पंडिता रमाबाईंच्या नावाने विधवांसाठी योजना जाहीर करून सरकारकडून स्मृतिशताब्दी वर्षात यथोचित स्मरण ...
पंडिता रमाबाई यांचे हे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. रमाबाईंच्या मृत्यूला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. कालच्या बजेटमध्ये विधवा महिलांसाठी पंडिता रमाबाई यांच्या नावाने कर्जाची रोजगारासाठी योजना जाहीर करण्यात आली. खरंतर पंडिता रमाबाई यांनी विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी दीडशे वर्षांपूर्वी प्रयत्न केले होते. बालविवाह, पुनर्विवाह बंदी आशा घातक चालीरीती व रूढी परंपरांमधून समाजास मुक्त त्यांनी करण्यासाठी अपार कष्ट घेतले. समाजसुधारणेसाठी झटलेल्या पंडिता रमाबाई नक्की कोण होत्या? पंडिता रमाबाई यांच्या कार्याचा आढावा घेणारा हेरंब कुलकर्णी यांचा हा लेख नक्की वाचा..
X
विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी १५० वर्षांपूर्वी ज्यांनी प्रयत्न केले.त्या रमाबाईंचे हे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. या ५ एप्रिल २०२२ ला त्यांच्या मृत्यूला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्या बजेटमध्ये विधवा महिलांसाठी पंडिता रमाबाई यांच्या नावाने कर्जाची रोजगारासाठीची योजना जाहीर करण्यात आली आहे.
पंडिता रमाबाई यांचे सरकारने केलेले हे यथोचित स्मरण आहे...याबद्दल अजितदादा यांचे विशेष अभिनंदन
येत्या ५ एप्रिल ला सरकारने त्यांना अभिवादन करणारा विशेष कार्यक्रम घ्यायला हवा.
पंडिता रमाबाई कोण होत्या....??? (२३ एप्रिल १८५८ – ५ एप्रिल १९२२)
रमाबाईंनी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळविले होतेच; पण मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड भाषाही त्या अस्खलितपणे बोलू शकत होत्या. त्याचबरोबर त्यांना गुजराती, तुळू व हिब्रू या भाषाही अवगत होत्या. १८७८ साली त्यांचे बंधू श्रीनिवासशास्त्री यांच्यासह प्रवास करीत त्या कलकत्त्याला आल्या. तेथे मात्र त्यांच्या विद्वत्तेचा व बुद्धिमत्तेचा उचित गौरव झाला. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना 'पंडिता' व 'सरस्वती' या बिरुदावली बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 'पंडिता' नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या एकमेव महिला होत. रमाबाईंचा कलकत्ता येथे केशवचंद्र सेन यांच्याशी संबंध आला. आंतरजातीय विवाह करून रमाबाईंनी चुकीच्या रुढींविरूद्ध बंड पुकारले होते. .
बालविवाह, पुनर्विवाहास बंदी इत्यादी घातक चालीरीती व दुष्ट रूढी यांतून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी १८८२ मध्ये प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इत्यादी ठिकाणी 'आर्य महिला समाजा'ची स्थापना केली. त्यामार्फत त्यांनी पुरोगामी विचाराची पेरणी सुरू केली. त्यांनी याच वर्षी स्त्रीयांसंदर्भातील स्त्रीधर्मनीति नामक पुस्तक लिहिले. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्यामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या बरोबरच सनातनवादी विचारवंतांचा त्यांनी रोष ओढवून घेतला. मुक्ती सदन अथवा मुक्तीमिशन हे रमाबाईंच्या प्रभुवरील प्रगाढ श्रद्धेचे प्रतिक होते. १९१३ मध्ये मुक्ती सदन येथे रमाबाईंच्या कन्या मनोरमा या अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीतून शिकवित असत. त्यावरून त्यांचे मानवतावादी कार्य समोर येते.
अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात हिंदू बालविधवांच्या प्रश्नाचा ऊहापोह करणारे द हायकास्ट हिंदू वूमन (१८८७-८८) हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले. स्त्रियांच्या शोषणाच्या मुळाशी असलेल्या पुरुषप्रधान व्यवस्थेची कठोर चिकित्सा रमाबाईंनी त्यांच्या या पुस्तकात केली आहे. एवढेच नव्हे, तर त्या काळातील संपूर्ण देशातील आणि त्यातही महाराष्ट्रातील भौतिक, वैचारिक तसेच सांस्कृतिक व्यवहार ज्या पुरुषप्रधानतेच्या पायावर उभे होते, त्या पुरुषप्रधानतेचे सखोल विश्लेषण, चिकित्सा आपल्याला रमाबाईंच्या या ग्रंथात अभ्यासण्यास मिळते. त्यांच्या विचाराने अमेरिकन प्रभावित झाले. रमाबाई अमेरिकेहून परत आल्यानंतर ११ मार्च १८८९ रोजी मुंबईला विधवांकरिता 'शारदा सदन' नावाची संस्था काढली. त्यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या
स्त्रीप्रतिनिधित्वाचा पुरस्कार केला. केशवपनाविरुद्ध त्यांनी प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीस पाठिंबाही दिला. नोव्हेंबर १८९० मध्ये 'शारदा सदन' पुण्यात आणण्यात आले. 'शारदा सदन' मध्ये प्रत्येक मुलीला धर्माचे स्वातंत्र्य दिले होते. तरीही गैरसमजातून झालेल्या विरोधामुळे त्यांना आपल्या कार्याचे मुख्य केंद्र केडगाव (जि. पुणे) येथे हलवावे लागले. २४ सप्टेंबर १८९८ रोजी केडगावला 'मुक्तिसदना'चे उद्घाटन करण्यात आले. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यात ३०० हून अधिक उच्चवर्णीय स्त्रिया होत्या. 'कृपासदना'ला जोडून एक रुग्णालय बांधण्यात आले. त्यांनी स्थापन केलेल्या 'प्रीतिसदन', 'शारदा सदन', 'शांतिसदन' या सदनांमधून निरनिराळ्या गटांचे लोक राहत. आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून रमाबाईंनी शारीरिक श्रमाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इत्यादी कामे शिकविली. 'मुक्तिसदना'त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे मुलींच्या साह्याने उत्पन्न काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता 'सायं घरकुला' ची व्यवस्था त्यांनी केली. १९१९ मध्ये रमाबाईंना त्यांच्या या समाजकार्याबद्दल 'कैसर-ई-हिंद' हे सुवर्ण पदक देण्यात आले. अबला स्त्रीयांची मागासलेल्या हालाखिची परिस्थिती, पुरुष व अन्य महिलांकडून त्यांची होणारी पिळवणूक, अनिष्ट रूढी व परंपरा यांविरूद्ध त्यांनी आवाज उठवला. कुमारी मातांसाठी केंद्र, स्त्री साहाय्यता केंद्र, गरीब मुलींसाठी शाळा असे अनेक उपक्रम राबवून त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ पुढे चालू ठेवली. महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचे प्रयत्न होते. हा फक्त कपड्यापुरता मुद्दा नव्हता, तर स्त्री स्वातंत्र्य व स्वनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते.
रमाबाई आपल्या वडिलांप्रमाणेच काळाच्या पुढे होत्या. अत्यंत बुद्धिवान असलेल्या या महिलेचे अंतःकरण अत्यंत उदार व दीनदुबळ्या स्त्रियांकरिता सतत तळमळणारे होते. वैयक्तिक दुःखांची किंवा अडचणींची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. त्यांनी जरी दीनदुबळ्यांच्या सेवेचे व्रत स्वीकारले, ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तरी कोणताही विशिष्ट ख्रिस्ती धर्मपंथ त्यांनी स्वीकारला नाही. त्या धर्माने ख्रिस्ती झाल्या; मात्र त्यांनी हिंदू समाज व संस्कृती कधी सोडली नाही. शेवटपर्यंत त्या शाकाहारी राहिल्या. त्यांनी सतत खादी वापरली व आश्रमवासींनाही ते वापरायला लावली. स्त्रियांच्या उद्धाराकरिता त्यांनी आजन्म व अथकपणे केलेले प्रयत्न त्यांच्या समर्मित जीवनाचेच एक अंग होते. ज्या व्यक्त्तींनी आपल्या सेवेने भारताची प्रतिष्ठा वाढविली त्यांमध्ये रमाबाईंचे स्थान वैशिष्टपूर्ण आहे.
रमाबाईंचे महत्त्वपूर्ण पुस्तके खालीलप्रमाणे आहेत :
स्त्रीधर्मनीति (१८८२); द हायकास्ट हिंदू वूमन (१८८७-८८); इबरी (भाषेचे) व्याकरण (१९०८); नवा करार (१९१२); बायबल (मराठी भाषांतर); प्रभू येशू चरित्र (१९१३); भविष्यकथा (२ री आवृ. १९१७); अ टेस्टिमनी, मुक्त्ति प्रेअर बेल अँड न्यूज लेटर्स, फॅमिन – एक्स्पिरिअन्स इन इंडिया इत्यादी.