सखूबाईकडून समजलेले ते बाबासाहेब...
X
आज अशी पहिलीच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल की शालिमार येथे जाऊन त्यांना वंदन करता आले नसेल.
बाबासाहेबांबद्दल काही ही लिहायचं म्हणजे शब्दच तोकडे पडत जातात. एक तर बाबासाहेब कळायला अतिशय सोपे पण लिहायला अतिशय कठिण कारण त्यांच सगळ्याच क्षेत्रातल अमर्याद असणारे कार्य त्याचे वर्णन जरी करायचे म्हटलं तरी आपण खुपच खुजे पडतो.
पण बाबा साहेब कळतात चटकन, थेट ह्रदयात शिरतात आणी म्हणूनच खुप आपलेसे वाटतात. मला ते कळले कधी ?
अगदी अस्पष्टसं आठवतय मी खुपच लहान होते आई बरोबर सुट्यां मध्ये मामाच्या गावाला जायचे ते मंतरलेले दिवस. खरंतर बालवाडी चे ते दिवस असावेत.
तर असाच एक उन्हाळा होता. माझं आजोळ म्हणजे गोकूळच, आजोबां कडे एकवीस खिल्लार बैलांची जोडी, मोठी आमराई, वीस वीस परसांच्या खोल विहीरी आणी उन्हाळ्यात आंब्या नी शिगोशिग भरलेल्या उतरंडीच्या खोल्या,शेतावरच्या मजूरांचा दांडगा पसारा. त्यांच्या खांद्यावर बसून आम्ही रानोमाळी फिरायचो आणी बिंडे बांधून मनसोक्त पोहायचो. आठवतंय तेंव्हा पासून साधारणतः सातवी मध्ये असे पर्यंत उन्हाळ्याच्या सुट्टीत ला हा आजोळचा ठरलेला कार्यक्रम .
मला पुसटशी आठवतेय ती सखूबाई. वाड्यातली शेण, सारवण आणी दिव्यांना तेल घालायची कामे ती करायची. विशेष लक्षात रहाण्याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या चार/पाच रंगाच्या धडूत्याने ठिगळे लाऊन शिवलेलं तिचे ते अनोख लूगडे, नेहमी पदराला गाठ मारलेले एक टमरेलं, घरात चहा झाला की उरलेला चहा त्या टमरेलात ओतायचा तो ओतताना जसा आता आपल्या कडे अमृततुल्य बनविताना तो वरतून संतत धारेने टाकतात अगदी तसाच तीच्या त्या टमराळ्या ला स्पर्श न होता ओतला जायचा उंबऱ्याच्या बाहेर ती आणी तिला शिधा देणारे आत. तिन्ही सांजेला आमची दृष्ट सखुबाई ने च काढायची. तव्या मध्ये लाल मिरची तडतडली आणी मरणाचा ठसका लागला की आपला खरखरीत हात आपल्या च कानशिली वर मोडीत सखूबाई म्हणायची "दृष्टावली होती माझी पोर". दिवे लागण झाली की ती तीच्या घराकडे चालती व्हायची.
मला करवंदा ची भारी आवड ती करवंदे समोरच्या डोंगरावरून विकायला यायची मग आजी एक पायली धान्य करवंद वाल्याच्या कपड्यात ओतायची आणी करवंद घ्यायची.इकडे सखूबाई चा तोंडा चा पट्टा सुरू व्हायचा लूटायला बसलाय मेला गंज जाळ्या हायत की डोंगरावर. आणी मग त्या करवंदाच्या लालचीने मी सखूबाई बरोबर डोंगरावर जायचा हट्ट धरला. आजी ने पण मिनतवारी केल्या नंतर सखुबाई च्या भरोशा वर जाण्याची परवानगी दिली. आणी मग मी आणी सखूबाई अशी आमची वरात छोट्याशा गावकुसातून निघाली.
त्या प्रसंगाच्या आज सुद्धा काही टवाळखोर कुत्सित नजरा माझा पाठलाग सोडीत नाहीत, सखुबाई ने जणू काही जमिनीत मूंडी च घातली होती आणी कटाक्षाने माझ्या पासून काही अंतर ठेऊन ती चालतं होती. तेंव्हा काहीच उमगत नव्हतं मला खर तर तीचा हात धरून चालायच होतं पण ती ने जणुकाही आमच्या दोघींच्या मध्ये अदृश्य भिंतच उभी केली होती. गावाचा ओढा पार केला आणी एक दहा बारा घरांची वस्ती आली. अगदीच सुबक खोपटी एका रांगेत उभी होती, खोपटांच्या मध्ये अगदी छोटी बाबा साहेबांची मुर्ति. सखूबाई सहज स्वरात म्हटली हा आमचा ×××वाडा आणी हा आमचा बाप. मी विचारल असावं की हे कसे बरं तुझे बाप? आणी त्या दिवशी पहिल्यांदा सखू ने बाबासाहेब कोण ते मला सांगीतले . ती ने जे बाबासाहेब सांगीतले ते झटकन मला समजले, नुसते समजले नाहीत तर ते अगदी थेट काळजाला भिडले. आणी मग ती च ते चित्र विचीत्र लूगडे, टमरेल, दृष्ट, लोकांच्या नजरा सगळे संदर्भ जस जशी मोठी होत गेले तस तसे हळूहळू लागत गेले त्या नंतर ती जिवंत असे पर्यंत आजोळी गेले की सखूबाई ची वस्ती हे माझं हक्काच ठिकाण झालं. गाव पण हळूहळू सुधारले.
नंतर बाबासाहेबां ची पुस्तके अगदी वेड्या सारखी वाचून काढली, कधी कधी काही पुस्तके डोक्यावरून गेली. एखादा व्यक्ती उन्या पुर्या पासष्ठ वर्षांच्या आयुष्यात पिढ्या न पिढ्यांच्या जाती व्यवस्थेला कसा सुरंग लाऊ शकते ते ही कोणाबद्दल कसलीही कटूता मनामध्ये न ठेवता, अक्षरशः अख्ख्या समाजाची मानसिकता एकाच आयुष्यात बदलणारे असं उदाहरण जगाच्या पातळीवर एकमेवच असावं.
बाबा साहेबांच कार्य किती मोठ असू शकते, भारता सारख्या महाप्राय देशाची घटना लिहीने, जगातील सर्वात मोठी वैयक्तिक लायब्ररी असो, जवळ पास चौंसष्ट विषयांमधील त्यांचे प्रभुत्व असो, नऊ भाषा अवगत असणे, त्यांची विपूल ग्रंथ संपदा माझी आत्यंत आवडती त्यांनी लिहलेली पुस्तके Manu And The Shudras असो किंवा Buddha or Karl Marx, The Untouchable असो,अथवा Thoughts On Pakistan, The annihilation of caste, problem of rupee, अशा सारखी प्रचंड मोठी ग्रंथ संपदा. जगातले सगळ्या धर्मां चा अभ्यास एकविस वर्ष करणारे, आठ वर्षाचा अभ्यास क्रम लंडन मध्ये दोन वर्षात करण्या सारखे अनेक विक्रम करणारे, ते महामानव झाले.
सखूबाई चे ते शब्द आठवतात ताई बाबासाहेब नसते तर ढुंगणाला झाडू बांधून आण मेलेली जनावरं ओढूण वढ्याच्या कडलां मेले असते. ते नसतं तर कोणत्याही पाटलीनीनं आपल्या नातीला आज माझ्या बरोबर धाडल नसतं.
अगदी खरं सांगायचं तर खरे बाबासाहेब समजले ते सखूबाईकडून नंतर चे बाबासाहेब मी पुस्तकातून वाचले. म्हणूनच आज सखुबाई या थोर माऊलीला वंदन आणी अशा कोट्यावधी माऊल्यांना 'स्वत्वा'ची जाणिव करून देणाऱ्या या थोर महामानवाला कोटी कोटी प्रणाम...
-डॉ. हेमलता पाटील