Happy birthday दिलीप कुमार
अभिनय सम्राट दिलीप कुमार यांचा आज 98 वा वाढदिवस...त्यानिमित्त ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी दिलीपकुमार यांना दिलेल्या शुभेच्छा
X
तब्बल सहा दशके हिंदी चित्रपटांच्या साम्राज्यात गाजत राहीलेले प्रचंड ताकदीचे अभिनेता-निर्माता महम्मद युसूफ खान उर्फ दिलीप कुमार यांचा आज ९८ वा वाढदिवस. सध्या वार्धक्यातील आजारपणांमुळे वारंवार रुग्णालयात राहावे लागत असलेल्या या सिताऱ्याला करोडो चित्ररसिकांच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा!
दिलीप कुमार म्हटले की डोळ्यांसमोर येतात पन्नास, साठ व सत्तरची दशके. एका बाजूला राज कपूरचा गबाळा तरूण, दुसऱ्या बाजूला देव आनंदचा चाॅकलेट हिरो तर तिसऱ्या बाजूला दिलीप कुमार यांचा तगड्या बांध्याचा खेडूत या त्रिकुटाने अवघी चित्रपटसृष्टी व्यापून टाकली होती.
'देवदास', 'मधुमती', 'राम और श्याम', 'गंगा-जमुना, 'नया दौर', 'गोपी' अशा चित्रपटांतून अस्सल भारतीय पडद्यावर साकारणाऱ्या दिलीप कुमार यांनी 'मुगल-ए-आझम'मधून मोगल काळ साकारला, तर 'शक्ति'मध्ये त्यांनी कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी उभा केला. 'गोपी'मध्ये ते व सायरा बानू एकत्र आले व विवाहबद्धही झाले. त्या दोघांमध्ये तब्बल २२ वर्षांचे अंतर आहे.
दिलीप कुमार यांची चित्रपटांतील नृत्ये त्या काळात 'स्टाईल' बनली. १९९८मध्ये आलेला 'किल्ला' हा त्यांचा अखेरचा चित्रपट. दिलीप कुमार मुंबईचे शेरीफ होते व त्यांची काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेवर निवडही झाली होती. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार व पद्मभूषण किताब मिळाला. पेशावरला जन्मलेल्या युसूफ खानना पाकिस्तान सरकारने 'निशान-ए-इंजमाम' या किताबाने गौरवले. असे दिलीप कुमार. त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो व ते शतायुषी होवोत, ही प्रार्थना!