Home > Max Woman Blog > fact check : कोरोना लस आणि मासिक पाळी, ती whatsapp पोस्ट खरी का खोटी?

fact check : कोरोना लस आणि मासिक पाळी, ती whatsapp पोस्ट खरी का खोटी?

कोरोना व्हायरसपेक्षा लोकांना संभ्रमात टाकणाऱ्या खोट्या पोस्ट Social Mediaवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गेल्या 4 दिवसांपासून 'लसीकरण आणि मासिक पाळी' या संदर्भातली व्हायरल पोस्ट खरी का खोटी? जाणून घेण्यासाठी वाचा डॉ. शंतनु अभ्यंकर यांचा What's aap Universityवरील खोट्या मॅसेजचा पर्दाफाश करणारा लेख...

fact check : कोरोना लस आणि मासिक पाळी, ती whatsapp पोस्ट खरी का खोटी?
X

सध्या कोरोनासंदर्भातली कोणतीही आणि कसलीही पोस्ट आली की फॉरवर्ड करण्याची घाई प्रत्येकाला होत असते. करोना व्हायरसपेक्षा लोकांना संभ्रमात टाकणाऱ्या खोट्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरलं होत आहे. त्यामुळे कोणत्याही मॅसेजची शहानिशा केल्याशिवाय फॉरवर्ड करु नका... व्हॉट्सप युनिर्व्हिसिटीच्या माध्यमातून येणाऱ्या खोट्या माहितीपासून सावध रहा... गेल्या 4-5 दिवसांपासून सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप वर करोना लसीकरण आणि महिलांच्या मासिक पाळी संदर्भात एक इंग्रजी लिखित पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे महिलांमध्ये करोना लसीसंदर्भात वेगळीच भिती निर्माण झाली. या खोट्या पोस्टचा पर्दाफाश केला आहे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी....

वाचा काय म्हणतायेत डॉ. अभ्यंकर.... पेशंट, कुटुंबियांच्या ग्रुपमधल्या तरण्याताठ्या मुलींच्या आया आणि काही परिचित स्त्रिया यांना, आज सकाळी, अचानकच माझ्याबद्दल ममत्व वाटायला लागलं. फोन, व्हॉट्सॲप, मेसेज वगैरे मार्फत संपर्क सुरू झाला. सगळ्यांचा प्रश्न एकच; व्हाट्सअप वर आलेली ' ती ' पोस्ट खरी का खोटी? थोड्याच वेळात या पोस्टची आणि प्रश्नांची मला इतकी सवय झाली की कोणी प्रश्न विचारायच्या आतच, ' तुम्ही वाचलेली पोस्ट तद्दन मूर्खपणाची आहे', असं मी बेलाशक सांगू लागलो.

लवकरच अठरा वर्षाच्या पुढील व्यक्तींना लसीकरण सुरू होत आहे. पाळीच्या आधी आणि नंतर चार-पाच दिवस प्रतिकारशक्ती कमी असते. तेंव्हा अशा सर्व मुलींनी ती लस घेणे टाळावं, अशा आशयाचा अतिशय खोटा, अशास्त्रीय, सामान्यजनांना संभ्रमात टाकणारा आणि खोडसाळ मजकूर त्या पोस्टमध्ये लिहिलेला आहे. वर सर्व तरुण मुलींना हा मेसेज पाठवा अशी प्रेमळ विनंतीही आहे. मासिक पाळीच्या चक्रामध्ये शरीरात अनेक बदल होतात हे शंभर टक्के सत्य असलं तरी या चक्रानुसार प्रतिकारशक्ती हेलकावे खाते हे शंभर टक्के असत्य आहे. तेव्हा लस बेलाशक घ्यावी. जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा घ्यावी. पाळीचा आणि लस टाळण्याचा काही संबंध नाही.

पण चीड आणणारी गोष्ट तर पुढेच आहे. अशा पद्धतीच्या पोस्टमधून स्त्रियांकडे आणि त्यांच्या शरीरधर्माकडे बघण्याचा एक चुकीचा, नकारात्मक, विकृत दृष्टिकोन वारंवार ठळक केला जातो. स्त्रियांच्या बाबतीत मुळातच असलेल्या नकारात्मक समाजभावनेवर स्वार होऊन कसं स्वैरपणे हुंदडायचं हे आपण या अफवेकडून शिकावं. सत्य-असत्याचा विलक्षण मिलाफ या अफवेत दिसून येतो. पाळीनुसार शरीरात बदल होतात हे सत्य, पण त्या चक्रानुसार प्रतिकारशक्ती कमी जास्त होते हे असत्य. पण सत्याची फोडणी दिल्याने अफवा अधिक झणझणीत झाली आहे. लिहिताना आव असा की, बघा मला तुमची कित्ती कित्ती काळजी, मी तुम्हाला वेळेत सावध करत आहे, सांभाळा!!! असा जन्मदात्या मायबापासारखा काळजीचा वत्सल सूर. यामुळेही विश्वास वाढतो. त्यातून ती इंग्रजीत आलेली पोस्ट. तेव्हा ती बरोबरच असणार असा अनेकांचा गैरसमज. असो.




पण करोना आणि त्यामुळे झालेल्या अफवांच्या बुजबुजाटाचा एक फायदा झाला. अनेकांनी थेट विश्वास ठेवण्याऐवजी या पोस्टची विश्वासार्हता तपासून पाहिली. वाईटातही चांगलं पहावं ते म्हणतात ते असं.

डाॅ शंतनु अभ्यंकर

स्त्री आरोग्य तज्ञ, वाई

Updated : 25 April 2021 10:06 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top