बी.सी.जी. लस कोणी शोधली, माहित्येय?
X
माणूस जन्मतो,कित्येक लाखो वर्षांपासून जन्मतोय.
पण जन्मल्या जन्मल्या साधं आधी तोंडातून आणि मग नाकातून सक्शन करून घाण बाहेर काढली तरी आणि साधं नाळ स्वच्छ ब्लेडने कापली तरी लाखो बाळं दररोज मृत्यू पासून वाचू शकतात हे वैद्यकविज्ञानाने निरीक्षण करून शोधलं. त्यामागचं कारण शोधलं. आणि प्रत्येक प्रसूतीनंतर असं करण्याचा जगभर प्रघात पाडला. लसीकरण करून शेकडो रोगांपासून भविष्यात बाळाचा बचाव करणं शक्य झालंय वैद्यकशास्त्रातील संशोधनामुळे.
लहानपणी टी.बी.पासून भविष्यात बचाव व्हावा म्हणून टोचून घेतलेली बी. सी. जी. ची लस आज आपल्याला भारतीयांना चक्क नव्यानवेल्या कोरोना विषाणूपासून काही प्रमाणात वाचवतेय. अमरीका, इंग्लंडवाले त्यांच्याकडे स्वच्छता असल्यामुळे, पोषण चांगले असल्यामुळे टीबी नसल्यामुळे ही लस घेतच नाहीयेत अलीकडे.
कसलं भारी नशीब आहे ना आपणा भारतीयांचं? वाटलं ना असं? पण बीसीजीचा शोध मात्र आपण नाही हं लावलेला...
आपल्या देशात पूर्वी, फार पूर्वी नाही, साधारण पन्नास वर्षांपूर्वी लसीकरण नव्हतं तेंव्हा नवजात बालकं धनुर्वात, गोवर, घटसर्प, मेंदूज्वर, अश्या आजारांना सहज बळी पडायची. साध्या हगवणीने, तापाने दगावायची. यावर सर्वसामान्यांना परवडतील असे उपचार, औषधे वैद्यकशास्त्राने शोधून काढले. हात स्वच्छ धुतल्याने यातले बरेच आजार टाळू शकतो हे जनतेच्या मनावर वैद्यकशास्त्राने बिंबवले. ह्याला प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणतात. हगवणीवर साधे घरगुती ओ आर एस द्या असा सरकारी यंत्रणेतून प्रचार केल्यामुळे खेडोपाडी, झोपडपट्ट्यांमध्ये कितीतरी लहान मुलांचे जीव वाचले. ऑपरेशन करण्याचे, सुरक्षित भूल देण्याचे, रक्तातील गुठळ्या विरघळवण्याचे, सुरक्षित प्रसूतीचे, कॅन्सरला, हृदयरोगाला हरवणाऱ्या औषधोपचार पध्दतीचे अनंत नवनवीन प्रकार वैद्यकशास्त्र अथक प्रयत्न करून शोधत असते.
किती उपकार आहेत हे सर्व शोधणाऱ्या शास्त्रज्ञांचे,डॉक्टरांचे आपल्यावर...
इतके उपकार असूनही त्यांची नावंही आपल्याला माहीत नसतात, हयात असताना त्यांना गडगंज पैसा मिळत नाही की एखाद्या अंगप्रदर्शन, अंगविक्षेप करणाऱ्या नटनट्यांना मिळतात तसे पुरस्कार, ग्लॅमर मिळत नाही.
मेल्यानंतर कोणी त्यांचे पुतळे उभे करत नाहीत की, त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या होत नाहीत, त्यांच्यावर पोवाडे रचले जात नाहीत, की त्यांच्या गोष्टी आजी आजोबा आपल्या नातवंडांना सांगत नाहीत.
हा लेख वाचणाऱ्या कोणालाही बी सी जी च्या लसीचा शोध लावणाऱ्याचं नाव माहीत नसणार हे मी पैज लावून सांगू शकते. गुगलवर सर्च कराल लगेच आणि मिळेलही पण यानिमित्ताने आपण शास्त्रज्ञांना संशोधकांना योग्य तो सन्मान देतो का याचा आपण मनापासून विचार करायला हवा.
आपल्याला तैमुरने आज क्या खाया, ऐश्वर्या आज कौंनसे मंदिर गयी? राणादाने आज काय दिवे लावले? डेली सोप मालिकांमधील अमकी कसा तमकीचा पुनर्जन्म आहे हे सगळं तोंडपाठ असतं.
पण रस्त्यात एखादा बेशुद्ध पडला तर त्याला लगेचच पाणी पाजू नये,ते श्वासनलिकेत जाऊन तो मरू शकतो एवढं बेसिक प्रथमोपचाराचं ज्ञान नसतं.
कुठंही खोकताना, शिंकताना ,थुंकताना काही रेस्पायरेटरी एटिकेट्स असतात आणि ते एक सामाजिक कर्तव्य आहे हे कित्येकांच्या गावीही नसतं.
या शात्रज्ञांनी कित्येक वर्षे प्रयोग केले, आयुष्य वाहून घेतली, मेंदूचा भुगा केला, प्रसंगी संशोधनासाठी जीवही दिले.
आपला एक एक शोध जगाला बहाल केला. आपण त्याचा उपयोग चांगल्यासाठीच करू असा त्यांना विश्वास होता.
आपण काय केलं?? काय करतोय?
अँटीबायोटिक्सची औषधे व्हायरल इन्फेक्शनसाठी किंवा छोट्या मोठ्या कारणांसाठी देऊ नका, दिला तरी त्याचा पूर्ण डोस कोर्स द्या, रुग्ण तो कोर्स पूर्ण करतोय का याबाबतीत सावध राहा. नवीन आलेले हायर अँटिबायोटिक्स म्हणजे अतिप्रभावी अँटिबायोटिक अगदी गरज असेल तेंव्हाच वापरा, अशी काळजी न घेतल्यास जीवाणू हळूहळू रेझिस्टंट बनतात, कोणत्याच औषधाला जुमानत नाहीत आणि मग सुपरबगसारखे इन्फेक्शन संभवतात. असे वैद्यकीय जगताला सतत बजावले जाते. पण याबाबतीत म्हणावी तितकी काळजी डॉक्टरांकडून आणि रुग्णांकडूनही घेतली जात नाही हे वास्तव आहे.
केवळ जीवाणूनाशकच नव्हे तर बुरशीवरील (फंगल इन्फेक्शन) औषधेही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर वर्षानुवर्षे वापरल्यामुळे ती कमालीची रेझिस्टंट, निरुपयोगी झाली आहेत. इतकंच काय बऱ्याच ठिकाणी superlice सुपरलाईस नावाच्या कोणत्याच औषधांना न जुमानणाऱ्या उवेचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
एकेकाळी आपल्या देशात टी बी चे इन्फेक्शन खूप कॉमन होते, अर्थात अजूनही आहेच. पण टी बी वरील औषधे व्यवस्थित घेतली तर तो बरा होत असे. पण बऱ्याचदा ट्रीटमेन्ट व्यवस्थित कम्प्लिट न केल्याने त्यामध्येही आता MDR TB (multidrug resistant) म्हणजे आत्ता उपलब्ध असणाऱ्या औषधांना न जुमानणाऱ्या टी बीच्या जीवाणूचे इन्फेक्शन आढळून येत आहेत.
यावरून एक लक्षात येईल की आपण जसजसे या सूक्ष्म जीवांच्या विरोधात औषधे शोधत चाललोय तसतसे हे जीवही स्वतःला त्याच्याविरुद्ध adapt करत चाललेत, बदलत चाललेत. हा उत्क्रांतीचा नियमच आहे आणि तो आपल्यासाठी म्हणजे मानवजातीसाठी मोठा धोका आहे.
यामुळे आपली सामाजिक जबाबदारी समजून घेतली पाहिजे, तिचे सतत भान ठेवले पाहिजे.
वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवलाच पाहिजे.
बेसिक सायन्स सर्वाना माहीत पाहिजेच.
इंडिया आणि भारत यातला प्रत्येक जण जर जबाबदारीने वागेल तरच आपल्याला आरोग्यदायी भविष्य आहे.
आज कोरोना आल्यावर विज्ञान शोध लावण्यात,लस शोधण्यात,रामबाण औषध शोधण्यात विज्ञान जरासंच मागं पडलं तर केवढा हाहाकार उडाला...
पण आपण आजपर्यंत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी वैद्यकीय संशोधनासाठी आपले सरकार किती प्रमाणात बजेट वापरते यावर कधी लक्ष ठेवलं?कधी आवाज उठवला?
आपल्याला वाटतं,प्रत्येक आजारावर आपोआपच औषध शोधलं जातं, डॉक्टर लोक करणारच हो काही न काहीतरी .
आपण मस्त बेफिकीर जगायचं. पोषक आहार,व्यायाम,प्रदूषणमुक्त पर्यावरण,निर्व्यसनी जीवन या प्रिव्हेंटिव्ह बाबीकडे कानाडोळा करायचा..
असं आता इथून पुढे चालेल का?याचा विचार आपण करायलाच हवा.कोरोनाच्या निमित्ताने तरी हे आरोग्य चिंतन मंथन व्ह्यायलाच हवे.
वैज्ञानिक दृष्टिकोण कासवाच्या गतीनेच विकसित होणार असं एकंदरीत चित्र आहे...
पण कोरोनाने दिलेल्या झटक्यानेतरी,
" कुठल्याही धर्माच्या देवस्थानांमध्ये जागृत बिगृत असा काही देव नसतोच.तो असतो माणसासाठी ,केवळ माणुसकीच्या दृष्टिकोनातून उभं ठाकणाऱ्या माणसांमध्येच"..
एवढं जरी रामायण महाभारताच्या रिपीट टेलीकास्टमध्ये धार्मिक,दैवी ऑर्गजम शोधणाऱ्या आपल्या भाबड्या जनतेला कळलं तरी पुष्कळ होईल.
डॉ साधना पवार, पलूस,
16/04/20