Home > Max Woman Blog > लॉकडाऊन आणि स्त्रियांचे रोजगार

लॉकडाऊन आणि स्त्रियांचे रोजगार

लॉकडाऊन आणि स्त्रियांचे रोजगार
X

ज्योती, घरगुती शिवण काम करून टेलरिंगच्या कामात कौशल्य मिळवलं. शिलाई काम चांगलं येऊ लागलं म्हणून आईच्या मागे लागून एक वर्षाचा फॅशन डिझाईनिगचा कोर्स केला. तिची आई भाजीपाला व्यवसाय करते. कोर्सची फीस भरण्यासाठी पतसंस्थेचे कर्ज घेतले होते. ज्योती दिवसभर कॉलेज करून घरी आल्यावर परत शिवण कामही करायची. नवनवीन डिझाईन करण्यासाठी तिला नवीन शिलाई मशीनची गरज होती. आईने त्यासाठीही कर्ज घेऊन तिला मशीन घेऊन दिले. त्यामुळे तिचा आता शिलाई काम करण्याचा व्यवसाय चांगला सुरू झाला होता. त्यातून तिने कर्जाची परतफेडही केली. आईच्या व्यवसायातील पैसे, तिचे शिलाई कामातील पैसे आणि भावाने हातभार लावल्यामुळे सगळं सुरळीत सुरू होत. ज्योतीकडे कपडे शिवण्यासाठी लोकांची गर्दी होत होती. त्यामुळे तिने आई आणि भावाला आपण एखादे छोटे दुकान घेऊन काम वाढवू या म्हणून हट्ट धरला. आईचा विरोध होता कारण आता तिचे लग्न करून द्यायचे. तरीही ज्योतीने तिचे म्हणणे पूर्ण केले. तिच्या घरा जवळ नव्याने तयार झालेल्या सोसायटीत एक शॉप किरायाने घेतले. तिच्या शॉपला सहा महिने पूर्ण झाले. या महिन्यात शॉपचे भाडे, वीज बील, शिलाई कामासाठीचे मटेरियल हा सगळा खर्च जावून तिला महिन्याला सहा ते आठ हजार रुपये हाती शिल्लक राहत होते. शिलाईसोबत तिने स्त्रियांना लागणारे किरकोळ साहित्यही दुकानात ठेवले होते. त्यामुळे तीच सगळं सुरळीत होत. आवडीच्या कामाने तिला शिलाई कामातून फॅशन डिझायनर बनवलं होत.

फेब्रुवारी महिना संपून मार्च सुरू झाला होता. लग्न सराईतील शिवणकाम जोरात सुरू होत. त्यामुळे तिने आधीच सगळं मटेरियल खरेदी करून ठेवले होते. ऐनवेळी काही सामान लागलं की धावपळ नको. मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत सगळं व्यवस्थित होत. कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित झाला आणि सगळचं काम ठप्प झाल. कोणत्याही कार्यक्रमात गर्दी जमवायची नाही असा सरकारी आदेश आणि सूचना आहे. म्हणून लोकांनी ठरलेले लग्न समारंभ पुढे ढकलले. ज्यांनी ज्यांनी कपडे शिवण्यासाठी दिले त्यांनी ते वापस नेण्यास सुरुवात केली. काम वाढल्यामुळे तिच्यासोबत तिने अजून एक मुलगी कामासाठी ठेवली होती. तिलाही काम बंद करावे लागले. २१ दिवसाचा लॉकडाऊन संपल्यावर परत काम सुरू करू हा विचार तिने केला पण लॉकडाऊन कालावधी वाढवला गेला. जीवनावश्यक सेवा सुरू आहेत, पण हिचे काम जीवनावश्यक सेवेत येत नाही म्हणून बंद आहे.

ज्योती सांगते, फॅशन डिझाईनिंग माझं फक्त रोजगार मिळवण्याचं साधन नाही. माझ स्वप्न आहे स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं. हे शॉप मी याचसाठी घेतले होते. पण आता लॉकडाऊन वाढल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. काम बंद आहे, पण दुकानाचे भाडे, लाइटबील भरावे लागणार आहे. जे मटेरियल खरेदी केले त्याचा खर्चही अंगावर पडणार आहे. फॅशनच्या काळात जे चमकत ते सोनं असत. त्यामुळे कोणतेही मटेरियल जास्त काळ पडून राहिले की, त्याची चमक निघून जाते. कपडे शिवण्यासाठी येणार्‍या प्रत्येक व्यक्तिला त्याचे कपडे चांगलेच शिवलेले पाहिजे असतात. त्यावर लावलेले शो बटन, लेस, जाळी या चांगल्याच हव्या असतात. यात गैर काय आहे, कस्टमर त्यासाठी पैसे देत असतो. हे काम लवकर सुरू झाले नाही तर, हे सगळे मटेरियल वाया जाणार आहे.

फिरदोस, जोगेश्वरी मुंबईत राहणारी. ब्युटी पार्लरच्या होम सर्विस देते. फिरदोसच्या घरी तिची आई, ती आणि लहान भाऊ आहे. वडिल सेक्युरीटी गार्ड होते. एक दिवस अचानक आजारी पडण्याचं निमित्त झालं त्यातच त्याचा मृत्यू झाला. फिरदोसची आईने घरगुती कामगार म्हणून काम सुरू केले. फिरदोसने बारावीपर्यंत शिक्षण घेऊन ब्युटी पार्लरचा कोर्स केला. तीच घर म्हणजे मुंबईच्या वसतीमधील दहा बाय दहाची खोली. त्यामुळे पार्लर सुरू करण्याचा प्रश्न नव्हता. एका पार्लरमध्ये काही दिवस काम केलं पण कामाचे तास जास्त आणि पैसा कमी त्यामुळे तिने ते काम सोडून दिले. स्वत:चं ब्युटी पार्लरच्या होम सर्विस देण्याची सुरुवात केली. तिची आई ज्याकडे घरकामाला जात होती त्यातून तिला बर्‍यापैकी कॉनटॅक्ट मिळून ऑर्डर मिळू लागल्या. महिन्याचे कस्टमर अपॉईंटमेंट फिक्स झाल्या. त्यामुळे कधी ब्युटी पार्लर कधी मेहंदी ऑर्डर यात तीही महिन्याला पाच सहा हजार रुपये कमवत होती. कोणत्या कस्टमरला कोणत्या ब्रॅंडचे फेशियल लागते हे माहीत झाले होते त्यामुळे या प्रॉडक्टचा स्टॉकही आधीच आणून ठेवते. पण, लॉकडाऊन झाल्यामुळे तिला एकही ऑर्डर मिळाली नाही. फिरदोस सांगते, मार्चपासून लग्नसराई असते त्यामुळे मार्च ते मे या महिन्यात मिळणारे उत्पन्न चांगले असते. पुढे पावसाळा सुरू होतो म्हणून जास्त ऑर्डर नसतात. याकाळात एकाच घरात दहा दहा ऑर्डरही मिळलात. यावर्षी हा सीझन पूर्ण हातातून गेला आहे.

कोरोनाच्या पार्श्व्भूमीवर झालेल्या लॉकडाऊनने ज्योती, फिरदोस सारख्या असंख्य मुलींचे रोजगार हिरावून घेतले आहे. या लॉकडाऊन मध्ये इनफॉर्मल सेक्टरमध्ये काम करणार्‍या तरुणाच्या रोजगारावर मोठ्या प्रमाणात कुर्‍हाड चालवली आहे. १३ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा आपण आढावा घेतला तर ग्लोबली २५ दशलक्ष लोकांच्या नोकर्‍या जाण्याचा धोखा निर्माण झाला आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, यूरोपियन देश, आशियाई देश यात मोठ्या प्रमाणात नोकर्‍यात कपात करून बेरोजगारीचा दर वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या आयएलओ मॉनिटरिंग सेकंड एडिशन -कोविड १९ आणि द वर्ल्ड ऑफ वर्क या अहवालात नमूद केल्याप्रमाणे कोविड १९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती ही दुसर्‍या जागतिक महायुद्धापेक्षा ही भयानक असल्याचे म्हटले आहे. भारतात मार्च २०२० च्या अखेरीस बेरोजगारीचा दर ८.७% इतका होता तो लॉकडाऊनच्या दुसर्‍याच आठवड्यात २३.४% वर आला आहे. या सगळ्या परिस्थितीचा परिणाम स्त्रियांच्या रोजगाराच्या संदर्भात पाहिला तर तो मोठ्या प्रमाणात होईल. शिवाय रोजगार नाही म्हणून मुलीचे शिक्षण अर्धवट सुटू शकते, मुलगीला घरात ठेऊन कसे चालेल म्हणून बाल विवाह, कमी वयातील बाळंतपण, कुपोषण, भुकबळी हे चक्र हातपाय पसरवायला सुरुवात करेल.

वाढत्या बेरोजगारीमुळे स्त्रियांच्यासाठी काम करणे आणि घर सांभाळणे यातील तारेवरची कसरत पुन्हा जीवघेणी असू शकते. घरातील पुरुषाच्या हाताला काम नसेल, घर चालविण्याची जबाबदारी शक्य होत नसेल तर हे नैराश्य, राग व्यक्त करण्यासाठी ‘स्त्री’ सोयीचे असते. सद्य परिस्थिती पाहता लॉकडाऊनच्या काळात ‘हम अंदर कोरोना बाहर’ हे ब्रीद वाक्य असले तरी स्त्रियांसाठी घर तरी कोठे सुरक्षित आहे. ज्योती, फिरदोस सारख्या तरुणींना हे ‘कोविड १९ चहूबाजूंनी लॉकडाऊन’ करेल अशी भीती निर्माण झाली आहे.

-रेणुका कड

Updated : 24 April 2020 12:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top