Home > Max Woman Blog > काय या कमेंट? Darshana Pawar प्रकरणात सगळीच मुलं टारगेट वर?

काय या कमेंट? Darshana Pawar प्रकरणात सगळीच मुलं टारगेट वर?

MPSC परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिची ह त्या तिचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे यानेच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. हा सगळा भयंकर प्रकार थरकाप उडवणारा आहे. असे काही झाले की काही लोक लगेच मुलींवर बंधने घालू लागतात. तिने बाहेर जाऊन शिक्षण घेऊ नये, कुणाशी मैत्री करू नये, स्वतः चा चेहरा झाकून ठेवावा वगैरे गोष्टी त्यांच्यावर लादल्या जातात . चुकी त्या विकृत मुलाची आणि बंधने तिला का? बदलायचीच असेल तर त्याची हिंसक विचारसरणी बदला. या प्रकरणानंतर समाजमाध्यमांवर ज्या प्रकारे लोक व्यक्त होत आहेत ते दिखील भयंकर आहे.. सध्या गरज आहे अहिंसक, विवेकशील समाज निर्माण करण्याची या सगळ्या निमित्ताने संकेत मुनोत यांनी लिहिलेला हा लेख नक्की वाचा..

काय या कमेंट?  Darshana Pawar प्रकरणात सगळीच मुलं टारगेट वर?
X

दर्शना पवार या MPSC टॉपर मुलीच्या खु नाबद्दल सध्या भरपूर चर्चा सुरू आहे. तिला तिच्या मित्राने लग्नासाठी मागणी घातली पण तिने लग्नाला नकार दिला त्यावरून चिडून त्याने तिचा खू न केला त्याबद्दल च्या बातमी वर भरपूर विचित्र comments पाहिल्या त्याला जाळून टाका, चौकात फाशी द्या , तुकडे करा वगैरे लोक कमेंट मध्ये बोलत आहेत. सोबत मुलीला पण काही जण शिव्या देत आहेत की तिने त्याच्याशी मैत्री केलीच का? वगैरे? समजा अशीच एका मुलीने मुलाची ह त्या केली असती तर मुलाबद्दल पण आपण असेच बोललो असतो का की त्याने तिच्या सोबत मैत्री करायला च नको होती किंवा फिरायला जायला नको होते म्हणून? या दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया मला चुकीच्या वाटतात.

दर्शना ने ट्रेकिंग ला जाणे चुकीचे नव्हते, राहुल ने तिला लग्नाबद्दल विचारणे चुकीचे नव्हते आणि तिने लग्नाला नकार देणे हेही चुकीचे नव्हते. चुकीचे काय होते तर त्याला नकार मिळाल्यावर त्याने तिचा खून करणे. जरी ती ट्रेकिंग ला गेली नसती तरी खून करण्याचा दुसरा मार्ग त्याने शोधलाच असता. Acid attack , खू न आणि इतर गोष्टी आपण पाहतच असतो. शिवाय मैत्री करणे, ट्रेकिंग ला जाणे, लग्नासाठी एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचा विचार करणे किंवा तशी व्यक्ती आसपास शोधणे हेही चुकीचे नाही. चुकीचे आहे त्यात अपयश आल्यावर स्वतः चा किंवा समोरच्या व्यक्तीचा जीव घेणे..

खू न करताना त्यालाही कल्पना असेलच की त्याला मोठी शिक्षा होऊ शकते , प्राण जाऊ शकतात पण तरी असे कृत्य त्याने केले कारण मनातील राग. हा राग कसा व्यक्त करायचा? हे शिकायला हवे. टोकाचा राग आल्यावर तो व्यक्त करताना अनेक जण हिंसेवर उतरतात त्यात एकतर समोरच्याचा जीव घेतात किंवा स्वतः चा जीव देतात.

पण त्या रागावर तात्पुरता ताबा कसा मिळवता येईल, दुसरीकडे कसे लक्ष केंद्रित करता येईल? याकडे लक्ष द्यायला हवे. शाळा ,कॉलेज आणि इतर ठिकाणी बालपणापासून याबद्दल प्रशिक्षण द्यायला हवे.

स्वतः ची किंवा समोरच्याची ह त्या करणे हा पर्याय नाही हे पटवून देता आले पाहिजे. आपल्या दैंनदिन जीवनातील साध्या कॉमन शिव्या जरी पाहिल्या तरी "माझ्याशी गद्दारी केली तर जाळून टाकेन, तुकडे-तुकडे करेन, इथेच पुरेन, उभा चिरेन" वगैरे म्हटले जाते जे रागात कधी-कधी आचरणातही आणले जाते. त्यामुळे विचारांची बैठक आणि मानसिकता बदलणे सुरू केले पाहिजे. याबद्दल विवेकी विचार पद्धती आचरणात आणायला हवी. याबाबत जगाला REBT म्हणजे Rational Emotive Behavior Therapy शिकवणारे अल्बर्ट एलिस या जगप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञाकडून बरेच शिकण्यासारखे आहे. त्यांना लहानपणापासूनच किडनी चा आजार असल्याने ते दवाखान्यात जास्त असत. शिवाय आई वडिलांचे तेवढे प्रेम त्यांना मिळाले नाही आणि तरुण वयात प्रेमभंगाचे पण अनेक प्रसंग आले पण अश्या अतिशय दुःखद प्रसंगातही विवेकी विचारसरणीचा अवलंब करून त्यांनी स्वतःला आणि समुपदेशन करून मानसिक तणावात असणाऱ्या अनेकांना त्यांनी यातून बाहेर काढले आणि जीवनाला नवी दिशा दिली. उदाहरणार्थ त्यांचा साखरपुडा झाला आणि मित्रांनी हॉटेल बुक केले आणि ते एकत्र येणार त्यापूर्वीच त्यांची होणारी पत्नी संध्याकाळी हॉटेल मधून त्यांना सोडून तिच्या पित्याकडे निघून गेली. अल्बर्ट एलिस यांनी भविष्यासाठी रंगवलेली सगळी स्वप्ने तुटली, खूप दुःख झाले पण त्यांनी विवेकी विचारसरणीने त्यावर ताबा मिळवला असे अनेक प्रसंग त्यांच्या 'मी अल्बर्ट एलिस ' या पुस्तकात आहेत तशी विवेकी विचारसरणी आपण विकसित करायला हवी.

याबाबत आपल्याच भूमीत जन्मलेले गांधी, बुध्द आणि महावीर पण वाचायला हवेत. त्यातूनही याबद्दल उत्तरे मिळतील. गांधींना आफ्रिकेत स्वतः जवळ first-class चे तिकीट असताना आणि ते एवढे मोठे बॅरिस्टर असताना ट्रेन मधून बाहेर फेकले गेले तेवढ्यावरच न थांबता ते आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना त्यांना टांगे वाल्याने शिव्या देत चाबकाने खूप मारले, एकदा तर लोकांनी एवढे मारले की ते मृत्यू होता होता वाचले असे अनेक हल्ले त्यांच्यावर तेथे वर्णभेदातून झाले. अश्या वेळी ते तडकाफडकी तेथील लोकांना एकत्र करून ते जाळपोळ करू शकले असते, ज्यांनी त्यांच्या सोबत हे केले त्या व्यक्तींचा खून करू शकले असते किंवा अपमान झाला म्हणून एखादी मोठी चिठ्ठी लिहून स्वतः आत्महत्या करू शकले असते पण असली कुठलीही हिंसक कृती न करता त्यांनी स्वतः च्या रागावर ताबा मिळवून मुळ कारणांचा शोध घेतला आणि अहिंसक लोकचळवळ उभारून वर्णभेदावर मात केली.

बाकी दर्शनाच्या खुन्याला कडक शिक्षा झाली पाहिजे वगैरे मान्यच आहे ती व्हायलाच हवी पण त्यातून लगेच हे चित्र बदलणार नाही. हे बदलण्यासाठी मानसिकता आणि वैचारिक बैठक यावर काम करायला हवे. असे काही झाले की काही लोक लगेच मुलींवर बंधने घालू लागतात. तिने बाहेर जाऊन शिक्षण घेऊ नये, कुणाशी मैत्री करू नये, स्वतः चा चेहरा झाकून ठेवावा वगैरे गोष्टी त्यांच्यावर लादल्या जातात . चुकी त्या विकृत मुलाची आणि बंधने तिला का? बदलायचीच असेल तर त्याची हिंसक विचारसरणी बदला आणि त्याची सुरुवात स्वतः च्या घरातील मुलापासून करा. सध्या तर अनेक मुली सुद्धा हिंसक विचारसरणी कडे वळत आहेत आणि आपल्या प्रियकराचा, नवऱ्याचा आणि इतरांचा त्यांनी खू न केल्याचे आपण ऐकत असतो जी चुकीची वाटचाल आहे.

तर अहिंसक , विवेकशील समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहूया. आपापसात प्रेम आणि संवाद वाढवूया

- संकेत मुनोत

8668975178

changalevichar1@gmail.com

Updated : 23 Jun 2023 11:58 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top