या कारणामुळं देशात वाढतात गर्भावस्थेतील मधुमेहाचे रुग्ण...
अलिकडे गर्भावस्थेत आढळून येणाऱ्या मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. गरोदर महिलांनी अशा वेळी नक्की कोणती काळजी घ्यावी? कोणत्या टेस्ट कराव्यात? देशात मधुमेहाचे रुग्ण वाढण्याचे कारण कोणते? वाचा डॉ. साधना पवार यांचं मार्गदर्शन
X
आजकाल गर्भावस्थेत आढळून येणाऱ्या मधुमेहाचे खूप सारे रुग्ण सापडताहेत. काळजी घ्या मैत्रिणींनो! जगात सर्वात जास्त मधुमेहाचे रुग्ण आपल्या देशात आहेत.या ला कारण आपली चुकीची आहारपद्धती आणि बैठी, ताणतणावयुक्त जीवनपद्धती!
मैत्रिणींनो, गरोदर राहण्याच्या अगोदरच आपलं वजन (उंचीच्या मानाने) मस्त नियंत्रणात आणा, रक्तातील साखरेची पातळी किंवा गेल्या सहा महिन्यातील रक्तातील साखरेचे साधारण प्रमाण दाखवणारी एच बी ए वन सी ही तपासणी करून घ्या. तुमचे आई वडील यापैकी कोणाला मधुमेह असल्यास तुम्हाला जास्त सावध रहावे लागेल.
गरोदरपणात सहाव्या महिन्यात तुमचे डॉक्टर ग्लुकोज चॅलेंज टेस्ट ही स्क्रिनिंग टेस्ट सांगतील. ती करून घ्याच. त्यात काही संशयास्पद रिपोर्ट आल्यास जी. टी. टी. ही तपासणी करून घ्या.
गर्भवस्थेतील आहारामध्ये साखर,गोड तळलेले मैद्याचे पदार्थ,बेकरीचे पदार्थ, जंक फूड,तसेच तळलेले पदार्थ टाळा. त्याऐवजी हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, सालीसकट कमी गोड फळे, अंडी, दूध, दही पनीर, चिकन, मटण, मासे खा.
डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक हालचाल,व्यायाम सुरू ठेवा. मद्यपान,धूम्रपान टाळा. (हो, आपल्याकडे आजकाल स्त्रीयासुद्धा मद्यपान ,धूम्रपान, तंबाखू ची मिश्री लावणे हे प्रकार करतात)
पहिल्या तीन महिन्यात वाढलेल्या साखरेमुळे बाळामध्ये हृदयाचे,किडनीचे अशी अनेक व्यंगे निर्माण होऊ शकतात. सहाव्या महिन्यानंतर आईच्या रक्तातील वाढलेली साखर बाळाचे वजन वाढवते, बाळा भोवतालचे पाणीही खूप वाढते .
आईच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणातील हेलकावे बाळाला सहन न झाल्याने बाळ पोटातच दगावू शकते, किंवा प्रसुती झाल्यावर लगेचच रक्तातील साखर कमी होऊन बाळाचा मृत्यू संभवतो.
अगदी दिवस भरत आल्यानंतर बाळाचा असा अचानक मृत्यू हा प्रचंड वेदनादायी असतो, आणि बऱ्याचदा गर्भवस्थेतील इतर गुंतागुंतीमध्ये अंदाज लावून टाळता येतो. तसा मधुमेहात डॉक्टरना तो आधीच predict नाही करता येत.
बाळांचे वजन जास्त असल्याने प्रसूतीदरम्यान,सिझरदरम्यानही आईच्या गर्भाशयाला,जननमार्गाला खूप इजा पोहोचू शकते.
असे निदान झाल्यास बऱ्याच स्त्रियांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार फक्त जेवणात बदल केले तरी साखर नियंत्रणात राहते. काहींना इन्सुलिन सुरू करावे लागते.
गर्भावस्थेत मधुमेह झाल्यास जरी प्रसुतीनंतर रक्तातील साखर नॉर्मल होत असली तरी आयुष्यभरच या स्त्रियांना मधुमेह होण्याचा धोका राहतोच.
आणि गरोदरपणात झालेल्या मधुमेहामुळे अतिरिक्त वजन वाढलेल्या बाळांनाही पुढील आयुष्यात मधुमेहाचा धोका राहतो.
म्हणून प्रयत्नपूर्वक गर्भावस्थेतील मधुमेह टाळणे गरजेचे आहे आणि झाल्यास तो नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.
डॉ साधना पवार, महिला आरोग्य.
(सदर फेसबुक पोस्ट डॉ. साधना पवार यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे)