सातपुडा पर्वतरांगांमधील भिल्ल समाजाची खाद्यसंस्कृती
X
सातपुड्यातील भिल्ल लोकांच्या दैनंदिन जेवणात भाजी-भाकर हेच प्रामुख्याने असते. भाकरीत ज्वारी ह्या धान्याचा उपयोग अधिक केला जातो. उपलब्धतेनुसार मका, बाजरी, गहू ह्या तृणधान्यांचाही उपयोग होत असतो. येथील डोंगराळ जमिनीवर मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेऊन वर्षभर पुरेल एवढा साठा प्रत्येकाच्या घरी असतो. गरजेपेक्षा जास्त ज्वारीचे उत्पादन झाल्यास आर्थिक अडीअडचणीच्या वेळी बाजारात नेऊन ती थोडी थोडी विकली जाते. ज्वारीच्या पेरणीसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या हायब्रीड बियाणांचा वापर केला जात असला तरी काही गावरान प्रकारच्या ज्वारीसाठी घरचीच बियाणे वापरण्याचा, ती नसल्यास ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून उधार घेऊन उत्पादनानंतर दुपटीने परत करण्याचा प्रघात आहे.
ज्वारीची साठवण करण्यासाठी प्रत्येक घरात बांबूची विणलेली, आतून शेणाने सारवलेली मोठी गोलाकार कोठी असते. लहान आकाराच्या कोठीला भिल्ल लोक 'बुडदी' म्हणतात. धान्य भरताना आधी आत तळाशी कडूनिंबाचा पाला पसरवतात. कोठी पूर्ण भरल्यानंतर वरून शेणाने बंद केली जाते. ज्वारी दळण्यासाठी घरोघर कोअटी/घरटी (जाते) असते. काही गावांत विजेवर किंवा डिझेलवर चालणाऱ्या चक्क्याही (गिरण्या) आहेत. परंतु आजही भिल्लांकडे जात्याचा उपयोग अधिक प्रमाणात होतो. दळलेले पीठ मळण्यासाठी मातीचे जे भांडे वापरले जाते त्याला वाटका/ठोबडो असे म्हणतात. तो तयार करण्यासाठी लहान आकाराच्या तगारीचा उपयोग केला जातो. तगारीच्या आतल्या भागात कापड ठेवून त्यावर मातीचा लेप दिला जातो. तो सुकल्यावर कापडासह काढून आचेवर तापवून पक्का झाल्यावर मगच त्याचा वापर केला जातो. स्टिलचा वाडगा, ताट किंवा पातेले ह्यांचाही पीठ मळण्यासाठी आपापल्या ऐपतीप्रमाणे उपयोग केला जातो.
मळलेल्या पिठाची भाकर करताना वेगवेगळ्या पद्धतींचा वापर होत असतो. ज्वारीच्या पिठाचा हातात मावेल एवढा गोळा घेऊन दोन्ही पंजांत मधोमध धरत थोडा थोडा दाब देत एका पंजावरून दुसऱ्या पंजावर झेलत भाकरीचा आकार मोठा मोठा केला जातो. तव्याच्या बाहेर जाणार नाही असा आटोपशीर गोलाकार झाल्यावर तापलेल्या तव्यावर थोडेसे पाणी शिंपडून चर्र आवाज झाला की, तवा पुरेसा तापला आहे असे समजून त्यावर भाकर अलगद टाकली जाते. तिचा वरचा भाग पिठाचा असतो, त्यावर पाण्याचा हात लावला जातो. त्यामुळे भाकरीला भेगा पडत नाहीत. एक बाजू शेकून झाली की, पाणी लावलेली बाजू थोडी शेकून मग ही भाकर निखाऱ्यावर दोन्ही कडून चांगली शेकतात. पीठ चांगले मळले गेले असेल तर भाकर छान फुगून तिला पापुद्रा (पदर) सुटतो. थेट पळसाच्या पानावर, हातावर, तव्यावर किंवा खापरावर भाकर करणे हे कौशल्याचे समजले जाते. ते न जमल्यास हातावर, पाटावर, ताटावर, प्लास्टिकच्या कागदावर भाकर थापतात. भिल्ल लोक जंगलात जातात तेव्हा पिठा-मिठाचा शिधा घेऊन जातात पण त्यांच्या जवळ तेव्हा भांडी नसतात. अशा वेळी पळसाच्या पानांचा उपयोग ते भाकर थापण्यासाठी करतात. जंगलातली लाकडे पेटवून त्यावर शेकलेली भाकर फारच चविष्ट लागते.