कौटुंबिक हिंसाचाराची कारणे आणि परिणाम
X
कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय आणि त्याबाबतीतले कायदे आपण पहिले. आज हिंसाचाराची कारणे आणि परिणाम समजून घेऊ या.
पितृसत्ताक नियंत्रण टिकवून ठेवण्यासाठी हिंसा होते असं साधारणपणे दिसतं. मुलीचे शिक्षण/लग्न इ. निर्णय तिच्या वतीने कुटुंबिय घेत असतात. जात हा घटक इथे प्रभावी असतो, आंतरजातीय विवाह केल्यास हिंसेचा सामना करावा लागू शकतो.
घरातल्या बाईने काय करायचे, बाहेरचे काम कुठे/कसे यावर पतीचे/घरच्यांचे नियंत्रण असते. यावरून किंवा स्मार्टफोन वापरावरुन अनेकदा स्त्रियांना शिवीगाळ-मारहाण होते. मूल नाही/मुलगा नाही म्हणून पत्नीला मारहाण किंवा सोडून देणे हे आहेच. म्हणजेच स्त्रियांचे श्रम, लैंगिकता, पुनरुत्पादन यावर पितृसत्ताक नियंत्रण असते; त्याप्रमाणे न वागल्यास हिंसा सहन करावी लागते.
पत्नी ऐकत नसेल, चुका करत असेल तर नवरा मारणारच असे हिंसेचे समर्थनही होते. मात्र पत्नीने नवर्याचे सगळे ऐकलेच पाहिजे, ही पुन्हा पितृसत्ताक मानसिकता आहे. आधुनिक कायदाव्यवस्था हिंसा करण्याचे अधिकार कुणालाही देत नाही. उलट कोणत्याही प्रकारची हिंसा म्हणजे पीडितेच्या हक्कांचे उल्लंघन आहे असे कायदा म्हणतो.
स्त्रिया हिंसा सहन का करतात याची अनेक कारणे आहेत. मुलगी म्हणजे जबाबदारी, तिचं लग्न लावलं की आम्ही सुटलो असा विचार पालक करतात. अनेकदा लहान वयात, पुरेसे शिक्षण होण्याआधीच मुलीचे लग्न होते. अनेकजणी आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकत नाहीत. म्हणजे स्त्रियांना सक्षम होण्याची संधी न मिळणे हे प्रमुख कारण दिसतं. लिंगभाव जडणघडणीत मुलींनी आज्ञाधारक, सहनशील असावं हे शिकवलं जातं. लग्न-मुलंबाळं हे स्त्रीच्या जन्माचं सार्थक असल्याचं ठसवलं जातं. “बाईला अॅडजस्ट करावं लागतं. थोडं सहन कर" असं स्त्रियांना सांगितलं जातं, सासरी छळ झाला तर स्त्रियांना दोष दिला जातो. त्यात मूल असेल तर बाई अगतिक असते, एकट्या स्त्रीला मान/सुरक्षितता नसते. नाईलाजाने तिला त्याच कुटुंबात राहावे लागते.
अशा हिंसाचाराचे परिणाम घरातल्या मुला-मुलींवर म्हणजे पुढच्या पिढीवरही होतात. वाढत्या वयात; घरात हिंसाचार पहाणार्या मुलामुलींना हिंसाचारात काही वावगे न वाटण्याची शक्यता असते. आपण निमूटपणे ऐकले नाही तर आपल्याही वाट्याला हे येईल असे वाटून मुली आज्ञाधारक बनतात. घरातल्या बाईने ऐकले नाही तर पुरुष म्हणून आपण तिला मारहाण करु शकतो असे मुलांना वाटते आणि ही हिंसा पुढच्या पिढीतही चालू रहाण्याची शक्यता वाढते. या दीर्घकालिन परिणामांव्यतिरिक्त अभ्यासात रस न वाटणे, एकाग्रता ढळणे, दिवास्वप्नात रमणे, भीती, औदासिन्य, चिंता, असहाय्य्तेची भावना असे परिणाम दिसतात.
भारतात २७% मुलींचे विवाह १८ वर्षाच्या आत होतात तर ३३% विवाहित स्त्रिया हिंसाचार सहन करतात. घरात भांड्याला भांडं लागणारच असं म्हणून हिंसाचाराचे मामुलीकरण करणारी पितृसत्ताक व्यवस्था बदलली तर परिस्थिती बदलेल, त्याविषयी पुढच्या लेखात पाहू.
-प्रीती करमरकर