द ग्रेट' कलाम आणि सोनिया गांधी
X
सोनिया गांधींबद्दल एक साधी पोस्ट काय लिहिली आणि शीतसमाधीत गेलेले कूपमंडूक एकदम 'डरांव, डरांव' करू लागले! सोनियांच्या निमित्ताने का असेना, पण सोशल मीडियावर उन्हाळी 'हायबरनेशन'मध्ये असलेले 'भक्त' सापडले!
(यापूर्वीची माझी पोस्ट बघावी.)
मी व्यक्तिपूजेतून असे लिहिले आहे, अशी कोणी कमेंट केली तर ती भावना मी एकवेळ समजून घेऊ शकतो. चमचा, पाकिट, लाळघोटेपणा असे आरोपही संतापातून होऊ शकतात. सोनियांच्या धोरणांना, धारणांना, राजकारणाला, व्यक्तिमत्त्वाला विरोध असू शकतो. पण, ज्या पद्धतीने घाणेरडे- फेक फोटो, असभ्य आणि अश्लील कमेंट्स, धर्मांध शिव्या-शाप, आपल्या आई-बहिणीचा उद्धार हे सगळे सुरू झाले आहे, ते भयंकर आहे. त्यावर मी जास्त भाष्य करत नाही.
मात्र, राजकारण आणि राजकीय पक्ष चुलीत जाऊ द्यात. मला तुम्हाला व्यक्तिगत काही सांगायचे आहेः
सत्तरी ओलांडलेल्या एका महिलेवर अशा घाणेरड्या, अश्लील कमेंट्स केल्या जाताहेत. उघडे नागडे फेक फोटो दाखवून तिचे चारित्र्यहनन केले जातेय आणि, हे सारे भारतीय संस्कृतीचे नाव घेऊन! जे हे कमेंट्स करताहेत, त्यांची आई, बायको, मुलगी, बहीण यांनी घरातल्या या भयावह, विकृत पुरुषाची काळजी घ्यावी आणि त्याला वेळीच जेरबंद करावे. हे पुरूष एकूणच महिलांकडे कोणत्या पद्धतीने बघत असतील? ज्या महिला स्वतः या भाषेत कमेंट्स करताहेत, त्यांनी तातडीने मानसिक उपचार करवून घ्यावेत.
***
तर, मुद्दा असाः
सोनिया गांधी यांनी स्वतःहून पंतप्रधानपद नाकारले, या विधानाबद्दल अडचण काय आहे? ऐतिहासिक पुरावा काय सांगतो?
'सोनिया पंतप्रधान झाल्या, तर डोक्याचे मुंडण करेन', असे सुषमा स्वतःच म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्यांना 'मुंडणवीर' मानणे हे ऐतिहासिक सत्य आहे. इतर अनेकांनीही सोनियांच्या नावाला विरोध केला होता. जनता पक्षात तेव्हा असलेले डॉ. सुब्रमण्यम स्वामी यामध्ये आघाडीवर होते. हे सगळे खरे आहे.
पण, सोनियांना पंतप्रधान होण्यापासून यापैकी कोणीच रोखू शकत नव्हते. त्यांना पंतप्रधान करण्यात संविधानिक अडचण शून्य होती.
आणि, असे मी म्हणत नाहीए.
साक्षात अब्दुल कलामांनी म्हटले आहे.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल १३ मे रोजी लागला. खरे तर भाजपकडे वाजपेयींसारखा "चारित्र्यसंपन्न" चेहरा होता! प्रमोद महाजनांसारखा "सुसंस्कृत" नेता या निवडणुकीचा सूत्रधार होता! 'शायनिंग इंडिया' कॅम्पेन जोरात होते. याउलट कॉंग्रेसकडे चेहरा फक्त सोनियांचा होता. कधी नव्हे ते सलग आठ वर्षे सत्तेबाहेर असलेल्या कॉंग्रेसचे नेतृत्व सोनिया एकहाती करत होत्या. सोनियांच्या विरोधातील विखारी बदनामीच्या कॅम्पेनने टोक गाठले होते. ही निवडणूक भाजप जिंकेल, असा अनेकांचा अंदाज होता. प्रत्यक्षात कॉंग्रेस 'सिंगल लार्जेस्ट पार्टी' ठरली. यूपीएला बहुमत मिळाले. सोनिया गांधींना पंतप्रधान होण्यात कोणतीही अडचण नव्हती.
द ग्रेट' कलाम तेव्हा राष्ट्रपती होते आणि त्यांना भाजपनेच राष्ट्रपती नियुक्त केले होते.
कलामांचे आत्मचरित्र 'Turning Points: A Journey Through Challenges' हे २०१२ मध्ये आले. त्यात या प्रकरणाचा स्पष्ट उल्लेख आहे.
कलाम स्वतः सांगतातः
"सोनियांनीच पंतप्रधानपद स्वीकारावे, अशी अक्षरशः याचना त्यांच्या पक्षाचे नेते आणि चाहते करत होते. त्याचवेळी त्या जन्माने विदेशी असल्याने त्यांना पंतप्रधान करू नये, असाही दबाव होता. मात्र, सोनियांनी पंतप्रधान व्हायचे ठरवले असते, तर कोणीही त्यांना रोखू शकले नसते. मी संबंधित तज्ञांशी चर्चा केली होती. संविधानिक पायावर सोनिया पंतप्रधान होऊ शकत होत्या."
पुढे कलाम म्हणतातः
"सोनिया माझ्याकडे पाठिंब्याची पत्रे घेऊन आल्या, तेव्हा त्यांनी पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव सांगितले. हा राष्ट्रपती भवनालाच मोठा धक्का होता. त्यामुळे आम्हाला पूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागली. कारण, सोनिया गांधीच पंतप्रधान होणार असे आम्ही गृहीत धरले होते. मात्र, स्वतःहून त्यांनी ते नाकारले. मग आम्हाला नियुक्तीचे पत्र बदलावे लागले."
हे कलाम सांगताहेत. ज्यांच्याबद्दल तरी हिंदुत्ववाद्यांचा आक्षेप नसतो!
व्यक्तिगत टवाळी किती करावी? कुठल्या पातळीवर करावी? फिरोज गांधींना खान म्हणायचे, राजीव-राहुल- सोनियाला मुस्लिम पेंट करायचे! अगदी नेहरूंनाही मुस्लिम करून टाकायचे! मुळात, याला काही अर्थ नाही. पण, मुस्लिम असणे कोणाला बदनामीकारक का वाटते, हा खरा प्रश्न आहे.
डॉ. सुब्रमण्यम स्वामींची लेखक- अभ्यासक पत्नी रुक्साना स्वतः पारशी आहे. त्यांची संपादक- विचारवंत मुलगी सुहासिनी हैदर हिने मुस्लिम माणसाशी लग्न केले आहे. आणि, यात गैर काहीच नाही. एखाद्याला खान- पठाण सिद्ध करून तुम्हाला मुळात दाखवायचे काय असते?
(मुस्लिम असलेल्या) राष्ट्रपती अब्दुल कलामांना वाटले, पंतप्रधान होतील (मूळच्या ख्रिश्चन असलेल्या) सोनिया गांधी. मात्र, सोनियांनीच (शीख असलेल्या) डॉ. मनमोहनसिंगांना देशाचे पंतप्रधान केले. आणि, त्यानंतर (हिंदू असलेले) प्रणव मुखर्जीही सोनियांमुळेच देशाचे राष्ट्रपती झाले.
तुम्ही जे 'महाभारत' सध्या टीव्हीवर बघत आहात ना, ते डॉ. राही मासूम रझा सांगत असतात.
ही 'आयडिया ऑफ इंडिया' आपल्याला समजत कशी नाही?
- संजय आवटे