गुडबाय रॉकी...
X
'मामा...रॉकीला कुत्र्यांनी मारलयं ' हे नरेशचे फोनवरचे शब्द ऐकल्याबरोबर पटकन खाली बसलो...तोंडातून नीट आवाज बाहेर येईना..डोळ्यातनं पटकन थेंब बाहेर आले..कुठं आहेस,?...तो बोलला..माळावर विहीरीच्या वर आहे. सविताला सांगीतलं.भरतमामा, ऋषी,गणेश आम्ही सगळे वर गेलो. नरेश रॉकी जवळच होता. त्याचा निष्प्राण देह बघून पुन्हा गलबलून आलं. प्रयत्नपूर्वक हुंदके दाबले. डोळे पुसले. रॉकीच्या पायाजवळ काहीतरी तीक्ष्ण घुसून रक्त बाहेर आलं होतं. बाकी शरीरावर एकही जखम नव्हती. याचा अर्थ त्याला कुत्र्यांनी मारलं नव्हतं...
दुसरा संशय आला तो डुकरांचा. त्यांच्या धडकेत कुत्र्याचा जीव सहज जाऊ शकतो...मात्र पायाचे ठसे डुकराचे वाटत नव्हते. शिवाय रॉकीला पंधरा-वीस फुट ओढत आणलेलं दिसत होतं. त्याची मान हातात घेऊन बघितली तेव्हा ती मोडल्याचं लक्षात आलं. शिवाय त्याची जीभ तोंडात अडकली होती. शेजारच्या शेतगड्याने सांगितले की, इथं काळवीट आणि हरीण बराचवेळ होते.
सगळी परिस्थिती पाहून आम्ही निष्कर्ष काढला,रॉकी ने काळविटाचा पाठलाग केला असावा. काळविटाने हल्ला केल्यानंतर त्याचे एक शिंग पायाजवळ घुसले व दुसरे शिंग रॉकीच्या गळ्यातील पट्ट्यात अडकले. काळवीटाने झटके देत ते तसेच ओढत आणले. यात रॉकीचा फाशी बसून मृत्यू झाला.
आज सकाळीच रॉकी आणि हँप्पी माझ्यासोबत डोंगरावर आले होते.ते पुढच्या डोंगरावर गेले.मी परत फिरलो.ते लगेच माझ्या मागोमाग येणं अपेक्षित होतं...पण आले नाहीत.
मी,नरेश, भरतमामा, दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत कामात व्यस्त होतो.दरम्यान दहा वाजता हँप्पी एकटीच परत आली होती.रॉकी परत येणार याची खात्री असल्याने, आम्ही निश्चिंत होतो.साडे अकरा वाजता नरेश बोलला,एक चक्कर मारून बघतो रॉकी कुठं दिसतयं का ते...आणि बारा वाजता त्याचा रॉकीच्या मृत्युची खबर सांगणारा फोन आला.
नरेशच्या पुण्यातील भावाने चार महिन्याच्या रॉकीला सांभाळण्यासाठी घेतलं होतं.पण सोसायटीतल्या फ्लॅट मध्ये त्याला सांभाळणं अवघड झालं.त्या दरम्यान नरेश पुण्याला गेला होता.तो त्याला घेऊन थेट रुद्राहटला आला.पांढरंशुभ्र छान गोंडस पिलू.एका छोट्याशा बाळागत.त्या काळात हर्ष रुद्राहटलाच होता.त्याला सवंगडी मिळाला.पुढे गबरूच्या जन्मानंतर त्याला आणखी एक सोबती मिळाला.खरंतर रॉकी एका छोट्या घरात, फ्लॅट मध्ये राहावा असाच अफगाण वाऊंड जातीचा कुत्रा..पण रुद्राहटचं वातावरण त्याला मानवलं.दुध,भाकरी,चपाती, अधूनमधून नॉनव्हेज...रॉकीची तबियत जबरदस्त बनली.चार वर्षांच्या रॉकीला सगळेच घाबरत.तो भुंकायचा पण कधीच कोणाला चावला नाही. वय वाढलं तरी त्याची निरागसता कायम होती.आम्ही फिरायला जाताना चालत चालत पटकन गबरूचे गाल ,माझे हात चाटायचा..सोबत फिरताना हरिणांचा पाठलाग तो एका टप्प्यापर्यंतच करायचा.माझ्या आजुबाजुला लक्ष ठेऊनच तो फिरायचा.रॉकी अशी हाक मारली की,लगेच पळत यायचा.फिरताना त्याची सोबत मोठी आश्वासक असायची.
चार वर्षांचा आमचा सोबती.कुटुंबातलाच तो एक.दिवसभर बांधून ठेवायचो.रात्री तो मोकळा असायचा.सहा महिन्यांपासून त्याला हँप्पीची सोबत होती.रॉकीला पाव खूप आवडायचा.रात्री सोडल्याबरोबर हटकडं पाव खाण्यासाठी तो यायचा.पहाटे पाच वाजल्यापासून तो दरवाजा कधी उघडतोय,याची वाट पाहायचा.उशीर झाला तर,पायाने दरवाजा वाजवायचा.पावाची बरणी दिसली की,त्याची धडपड बघण्यासारखी असायची.दोन पाव टाकले की,ते खाऊन निघायचा.सकाळी आपल्याला बांधतात, हे माहित असल्याने सातच्या सुमाराला जागेवर जाऊन बसायचा.थोडसं दटावणं,प्रेमानं बोलावणं त्याला कळायचं...चार वर्षांतील शेकडो आठवणींनी डोक्यात गर्दी केलीय.
जीवनाची क्षणभंगुरता ती हिच! नैसर्गिक मृत्यू आणि असा अकाली, अपघाती मृत्यू यात खूप फरक असतो.रॉकी आता कुठं तरूण कुत्रा बनला होता.त्याच्यापासून हँप्पी ला झालेली पिलंही वाचली नाहीत.नव्याने आम्ही पिलांची वाट पाहात होतो.
बागेत त्याला चीरविश्रांती देताना... पुन्हा भावविव्हल झालो..पाव खाण्यासाठी रॉकी आता हटकडं येणार नाही.. सायंकाळी फिरायला निघताना त्याला सोडावं म्हणून त्याचं तक्रारवजा भुकंणं कानावर येणार नाही... त्याच्या आठवणी इतक्या सहजासहजी विसरणं शक्य नाही... रॉकी शरिरानं गेला असला तरी,त्याचं अस्तित्व जाणवत राहणार..सतत तो दिसल्याचे भास होणार..त्याचं भुकंणं कानावर येणार....
कवेलीलगतच्या आंब्याच्या झाडाखाली तो विसावलाय...कदाचित पुढच्या वर्षीच्या केशर आंब्यातून तो मला भेटेल...
पिवळसर चकाकत्या घाऱ्या डोळ्यांनी तो एखाद्या छोट्याश्या बाळानं पाहिल्यासारखं माझ्याकडं पाहायचा...त्यातून पाझरणारा स्नेह मला जाणवायचा.क्वचित रागावलं तरी कधी त्यानं त्याचा राग केला नाही... कधी तो रुसला नाही, चिडला नाही,कसलाच त्रास त्यानं दिला नाही. फक्त आनंद....आणि आनंदच त्याने दिला....
खरं तर तो माझ्यासाठी कुत्रा नव्हताच...एक जीवलग होता.डोंगरावर फिरायला कायमची सोबत देणारा
तो असा अचानक गेला....
डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू त्याला परत आणू शकणार नाहीत हे कळतयं मला...पण काय करू...रॉकी....तेवढंच करू शकतो आता मी.
- महारुद्र मंगनाळे