पुन्हा एकवार!
ट्रेनमध्ये, बसमध्ये, गर्दीच्या ठिकाणी अनेक वासंनाध शिवशिवणारे हात स्त्रीला स्पर्श करण्यासाठी हात असतात. मात्र, या हातांना वेळीच अद्दल कसं घडवणार? या वासंनाध हातांना रोखणासाठी चे उपाय काय? वाचा डॉ. मुग्धा कर्णिक यांचा लेख
X
स्त्रियांना चालताना हात लावणे, कुठेतरी गाठून जबरदस्ती करणे, लैंगिकदृष्ट्या अवमानित करणे या गोष्टी सतत होत असतात. अनेकांना असं काही होत असतं हे खरं वाटत नाही. असं काही झाल्याचं सांगितलं तर घरी विश्वास ठेवला जाईल की नाही, किंवा मग घराबाहेर पडणंच बंद होईल, इतर बंधनं येतील. असं वाटून स्त्रियामुली सांगत नाहीत.
पण हे खरं असतं.
मी स्वतः तर किशोरी होते. तेव्हापासून मला हात लावणाऱ्या रस्त्यातल्या, बसमधल्या, ट्रेनमधल्या पुरुषांवर उलटवार करत आले आहे. त्या ओंगळ स्पर्शाने अख्खा दिवस घाण होतो. हे एकदोनदा अनुभवल्यानंतर मग कधीच थांबले नाही. दादरच्या पुलावर, चर्नीरोडच्या पुलावर, सदाशिवगल्लीत, खोताच्या वाडीच्या नाक्यावर, फोर्टमधून येणाऱ्या बसमध्ये कुठेही मी उलट फिरून हाणलंय. स्वतःच्या शारीरिक ताकदीचा विचारही न करता, केवळ मनाचीच ताकद वापरली.
गर्दीत खाटकन् वळून त्या घाणेरड्या पुरुषांना मी वेळोवेळी, हाताने, छत्रीने, लाथेने मारलं. माझा हल्ला इतका अनपेक्षित असे की, ते सगळे ताकदवान असूनही भेदरून पळत. आणि गर्दीचीही भीती असे. एकदाच फक्त त्या माणसावर हात उचलला नाही. प्रश्न केला. पण तो तसाच निर्लज्जपणे पाहात राहिला. आणि नाक्यावरच्या तरूण टोळक्याचीही त्याला हात लावायची हिंमत झाली नाही. मला वाटतं, मीच हल्लाबोल केला असता तर त्याला भारी पडलं असतं.
विकृत झालेल्या अनेक पुरुषांचा ओंगळपणा स्त्रियांनाच नव्हे तर कोणत्याही दुर्बळांना, लहान मुलग्यांनाही सोसावा लागतो. तो सोसण्यास नकार द्यायला नेहमीच परिस्थिती असेल असे नाही. पण जिथे शक्य आहे तिथे गर्दीत तरी न भिता यांना विरोध केलाच पाहिजे. चांगले पुरुष आणि स्त्रिया नक्की मदतीला येतील. आणि या गलिच्छांना भीती बसेल.
जे स्पर्शाचं, तेच भाषेचंही. वाईट भाषा बोलून अनेक विकृत लोक आपल्याला भीतीने गप्प बसवू पाहातात. त्यांच्यावर थेट हल्ला केलाच पाहिजे. त्यांच्या निर्लज्ज बडबडीचा विरोध, तक्रार केलीच पाहिजे. मार असाही. गर्दीत मार खाण्याचा परिणाम वेगळा असतो. हॅशटॅग वापरून परिस्थिती जगाच्या नजरेला आणून देणे. वेगळे आणि प्रत्यक्ष परिस्थितीत लढताना जीव खाऊन लढणे वेगळे. लढायचंच. हाणायचंच. लक्षात ठेवा.