Home > Max Woman Blog > कौटुंबिक हिंसाचार असाही.. - भाग २

कौटुंबिक हिंसाचार असाही.. - भाग २

कौटुंबिक हिंसाचार असाही.. - भाग २
X

'कावळा शिवणे' हा वाक्प्रचार सुमारे ५० वर्षांपूर्वीच्या पुण्यामुंबईत ऐकू येई. अशा कावळा शिवलेल्या (म्हणजे पाळी सुरु असलेल्या आणि बाहेर बसलेल्या) महिला खेडोपाडी तर सहजच बघायला मिळत. एका ठराविक वयानंतर मुलीला पाळी येते आणि ती 'मोठी' झाली म्हणून तिच्यावर अनेक बंधनं येतात. हे 'मोठं' होणं म्हणजे संभोगानंतर दिवस जाण्याची कुवत निर्माण होणं. पुरुषसत्ताक समाजात बाईच्या लैंगिक ‘पावित्र्याला’ अतोनात महत्व असल्याने तिचं लग्न होईपर्यंत; मुलीच्या लैंगिक संरक्षणाची जबाबदारी कुटुंबीय अशा बंधनातून पार पाडतात!

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे घराच्या कोपर्‍यातल्या अंधार्‍या खोलीत, स्वच्छतेची पुरेशी सोय नसतांना एकटीला पाळीच्या काळात राहायला लावणे, तिला विटाळशी मानणे यात बाईच्या व्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली होत असे. त्या दृष्टीने हे अज्ञानामुळे, रुढीमुळे वाट्याला येणार्‍या मानसिक हिंसाचाराचं उदाहरण होतं.

हे ही वाचा..

गर्भधारणा होण्यासाठी पुरुषाच्या शुक्राणूंची आवश्यकता असली तरी दिवस बाईला जातात. तिच्या शरीरातल्या गर्भाशयात गर्भ रुजतो, मोठा होतो आणि योग्य वेळेला त्याचा 'जन्म' होतो या परिस्थितीमुळे महिलांनीच संततिप्रतिबंधनाची जबाबदारी घेतली पाहिजे असा पुरुषसत्ताक समाजातला मतप्रवाह असतो. आजघडीला पुरुषांसाठी कंडोम आणि नसबंदी एवढे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. टेस्टोस्टेरॉन नावाच्या पुरुष संप्रेरकाचा वापर करणारं एक इंजेक्शन प्रायोगिक पातळीवर पास झालं नाही. याउलट स्त्री-संप्रेरकांचा वापर करणार्‍या गोळ्या आणि इंजेक्शन (डेपो प्रोव्हेरा, नेट-एन, नॉरप्लान्ट इ.), संभोगानंतर ४८ तासांच्या आत तोंडानी घ्यायची i-Pill सारखी गोळी, तांबी, डायफ्रॅम, महिलांसाठी कंडोम अशी साधने आणि शिवाय गर्भपात आणि स्त्री-नसबंदी असे अनेक पर्याय बाईपुढे उपलब्ध असतात.

ही यादी पाहून असं सहज वाटेल की बघा महिलांना कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत आणि म्हणून साहजिकच महिलांनीच गर्भ राहू नये मानून एक ना दुसर्‍या पद्धतीचा वापर करणे हे किती योग्य आणि नैसर्गिक आहे! पण गर्भधारणेसाठी बाईलाच पूर्णतया जबाबदार धरून पितृसत्ताक समाजाने बाईच्या डोक्यावरच ती जबाबदारी थोपली आहे. जगभरात स्त्री-संततिप्रतिबंधनाच्या साधनांच्या संशोधनावर जास्त भर देण्यात आला, त्यामुळे साधनांचा आकडा वाढला, पर्याय वाढले. प्रत्येक औषधाचे काही ना काही side effects असतातच, पण ते महिलांनी सोसावे हा विचार प्रत्ययाला येतो. जगभर अशी साधनं वापरणार्‍या पुरुषांचं प्रमाण अगदी कमी आहे. भारतात ते १०% हून कमी आहे. पुरुष नसबंदीचं ऑपरेशन करण्यात स्त्री नसबंदीच्या ऑपरेशनच्या तुलनेत अगदी कमी धोका असतो. तरीही भारतात पुरुष नसबंदीचं प्रमाण नगण्य आहे.

बाईला निवड करायची संधी दिल्याचा आव आणून; फक्त तिच्यावरच संततिप्रतिबंधनाची जबाबदारी टाकणे आणि त्याच्याशी संबंधित धोक्यांना तोंड द्यायला भाग पाडणे हाही शारीरिक आणि मानसिक हिंसाचाराचाच प्रकार आहे.

-डॉ. विनिता बाळ

-प्रीती करमरकर

नारी समता मंच, पुणे narisamata@gmail.com

Updated : 30 April 2020 8:17 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top