'जी बाई फांदी तोडेल तिचा नवरा मरेल'
X
सध्या नेटिझन मध्ये एका वडाच्या झाडाचा फोटो व्हायरल होताना दिसतोय आणि त्याला अनेक ठिकाणी प्रचंड पसंती व प्रतिसाद मिळतोय. कारण त्या झाडाला लावलेली पाटी मिश्किल पणे संदेश देणाऱ्या पाट्या फक्त पुण्यातच नाही तर डोंबिवलीत सुद्धा असतात असचं म्हणावं लागेल.
डोंबिवली येथील वृक्षप्रेमी याची झाडं तोडू नये म्हणून या पाटीची भन्नाट कल्पना म्हणजे "जी बाई फांदी तोडेल तिचा नवरा मरेल" असा संदेश.
आज वटपौर्णिमाच्या दिवशीच काही महिलांनी पूजेसाठी जीवापाड जपलेल्या झाडांच्या फांद्या तोडल्यानंतर किरण अतिशय दुःखी झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले. तर त्या झाडाची कथा त्यांच्याच शब्दात मानवाने निसर्गावर केलेला हस्तक्षेप आणि त्यातून निर्माण झालेले अनेक धोके जसे की दुष्काळ, अतिवृष्टी किंवा भयानक ऊन याने चिंतीत होऊन आपण निसर्गाला जपण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही तर आपल्या शिक्षणाचा काहीच फायदा नाही असे वाटू लागले.
साल २०१६ च्या पर्यावरण दिनी अनेक मित्रांच्या सोबतीने "मिशन हिरवीगार डोंबिवली" हे अभियान सुरू केले, अडथळे कमी नव्हते पण अनेक मित्र सोबत असल्याने सहज निभवलं गेलं. ५ जून २०१६ ला झाडे लावायच्या निमित्ताने सर्व साधनांची जुळवाजुळव केली. खड्डे खोदायला सुरवात केली पण डांबराचा थरच इतका वाढला होता की अडीच फुटापर्यंत मातीच लागली नाही. कुदळ नसल्यामुळे लोखंडी दांड्यानेच खोदून खोदून हाताला फोड आले होते पण तसेच खड्डे खोदत राहिलो.
काहींनी झाडांची मदत केली होती पण वड, पिंपळ, निंबाचे झाडे अतिशय महाग होती. तेवढयात केडीएमसी मैदानातील स्विमिंग पूलच्या भिंतीवर संडासच्या पाईप वर छोटंसं वडाचं रोपटं असल्याची माहिती मिळाली मित्र आकाश आहिरे याला घेऊन लगेच ते रोपटं अलगद काढायला सुरवात केली पण सहज निघेल ते वडाचं झाड कसलं.. अगदी संडासच्या टाकीतून विष्ठा हाताला लागे पर्यंत त्या वडाची मुळे अलगद ओढून काढली मित्रांच्या सहकार्याने पेंढारकर कॉलेज जवळ ते रोपटं लावण्यात आलं. मस्त पालवी फुटलीच होती तेवढ्यात रस्त्याचे काम निघाले आणि परत त्या कर्मचाऱ्यांनी जमीन खोदली आणि झाड तसेच तुटून पडले. मग परत आम्ही ते रोपटं फुटपाथ च्या कडेला लावले.
आधीच निसर्गात झाडांची खूप कमतरता त्यात मी गेल्या काही वर्षांपासून वटपौर्णिमेला वडाच्या फांद्याच घरात आणून त्याला धागा गुंडाळायचा ट्रेंड पाहतोय, पण यातून रूढी परंपरांचे पालन तर होतच नाही उलट वडाच्या फांद्या विकणाऱ्यांचा सुळसुळाट वाढून वडाच्या झाडांना धोका निर्माण झाला आहे..
काल डोंबिवली स्टेशन परिसरात अनेक फांद्या विक्रेते पाहून माझ्या झाडाबद्दल मला भीती वाटू लागली. ते पाहायला गेलो असता तिथे एक गरीब व्यक्ती झाडाच्या फांद्या तोडताना दिसली मी त्यांना रागारागात रोखले आणि ते निघून सुद्धा गेले. पण तरी माझी अस्वस्थता कमी होत नव्हती. मी विज्ञानवादी आहे मी निसर्गावर प्रेम करतो. माझा शाप या संकल्पनेवर अजिबात विश्वास नाही पण अतिशय तळमळीने रागातून मी तसे लिहून माझ्या झाडावर बोर्डच लावून आलो, उद्देश फक्त इतकाच तो बोर्ड पाहून फांद्या तोडणाऱ्या लोकांना आणि महिलांना भीतीतरी वाटेल झाड तोडताना लाज तरी वाटेल आणि माझं झाड ठणठणीत शाबुद राहील.. इतकंच
"जी बाई फांदी तोडेल तिचा नवरा मरेल"
-किरण श्रीरंग शिंदे
8424829055