अपेक्षा असते. जेव्हा एखादी व्यक्ती, मग ती श्रीमंत असो वा गरीब, पालक म्हणून सपशेल अयशस्वी होते, तेव्हा तो डोलारा मुलांच्या अंगावर कोसळतो. ज्यातून सावरणं आणि पुन्हा उभं राहणं अतिशय कठीण असतं. बापाच्या किंवा आईच्या कर्मामुळे समाजाचा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा उदार नसतो.
२) पालक हे अपघातानं आई - वडील होतात का? हा प्रश्न सापेक्ष आहे. पण जैविक आई - वडील ते सुजाण पालकत्व हा प्रवास कठीण असतो. तो आपल्याला आपल्या स्वतःच्या, आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या मुलांच्या पिंड प्रकृतीनुसार अतिशय प्रगल्भ अशा संवेदनशीलतेने आखायचा असतो. इथेही गरीब-श्रीमंत असा भेद नसतो. कारण गरीब पार्श्वभूमीचे असंख्य उत्तम पालक मी स्वतः पाहिले आहेत. त्यांना भेटलो आहे... आणि त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे.
३) एकाचं ( म्हणजे एका घराचं) पालकत्व दुसऱ्याला चिटकवता येत नाही. आई - वडील असणं इथपासून उत्तम पालक होणं हे ट्रान्सफॉर्मेशन खूप सुंदर आणि आनंददायी असतं. आयुष्यातली ही एक महत्त्वाची अचिव्हमेंट असते. आई - वडील होणं नैसर्गिक असलं तरी त्यांनी पालक होणं हे खरं पूर्णत्व आहे.
४) पालकत्व ही खूप क्रिएटिव्ह गोष्ट आहे. रोज त्याकडे नव्याने पहावं लागतं. पालकांना रोज कदाचित मुलांकडूनही नवनवीन शिकावं लागतं. डोळस असावं लागतं आणि स्वतःला पालक म्हणून खूप विकसित करावं लागतं. पालक होणं म्हणजे त्या घराचा पाया होणं होय. तोच खिळखिळा झाला, तर पुढल्या पिढ्यांचं काय होणार? याचा समाज म्हणून आणि राष्ट्र म्हणून आपल्याला विचार करायलाच पाहिजे.
५) पैशाच्या मागे लागलेले खूप पालक असं आर्ग्युमेंट करतात कि आम्ही हे सर्व मुलांसाठीच करतो. म्हणजे जे काही बरं वाईट करतो ते मुलांसाठी करतो! म्हणून आम्ही आई-बाप म्हणून उत्तम आहोत!! हे आर्ग्युमेंट सपशेल फसवं आहे. मुलांना स्थैर्य हवं असतं हे खरंच आहे, त्याचं वेळी त्यांना आई-वडिलांचा ऊर्जादायी वेळ हवा असतो हे त्यापेक्षा खरं आहे. (वेळ देणं म्हणजे मुलांच्या मानगुटीवर बसणं नव्हे!) जे आई-वडील मुलांना भरपूर वेळ किंवा स्पेस देतात, शेअरिंग - केरिंग - लविंग हे सूत्र महत्त्वाचं मानतात, मुलांना बरोबर घेऊन सहजीवनाचा आनंद लुटतात आणि पालक म्हणून स्वतः ची आणि मूल म्हणून मुलांची मनापासून जोपासना करतात... ते खरे श्रीमंत पालक!
जे मुलांमध्ये विवेक पेरू शकतात, ते तर भाग्यवान पालक! असो. 'ती' आज या सगळ्याला वंचित असणार आहे कदाचित. म्हणून तिनं मला अस्वस्थ केलं आणि तिच्या साठी माझ्या मनात प्रश्न गुंजत राहीला..
तिचं काय होणार? तिला परमेश्वरानं पुन्हा उभं राहण्याचं बळ द्यावं, ही मनोमन प्रार्थना.
- संजीव लाटकर