बदनामी, चारित्र्यावर डाग हे सगळं नेहमी महिलेच्याच का?
X
एक महिला म्हणून काहीही करणं आज खूप अवघड झालं आहे असं वाटतं का? एकाद्या महिलेने आयुष्यभर घाम गाळून, मेहनतीने कमवलेली समाजातील किंमत, मान, सन्मान, प्रतिष्ठा हे सगळं तीचं चारित्र्य काही सेकंदात धुळीस मिळवू शकतं. होय...कोणीही, कधीही यावं आणि कोणत्याही महिलेचं चारित्र्य मालिन करावं इतकं सोपं आहे हे सगळं.. याच एका गोष्टीमुळे आजही अनेक महिला आपल्या घराचा उंबरा ओलांडू शकल्या नाहीत. ज्या महिलांनी हे सगळं न जुमानता काहीतरी करण्याचा प्रयत्न केला त्या अनेक महिलांना बदनाम, शारीरिक व मानसिक छळ, अनेकांचे टोमणे अशा अनेक प्रकारांना सामोरं जावं लागतं. राजकारणात तर हे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. या सगळ्यात एक प्रश्न मात्र नेहमी पडतो तो म्हणजे, बदनामी किंवा चारित्र्यावर डाग हे सगळं नेहमी महिलेच्याच का? पुरुषानं असं काही केलं तर ते त्याच पुरुषत्व, पण महिलेने असं काही केलं तर तिला समाजात जगणं मुश्किल.., असं का?
मागच्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हयरल होतं आहे. शिवसेना नेत्या शितल म्हात्रे आणि भाजप आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. या व्हिडिओ वरून राज्याच्या राजकारणात गदारोळ तर झाला आहेच त्याचबरोबर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत. यात एक गोष्ट तुम्ही पहिली का? या सगळ्यात शीतल म्हात्रे यांचेच नाव पुढे केले जात आहे. भाजपचे आमदार असलेले प्रकाश सुर्वे यांचा कुठेच काही विषय सुद्धा नाही. त्यांच्याविषयी कोणी काही बोलतं नाही. माध्यमं सुद्धा फक्त शीतल म्हात्रे यांच्याच पाठी लागलेले आहेत. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ मॉर्फ केला असल्याचं ती महिला सांगत आहे. त्यानंतर सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. हे सगळं झालं मात्र या सगळ्या प्रकरणात प्रकाश सुर्वे यांना कोणी टार्गेट केलं नाही किंवा त्यांना कोणीच काही विचारलं नाही.., मात्र एक महिला म्हणून बदनामी, चारित्र्यावर संशय हे सगळे प्रकार त्या महिलेच्या माथी मारले..
हे आज फक्त शीतल म्हात्रे यांच्यासोबत घडलं आहे असं नाही. जवळपास राजकारणात सक्रिय असणाऱ्या अनेक महिलांना असे प्रकार सहन करावे लागले आहेत. तर आता आपल्याला आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. आज हे या महिलांससोबत घडतं आहे हे उद्या तुमच्या आमच्या घरात सुद्धा घडू शकतं. आजही अनेक ग्रामीण व शहरी भागातील महिला यांच्याकडे बघून काहीतरी करण्याचा, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा, आपल्या कर्तृत्वावर काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा अनेक महिलांच्या वाटा अशा प्रकारामुळं बंद होणार आहेत. त्यामुळे लवकर जागे व्हा..