सारा करिमी, कुठेही रहा पण सुरक्षित रहा गं बाय!
सारा करिमी का चर्चेत आहे? अफगाणिस्तानच्या रस्त्यावर व्हायरल झालेला तिचा व्हिडीओ काय सांगतो? जगाचं लक्ष वेधून घेणारी सारा करिमी तालिबान्याशी कसे शब्दांनी वार करत आहे? वाचा... सारा करिमीचा संघर्ष सांगणारा लेख
X
'हावा, मरियम, आयेशा 'ची दिग्दर्शक अफगाणिस्तानची सारा करिमी…
२०१९ च्या 'इफ्फी'च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पन्नास महिला-दिग्दर्शकांच्या चित्रपटांचा 'वर्ल्ड पॅनोरामा' या विभागात खास समावेश करण्यात आला होता. या दिग्दर्शक जशा चीन, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा विकसित तशाच ऑस्ट्रिया, हॉलंड, पोलंड, अल्जेरिया, इराण, आइसलँड, अफगाणिस्तान, मॅसिडोनिया अशा तुलनेने अप्रगत चित्रपटसृष्टी असलेल्या देशातूनही आलेल्या होत्या. म्हणजे मुळातच चित्रपटसृष्टीचा छोटा आवाका, संधींचा अभाव, पुरुषी वर्चस्ववादाशी संघर्ष, इराण-अफगाणिस्तानसारख्या देशातल्या अगणित बंदया आणि फतवे अशी भलीमोठी अडथळ्यांची शर्यत त्यांना पार करावी लागली होती. पण या मुलींनी आपल्या आयुष्याची हीच दिशा मनाशी पक्की करून चित्रपट प्रशिक्षण देणाऱ्या स्कूल वा इन्स्टिट्यूटचा मार्ग धरला होता.
परक्या देशात जाऊन नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या हाताखाली इंटर्नशिपचे कष्ट उपसले होते आणि डॉक्युमेंट्रीज, शॉर्ट फिल्म्स करता करता त्या फीचर फिल्मकडे वळल्या होत्या.
यातल्या बहुतेक जणींची ही पहिलीच फीचर फिल्म होती. यातच एक होती 'हावा, मरियम, आयेशा 'ची दिग्दर्शक अफगाणिस्तानची सारा करिमी .
आइसलँडसारख्या ठिपक्याएवढ्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी आसा जोरलीफडीटोर, प्रागमध्ये जन्मलेली ऍग्नेश्का हॉलंड, अमेरिकेच्या ख्रिस्टीना इबारा आणि अल्मा हारेल, जर्मनीच्या अँजेला शॅनलेक आणि नोरा फिंगशेत, फ्रान्सची सिलीन सियामा, पोर्तुगालची सलोमी लामास, स्विझर्लंडची बेतीना ओबेर्ली, इराणची शहरबानू सादत,चीनची लीना वॉंग, मोरोक्कोची मरियम तौझानी, अर्जेंटिनाच्या वेरेना कुरी आणि लॉरा बियेरबॉर, मॅसिडोनियाहून टीओना स्ट्रगर मितवेस्का, हॉंगकॉंगस्थित ऑलिव्हर सी कुएन -चान, कोरियन वंशाची उंजू मून, अल्जेरियाची मोनीया मेदोर, पेरुची मेलिना लिऑन, डेन्मार्कची मे एल-तुखी, इटलीची मिशेला ओचिपिंती, फिलिपिन्सची इजाबेल सॅन्डोवल अशी यादी वाचतावाचताच केवढा तरी मोठा जागतिक भौगोलिक-राजकीय-सांस्कृतिक पट डोळ्यांसमोर उभा राहिला. यांच्यातच ताठ खडी होती सारा करिमी .
या दिग्दर्शकांच्या चित्रपटातून जागतिक स्तरांवरच्या अतिशय गंभीर विषयांना संवेदनशीलपणे भिडण्याचा प्रयत्न केला गेला होता. यातल्या बहुतांश जणींनी आपल्या मातीतल्या समस्या केंद्रस्थानी असणारे विषय निवडून, चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद स्वतःच लिहिले होते. एवढेच नव्हे तर निर्मिती-दिग्दर्शनाबरोबर, छायाचित्रण, संकलन आणि स्पेशल इफेक्ट्स अशा तांत्रिक बाजूही हाताळल्या होत्या. त्यातून जे भान, जो आशय प्रकट होत होता तो जागतिक होता, प्रसंगी समकालाशी सांधा जोडत सार्वकालिक वास्तवाकडे निर्देश करत होता. उत्तम आशयाबरोबर कला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उत्तम समन्वय साधणारे हे चित्रपट होते. यातून ह्या सगळ्या दिग्दर्शकांनी आपली स्वतंत्र नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवली. यातच होती सारा करिमी.
साराने दिग्दर्शित केलेला ' हावा, मरियम,आयेशा' हा चित्रपट काबूलमध्ये राहणाऱ्या तीन अनोळखी महिलांची कहाणी मांडतो. यातली हावा आपल्या सासूसासऱ्यांबरोबर पारंपरिक बंदिस्त जगणे. जगत आली आहे. त्यांची खिदमत करण्याचे नवऱ्याचे कडक हुकूम ऐकतच तिचे दिवसरात्र सरत चाललेत. त्या पलीकडचे जग तिला ठाऊक नाही. म्हणून पोटातल्या बाळाशी गुजगोष्टी करण्यातच तिच्या त्या कोंडलेल्या जगातला टीचभर आनंद सामावलेला आहे. मरियम सुशिक्षित, टेलिव्हिजन पत्रकार आहे. डोक्यावरची ओढणी जराही ढळू न देता, चेहरा कोरा ठेवत दहशतवादी चकमकीच्या बातम्या देण्याची कसरत आता तिने ती जमवून घेतली आहे. तिच्या नवऱ्याने प्रतारणा केल्यामुळे ती घटस्फोट घेण्याच्या तयारीत असताना तिला मातृत्वाची चाहूल लागली आहे. त्यातून आधीच कठीण असलेले तिच्या सुटकेचे मार्ग आता अधिकच अरुंद होऊन गेले आहेत. तिसरी आयेशा फक्त १८ वर्षाची मुलगी आहे. तिच्या मित्राने तिची फसवणूक करून पळ काढला आहे. म्हणून आता तिला चुलत भावाच्या गळ्यात बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे.
गर्भवती असणे हे त्यांच्यातले एक समान सूत्र आहे. पण हे मातृत्व त्यांनी आपल्या जोडीदाराच्या साथीने, स्वेच्छेने स्वीकारलेले नाही. ते परंपरेने लादलेले आहे. तर प्रसंगी परंपरेतून निसटण्याच्या प्रयत्नापायी लादले गेले आहे. पण आहे ते लादलेलेच. आणि त्याचा सामना आता त्यांना एकेकटीने स्वतःच्या हिंमतीवरच करायचा आहे. त्यांचे अस्तित्व कुणाच्या खिजगणतीत नाही. त्या आईवडिलांच्या घरात एकेकट्याच मोठ्या होत आल्या आहेत. आणि आयुष्याच्या या वळणावर वेळेप्रसंगी हाक मारायला. डॉक्टरकडे घेऊन जायला, त्यांना काय दुखतेखुपते, हवेनको विचारणारे, धीराचे दोन शब्द बोलणारे त्यांच्यापाशी कुणीच नाही.
साराने या प्रत्येकीच्या एकाकी जगण्याची कहाणी मांडून प्रत्येकीला तिचा स्वतःचा अवकाश ,श्वास दिला आहे आणि शेवटी एका अगदी शांत दृश्यामध्ये या तीनही कहाण्या एकत्र आणत या तिघींच्या चिरडलेल्या जिण्याची कैफियत मांडली तसेच आहे. आम्ही अफगाणी महिला आमची काळजी घेण्यासाठी, बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी समर्थ आहोत हा आशावादही व्यक्त केला आहे .
तालिबानी सेना जेव्हा काबूलमध्ये शिरल्या तेव्हा सारा बँकेत पैसे काढत होती. तिथून ती रस्त्यावरच्या गदारोळातून धावत सुटल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल होत गेली, त्यातही ती सतत बोलत होती, जिवाची पर्वा न करता तिथे काय होत आहे, काय होणार आहे? ते जगाला सांगत होती.
अफगणिस्तानमधल्या राजकीय अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर साराने एक खुले पत्र लिहिले आणि देशातल्या मुलींवर, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडत मदतीची मागणी केली. व्हिडिओ क्लिप्स, ट्विटर अशा माध्यमातून ही बाई अफगाणी बायाबापड्यांची प्रतिनिधी बनून त्यांची कैफियत जगासमोर मांडत आली, तिच्या जिवाला असलेला धोका वाढतच होता. या सर्व घडामोडींमध्ये तिने भाऊ आणि त्याच्या परिवाराला देशाबाहेर नेण्यासाठी व्यवस्था केली होती पण काबूल विमानतळावरच्या गोंधळामुळे ते ऐनवेळी तिथे पोचू शकले नाही. म्हणून तिला काही काळ लपून राहावे लागले. आता तुर्की-युक्रेनच्या मदतीने ती आणि तिचा परिवार कीव्हमध्ये पोहोचले आहेत.
पण सगळे गमावून परक्या देशात आलेल्या बाईचे आता काय उरले? कोण आहे ती आता? कुठल्या मातीची लेक? कुठल्या देशाची नागरिक? परक्या देशात निर्वासिताचे जिणे सामोरे आलेली ही बाई तिथूनही बोलते आहे. प्रसारमाध्यमांना मुलाखती देत आपल्या मायबहिणींचा आवाज जगासमोर आणते आहे. तिचा पुढचा प्रवास खडतरच असणार आहे .
तेव्हा सारा करिमी, तुझा आशावाद आणि सामर्थ्य असेच मजबूत राहू दे, तुझ्या धैर्याला सलाम, कुठेही रहा पण सुरक्षित रहा .
(लेखिका : यशोधरा काटकर या L N welingkar institute of management येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.)