'लेकरा, खूप छान लिहिलंयस रे...' माईंचे हे अखेरचे शब्द कुणासाठी?
X
मंगळवारी रात्री सिंधूताई सपकाळ यांचं निधन झालं आणि जो तो एका वेगळ्या दुःखसागरात बुडाला. सिंधूताईंना फक्त टीव्ही किंवा वृत्तपत्रात, गुगल वर पाहिलेल्यांचं जर हे झालं असेल तर त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांचं काय झालं असेल याचा आपण फक्त अंदाजच बांधू शकतो. प्रसिध्द लेखक सदानंद कदम यांनादेखील त्यांच्या ऐन विशीत सिंधूताईंच्या संपर्कात येण्याचा योग आला. तिथून ते आजपर्यंत ते त्यांच्या संपर्कात होते. सिंधूताईंच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भावना फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. काय होते त्यांच्यासोबत बोललेले माईंचे अखेरचे शब्द एकदा वाचाच....
ऐन विशीतलं पहिलं प्रेम आणि तिचे अखेरचे शब्द....
बापट बाल शिक्षण मंदिराजवळचा शामराव गवळी यांचा वाडा. त्यात त्यांचं घर आणि 'सांगली दर्शन'चं कार्यालयही. १९८६मधली एक संध्याकाळ.
पत्रकारांच्या गराड्यात ती बसलेली. पहिल्यांदाच सांगलीत आलेली. नऊवारी लुगड्यातली. कपाळावर कुंकवाचा टिळा. अंगभर पदर आणि शेजारी गठुळं. अनवाणी. समोर बसलेले सारे साक्षर तिच्यावर एकामागून एक प्रश्न फेकत होते. ती घडाघडा उत्तरं देत होती. बहिणाबाईंच्या कविता सोबत घेत. तेव्हा विशीतला मी तिच्या प्रेमात पडलो. पहिलं प्रेम. तेव्हा ती चाळीशी जवळ करत असलेली.
तेव्हापासून तिचा सहवास. पुढं माझ्या एम एटी वरून तिनं सगळी सांगली पालथी घातलेली. अनेकदा. पेठभागातल्या माझ्या घरी अनेकदा मुक्कामाला. घर छोटं म्हणून रात्री आमची पसारी रस्त्यावर. नगरपालिकेनं लावलेल्या दिव्यांच्या खांबाखाली. तिथं तिनं जागवलेल्या अनेक रात्री. रात्रभर पुस्तकं वाचत लोळायची ती. छापील अक्षरांचं वेड तिच्या रक्तातच.
आली की तासतासभर आईशी गप्पा मारत बसायची. तेव्हा ती सेलिब्रिटी नव्हती. चिखलदरा भागात आश्रम होता तिचा. आमचं पहिलं प्रेम बहरत गेलं आणि ती माझ्यासह भटकू लागली. रत्नागिरीच्या संमेलनात तिच्या आत्मवृत्ताच्या प्रती आम्ही मारूती ओमनीच्या डिकीत ठेवून विकल्या.
ती आणि तिचं काम मोठं होत गेलं. त्यानं रूपेरी पडदाही जवळ केला आणि अनेक प्रवादही. माणूस मोठा होत गेला की ते जवळ येतातच. पण ती खंबीरपणानं चालत राहिली. तिचा व्याप वाढत गेला. ती आता सेलिब्रिटी झाली होती. तिचं इकडं येणं आता कारणपरत्वेच होत होतं. पण आली की न चुकता घरी यायची. आईच्या गळ्यात पडून गप्पांचा फड रंगवायची. तिचं फोटोसेशनही पटेल चौकातल्या 'भारत फोटो स्टुडिओत अनेकदा केलं. शहाजहानभाईनं काढलेले फोटोच ती पुढं माध्यम प्रतिनिधींना देत होती.
मे २०२१ मध्ये तिच्यावर एक लेख लिहिला. तो वॉटस अपवरून फिरत फिरत तिच्यापर्यंत पोहोचला. त्या दुपारी तिचा आवाज सोबत घेत माझा भ्रमणध्वनी खणखणला. 'ती गेली तेव्हा...' पद्मादीदीचे स्वर कानावर पडले. मी भ्रमणध्वनी कानाला लावला. एका 'पद्मश्री'च्या स्वरांनी दुसरी 'पद्मश्री' बोलणार असल्याची खबर दिलेली... ग्रेसच्या शब्दांत.
'लेकरा, खूप छान लिहिलंयस रे. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. जीवन आणि जयमालाबाईंच्या आठवणी मी विसरलेच होते. तू पुन्हा उजाळा दिलास. लवकर येऊन भेटून जा.'
माझ्या पहिल्या प्रेमाचे कानावर पडलेले अखेरचे शब्द.
तो आणि असे ४८ लेख सोबत घेऊन 'सांगाती' आलं नोव्हेंबर २०२१मध्ये. त्यातल्या तिच्यावरच्या लेखावर तिची सही घेऊन, तिला 'सांगाती'ची प्रत द्यायला जायचं होतं. पण ती अशी न सांगताच अचानक गेली. धक्का देऊन. पस्तीस वर्षांतले अनेक सुखद क्षण माझ्या सोबत ठेवून.
जगाची माई...
माझी सिंधूताई...
पहिलं प्रेम आणि तिचे अखेरचे शब्द...
आत्ताही तिच्या मधाळ आवाजात... कानात गर्दी करून.
सदानंद कदम.
९४२०७९१६८०