Home > Max Woman Blog > सिनेसृष्टीचा दृष्टीकोन बदलणाऱ्या सुमित्रा भावे

सिनेसृष्टीचा दृष्टीकोन बदलणाऱ्या सुमित्रा भावे

सकस समाजनिर्मितीचा प्रामाणिक उद्देश ठेऊन सिनेसृष्टीत आपला वेगळाच ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं. सुमित्रा भावे यांचा जीवनप्रवास आणि त्यांच्या कार्याला उजाळा देणारा संजीव वेलणकर यांचा लेख नक्की वाचा

सिनेसृष्टीचा दृष्टीकोन बदलणाऱ्या सुमित्रा भावे
X

जन्म १२ जानेवारी १९४३ पुणे येथे. सुमित्रा भावे या माहेरच्या सुमित्रा उमराणी. त्या मुळच्या पुण्याच्या. आगरकर हायस्कुलमधुन त्यांनी माध्यमिक शिक्षण तर फर्ग्युसन महाविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतून समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. कविता लेखन, रांगोळी, चित्रकला असे छंद जोपासत त्यांनी विद्यार्थी दशेत गुरु रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. राष्ट्रसेवा दलाच्या कला विभागात नृत्यामध्ये यांचा सहभाग होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी वृत्त निवेदन ही केले. १९६५ साला पर्यंत त्या टाटा इन्स्टिट्यूट मध्ये काम करत होत्या. टाटा इन्स्टिट्यूट सोडल्यावर त्यांनी १९८५ पर्यंत सोशल वर्क फिल्डमध्ये काम केले होते. त्यात दहा वर्षे पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये समाजकार्याचे अध्यापन, अनेक सामाजिक संशोधने आणि शोधनिबंध, उरुळीकांचन येथे सर्वोदय अध्ययन केंद्र हा शिक्षण प्रयोग, मुंबईच्या कास्प-प्लान या झोपडपट्टी वस्त्यामधील मुले व कुटूंबे यांच्या विकास योजना प्रकल्पाच्या प्रमुख पदाचा कार्यभार या अनुभवानानंतर त्यांनी पुण्याच्या स्त्री-वाणी या संस्थेच्या संचालक पदावरही काम केले. या दरम्यान दलित, अशिक्षित स्त्रीं यांच्या स्वप्रतिमेच्या अभ्यासाचे निकष त्यांच्या पर्यंत पोहचविण्याच्या ईर्षेतुन त्या १९८५ सालापासून चित्रपट माध्यमाकडे वळल्या.


सुमित्रा भावे या काही मूळच्या चित्रपट किवा कला क्षेत्रातील नव्हत्या. त्यांचा पिंड समाजसेविकेचा. समाजसेवा करताना आलेले अनुभव, प्रसंग, त्यांच्या सर्जनशील मनाने सूक्ष्मपणे टिपले. त्याच्या अभिव्यक्तीसाठी चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम त्यांनी वापरले. त्यावेळी वाणिज्य शाखेत शिक्षणारा आणि नाट्य उपक्रमामध्ये रमलेला विद्यार्थी सुनिल सुकथनकर त्यांना सहकारी म्हणून लाभला. त्यांचा बाई हा पहिला लघुपट राष्ट्रपती पदक विजेता ठरला. सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर या दोन व्यक्तीमत्वांचे कार्यक्षेत्र भिन्न होते, परंतु ध्येय एकच होते, ते म्हणजे सामाजिक जागृती. योगायोगाने ते एकत्र आले. समांतर चित्रपट आजपर्यंत सरंजामशाही, शोषण, अत्याचार, विवाहबाह्य संबंध या पलिकडे गेला नव्हता. या दिग्दर्शक द्वयीने ' दोघी', 'वास्तूपुरूष' यासारखे गंभीर विषय हाताळून या चित्रपटाला त्यापलीकडे पोहोचविले. सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या जोडीने चौदा चित्रपट, ५० हुन अधिक लघुपट, ३ दूरदर्शन मालिकांची निर्मिती व दिग्दर्शन केले. जिंदगी जिंदाबाद, १० वी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, हा भारत माझा, संहिता, अस्तु, दोघी, कासव असे त्यांचे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत. या चित्रपट व लघुपटांना तीन आंतरराष्ट्रीय, १० राष्ट्रीय, ४० हुन अधिक राज्य पुस्कार, तसेच झी, स्क्रीन, म.टा. सन्मान आदी पुरस्कार मिळाले आहेत.


देश विदेशातील अनेक महोत्सवात या चित्रपटांचे प्रदर्शनही झाले आहे. या दिग्दर्शक द्वयीला दोघी, वास्तुपुरुष, अस्तु, देवराई, बाई, पाणी, कासव या चित्रपटांसाठी तब्बल ७ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. या चित्रपटांचे स्वतंत्र कथा- पटकथा- संवाद लेखन, सुमित्रा भावे यांनीच केले असुन संहिता लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कर्नाटकातील शाश्वटती या राष्ट्रीय संस्थेतर्फे दरवर्षी एका भाषेतील अभिजात साहित्य निर्मितीसाठी दिला जाणारा कामधेनु पुरस्कार सुमित्रा भावेंना मराठी भाषेसाठी त्यांच्या संहिता लेखनातील साहित्यिक मुल्यांसाठी २०१३ मध्ये देण्यात आला होता.


सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी यांच्या चित्रपटातून मानवी मन, नाते संबंध आणि समाज मन यांच्या गुंतागुंतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी एम.के.सी.एल. या संस्थेसाठी 'माझी शाळा'ही शिक्षणातील ज्ञानरचनावादाची कथात्मक मांडणी करणारी दूरदर्शन मालिका निर्माण केली होती. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ही मालिका ४० भागांमध्ये दाखविण्यात आली. त्यांना केरळ मधील अरविंदन स्मृती पुरस्कार, सह्याद्री चित्ररत्न पुरस्कार, साहिर लुधियानवी - बलराज सहानी प्रतिष्ठान तर्फे दिला गेलेला के.ए.अब्बास स्मृती पुरस्कार मिळाले होते'.


सुमित्रा भावे नेहमी म्हणत असत माझा सिनेमा गल्ला भरण्यासाठी कधीच नव्हता आणि भविष्यातही नसेल. त्याचे दुःखही मला वाटत नाही. या सिनेमांसाठी प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी व्हावी, असेही कधी वाटले नाही. मी एक सिनेमाची अभ्यासक आहे आणि मानवी भाव-भावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. त्यामागे केवळ सकस समाजनिर्मितीचाच प्रामाणिक उद्देश असतो. सुमित्रा भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

‎संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

Updated : 19 April 2021 7:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top