स्त्री मासिक पाळीच्या अंधश्रद्धेतून स्वत: बाहेर कशी पडणार?
X
जागतिक मासिक पाळी दिन... सकाळी सकाळीच घरातीलच एक किस्सा आठवला. सध्या लॉकडाउनमुळे घरा घरात पापड्या कुरवडया बनवण्याचे कार्यक्रम सुरू आहेत... तसाच कार्यक्रम काही दिवसांपूर्वी आमच्याही घरी चालू होता. घरात मासिक पाळी येणाऱ्या आम्ही तिघी. आई ,वहिनी आणि मी. त्यातही आईची पिशवी काढून टाकल्याने राहिलो आम्ही दोघीच वहिनी आणि मी...
घरात एकीचे झाले की एकीचे चक्र सुरू असते. त्यामुळे एकदा अशीच मजा घरात घडली. गेल्या महिन्यात आईने घरात कुरवडया बनविण्याचा घाट घातला, त्याही दोन टप्यात. पहिल्या टप्प्यातल्या कुरवड्या व्यवस्थित झाल्या अगदी कोणत्याही अडचणी व तक्रारीशिवाय . परंतु दुसऱ्या टप्प्यात मात्र आमच्या वहिनीबाईंची पाळी होती. त्या दिवशी सुट्टीचा दिवस असल्याने मी आणि दत्ता दोघांनीही तिला तिच्या कामात मदत केली. पण त्याआधीच आदल्या दिवशी तिने स्वतःच वहिणीला सांगून ठेवलं होतं की, प्रिया उद्या तू पाटावर पाच सहा कुरवड्या टाक , बघू लाल होतात का ते? आणि त्यावरून आम्ही पैज लावली. जर कुरवड्या लाल झाल्या तर आम्ही( मी, दत्ता) आईला बिर्यानीची पार्टी देणार आणि नाही झाल्या तर अर्थातच आई बिर्याणीची पार्टी देणार( ती पैज अर्धवट राहील ती गोष्ट वेगळी)
वर सांगितल्याप्रमाणे वहिनीने एका पाटावर कुरवड्या घातल्या. आणि पुढे आमची उत्सुकता लागून राहिली. तेव्हापासूनच कुरवड्या कधी तळून पाहणार हाच विचार डोक्यात फिरत होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वाहिणीनेच कुरवड्या तळल्या आणि मजा अशी झाली की, पहिल्या टप्प्यात, ज्यामध्ये कोणताही अडथळा किंवा अडचणी आल्या नव्हत्या त्या कुरवड्या लाल झाल्या आणि वहिणीने घातलेल्या कुरवड्या एकदम पांढऱ्या फेक...
तसे मग आम्ही त्यामागची कारणे शोधायला सुरुवात केली. पण त्याच उत्तर आईनेच आम्हाला दिलं. तिने सांगितले की आधीच्या टप्प्यातल्या कुरवड्या बनवताना चिक कापडातून गाळला नव्हता . त्यामुळे कदाचित त्या लाल झाल्या असाव्यात. असो त्यामागे आणखीही काही कारणे असतील. परंतु आई बाबतीत विशेष एक की तीच तसं शिक्षण फारसं नाही . परंतु तरीही बदलत्या काळानुरूप तिनं स्वतःला बदललं ... नव्या गोष्टी... नवे विचार ती सहज स्वीकारते.
सहज स्वीकारते खरी पण खुप प्रश्न विचारून, चर्चा करून जर तिचा विश्वास बसला तरचं बरं का ? आणि हा प्रयोग पण तिने स्वतःला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठीच केला. हे उदाहरण सांगण्याचं कारण एकच की, मासिक पाळीच्या बाबतीत अंधश्रद्धा बाळगण्यामध्ये स्त्रियांच फार पुढे असतात. आपल्या शरीरात घडणाऱ्या या नैसर्गिक क्रियेला अशुद्ध, अपवित्र म्हणण्यात स्त्रियांच पुढे असतात. (याला कारण लहानपणासून तिला दिली जाणारी शिकवणच आहे) शालेय अभ्यासक्रमातील हे विषय सहजच टाळले जातात. घरातही पालक मासिक पाळी वर मुलांशी मोकळी चर्चा करत नाहीत... त्यामुळेच आज सुद्धा अनेक सुशिक्षित, उच्चशिक्षित मुली - मुले मासिक पाळी संदर्भात अनेक अंधश्रद्धा बाळगून आहेत.
मासिक पाळी आणि स्त्रिया या विषयावर बोलण्यासारखं, लिहिण्यासारखं खुप आहे... पण वेळ आहे ती कृती करण्याची... आणि ती जबाबदारी स्त्री आणि पुरूष दोघांचीही आहे असे मला वाटते. स्त्रियांना येणारी मासिक पाळी ही शरीरात घडणाऱ्या अनेक नैसर्गिक क्रियांपैकी एक क्रिया आहे. त्यात अशुद्ध - अपवित्र असे काही नाही. या गैरसमजुती, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आज तरुण - तरुणींनी पुढे येण्याची गरज आहे. अश्या छोट्या छोट्या कृतीतून आपण लोकांच्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करू शकतो.
-पुजा कांबळे