Home > Max Woman Blog > जन्माचे भोग

जन्माचे भोग

जन्माचे भोग
X

'पुरुषाचं एक वेळचं पोट भरलं की रीतं होतं. पण बाईचं पोट रीतं व्हायला नऊ महिने लागत्यात. तिसरं बाळंतपण कारखान्यावर झालं. तव्हापासून मह्या पोटात सारखं दुखायचं. डाक्टर म्हणला, पिशवीचा त्रास हाय. जड काम करू नगा. आता आमची हातावरली पोटं. सिझन पाच-सहा महिन्यांचा असतू. काम नाही केलं तर सालभर काय खावं? एकदा चार दिस कोपटात पडून इव्हळत होते. टोळीचा मुकादम आला अन् मला, मालकाला मुंबईला घेऊन गेला. अन् पिशवी काढून टाकली.' उसतोडून परतलेली सुनीता हातावरील दोरा काढून टाकावा तसं सहजतेने गर्भाशय काढल्याचे सांगत होती.

कोरोनामुळे सारं जग ठप्प झालं. अशा वेळी महाराष्ट्रातील एक वर्ग या सर्व घडामोडीपासून अनभिज्ञ होता. शहर आणि गावापासून कोसो दूर असल्याने त्यांचा जगाशी संपर्क नव्हता. भांडवली बाजार आणि विज्ञान तंत्रज्ञानाने प्रगत देश कोरोनापुढं हतबल झाले. त्यावेळी ऊसतोड मजुरांचा कोयता उसाचा पाचोटा साळत होता. सहा महिने जीव मुठीत धरून कष्ट उपसले. आता घरी जाण्याची ओढ होती. कारखान्याचा पट्टा पडला पण सरकारच्या जिल्हा बंदीने घरची वाट अडवली. दिसलं तिथं तीन दगडं मांडून संसार थाटण्याची सवय. गेल्या काही दिवसापासून सुनीताने एका माळरानावर असाच संसार थाटला होता. वडाजवळच्या विहिरीत ससा मरून पडला म्हणून पाणी भरण्यासाठी वस्तीवर आली. आणि काहीवेळाच्या चर्चेतून तिच्या आयुष्याची झालेली फरफट उलगडत गेली.

हे ही वाचा

भारतीय कृषी व महिलांची भूमिका

माझे स्वयंपाक्याचे प्रयोग

वयाच्या 24 व्या वर्षीच तिचं गर्भाशय काढण्यात आलं. तिचं लग्न वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी झालं. एकविसाव्या वर्षाची होईस्तोवर तीन मुलं झाली होती. 'पुरुषाचं एक वेळचं पोट भरलं की रीतं होतं. पण बाईचं पोट रीतं व्हायला नऊ महिने लागत्यात. तिसरं बाळंतपण कारखान्यावर झालं. तव्हापासून मह्या पोटात सारखं दुखायचं. डाक्टर म्हणला, पिशवीचा त्रास हाय. अवजड काम करू नगा. आता आमची हातावरली पोटं. सिझन पाच-सहा महिन्यांचा असतू. काम नाही केलं तर सालभर काय खावं ? एकदा चार दिस कोपटात पडून इव्हळत होते. टोळीचा मुकादम आला अन् मला, मालकाला मुंबईला घेऊन गेला. अन् पिशवी काढून टाकली.'(मागील तीन वर्षांमध्ये 4 हजार 677 महिलांचं गर्भाशय काढण्यात आल्याचे बीबीसीचा रीपोर्ट आहे.) उसतोडून परतलेली सुनीता हातावरील दोरा काढून टाकावा तसं सहजतेने गर्भाशय काढल्याचे सांगत होती.

सुनीताचे हांडे भरेपर्यंत आईने चहा केला. काहीवेळ ती आईबरोबर गप्पा मारत होती. तेव्हा मी शेजारच्या सोफ्यावर बसून फेसबुकवरून जगाशी कनेक्ट झालो होतो. आईने घरातील पाण्याचं कॅन्ड भरून माझ्याजवळ दिला आणि अन सुनीताच्या इथं पोहच कर म्हणाली. यामुळे माझी जगाशी असलेली कनेक्टिव्हिटी डिस्टर्ब झाली. मी आता सुनीताच्या मागे सायकला कॅन्ड अडकून ढकलत होतो. बोलायला सुरुवात करायची म्हणून मी विचारलं, 'तुमचं गाव कोणतं ?'

'आम्ही बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर. पोटाची खळगी भरण्यासाठी कर्नाटकपर्यन्त जातो. गावात बारमाही दुष्काळ. कळशीभर पाण्यासाठी हिरीत उतरावं लागतं. तिथं पोटाची आग कशी इझणार ? घरदार, लेकरंबाळ, आई-बाप सोडून बारा मुलुख पालथा घालण्याची कुणाला हौस हाय ?' सुनीताने एका उत्तरात ऊसतोड मजुरांचे जगणं सांगितलं. सुनीता लगबगीने पावलं टाकत होती.

हे ही वाचा

लॉकडाऊन : मासे विक्रेत्या महिलांचा कठीण काळ

ओसाड माळरानावरच्या पाऊल वाटेने सायकल रेटत मी म्हणालो, 'किती वर्षांपासून ऊसतोडीचे काम करता?' सुनीता कसनुस हसत म्हणाली, 'आतापतूरचा सारा जन्म पाचटात गेलाय. कळत नव्हतं तव्हापासून आई-बापाबरुबर उसतोडाय जायचे. अन आता नवऱ्या बर. ऊसाचं पाचट आता जन्माला जायचं. कुठलं साल अन् काय. सारे जन्माचेचं भोग.'

सायकलला अडकवलेल्या कॅन्डातून एक पाण्याची धार गळत होती. आम्ही चालत असलेल्या रस्त्यावर त्या धारेच ओळखाण पडत होतं. ऊन बरंच तापलं होतं. त्यामुळे जमिनीवर पडलेली पाण्याची धार लगेच आटून जात. त्या पडणाऱ्या धारेकडे बघत मी म्हणालो, 'घरी कोण कोण असतं ?'

'सासू-सासरे, एक दीर अन् आमची दोन पोरं त्यांच्याजवळ हायती. एक पोरगं आता साळेत जातय. जमीन तीन एकर हाय पण पाऊस झाला तर पिकतंय. त्यामुळे उसाच्या धंद्याशिवाय इलाज नाय.' सुनीता म्हणाली.

एका वडाच्या झाडाशेजारी पाच-सहा झोपड्या दिसत होत्या. सायकल ढकलून माझ्या घशाला कोरड पडली. सायकल उभा करून कॅन्डीतून गळणाऱ्या धारेला एक हात लावला. त्यात जेवढं बसलं तेवढं पाणी घेतलं आणि घसा ओला केला. झोपड्याजवळ ट्रॉलीच्या खाली तोंडाला रुमाल बांधून पुरुष मंडळींचा पत्याचा डाव सुरू होता. ट्रॉलीतून त्यांनी सगळं समान उतरवलं नव्हतं. गरजेपुरत्या वस्तू त्या झोपड्यात दिसत होत्या. झोपड्यातील लेकरं ट्रॉलीभवती खेळत होते.

सुनीताच्या झोपडीपुढं सायकल उभा करत मी म्हणालो, 'तुमचं शिक्षण काही झालंय का ?'

'सहा महिने साळा अन सहा महिने ऊसाचा फड, असं करत सातवी झाले. वयात आले तव्हा लग्नासाठी साळा सोडली. आय आजारी पडल्यावर बापा बरं दोन वरीस कारखाना केला. मग बापानं फडातच लग्न जमीलं. पट्टा पडल्यावर घरी आलो. पुढच्या वर्षी उसाचा सिझन नवऱ्यासोबत केला.' सुनीताने बोलता बोलता डोक्यावरलं भांड उतरवलं. मला बसायला दिलं.

'काहीवेळापूर्वी तुम्ही आईला गर्भाशय पिशवी काढल्याचे सांगत होता. कशामुळे काढली ?' मी विचारले. सुनीता काहीवेळ शांत बसली. या प्रश्नाने तिने हातातील काम थांबवलं अन् म्हणाली, 'आमच्या टोळीतील अर्ध्याअधिक बायकांनी काढलेत. कामाच्या दिसात त्रास व्हायचा. उसाच्या मोळ्या उचल्याशिवाय इलाज नाही. डाक्टर म्हणला जड काम करू नका. आता काम नाही केलं तर उचल कशी फिटायची. आमचं पोट कोयत्यावर हाय. आमच्या इथल्या एका बाईला पिशवीचा कॅन्सर झाला. तसा जीव जाण्यापेक्षा मुंबईला जाऊन पिशवी काढलेली बरंच हाय. दवाखान्यासाठी मुकादमाकडून 30 हजार रुपये घेतले. पिशवी काढली तरी त्रास थांबला नाही. यंदाचं साल बळच सोसलं.' सुनीता गळ्यात आलेला हुंदका आवरत उठली अन् चुलीवर पाणी तापायला ठेवलं. (अंगावरून पांढर पाणी जाणे (white discharge), कमी-अधिक प्रमाणात रक्तस्राव होणे, गर्भाशयाला सूज असणे, संसर्ग होणे, गर्भाशय योनीमार्गे खाली येणे, पाळी अनियमित येणे, असे आजार ऊसतोड मजूर महिलामध्ये अधिक आढळतात.)

मी काहीवेळ तिथंच बसलो. सुनीता झोपडीतील आवराआवर करत होती. तेवढ्यात तिचा नवरा एकदीड वर्षाच्या लेकराला घेऊन आला. सुनीताने आमची ओळख करून दिली.

'तुम्ही इथं अडकल्याचे गावाकडे कळविले नाही का ?' मी तिच्या नवऱ्याला विचारलं.

'समद्यासणी कळीलय. इलेक्शन असतं तव्हा गावातील साऱ्या पुढाऱ्यांचे फोन, निहून- आणून सोडायला गाडी. वरून पैसं. सारे मतलबी हायती. आठ दिस झाले आम्ही अडकून पडलोय. रस्ते अडविलेत गावोगाव. एकसुद्धा फिरकला नाही.' सुनीताचा नवरा संतापाने बोलत होता. सुनीताने केलेला चहा घेऊन (ब्लॅक टी) मी घराच्या दिशेने निघालो. गावच्या पुढाऱ्यापासून जिल्ह्याच्या पुढाऱ्यांनी ऊसतोड मजुरांना वाऱ्यावर सोडलं होतं. बीडमधून जवळपास 6 लाख ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र आणि जवळच्या सीमेपलिकडच्या भागात स्थलांतर करतात. सहा ते सात महिने ऐन थंडीच्या मोसमात उघड्यावर राहतात. मार्च-एप्रिल मध्ये गावी परतात. सहा महिने ऊसतोडीसाठीचं स्थलांतर आणि ससेहोलपटीच्या रहाटगाड्यात या जीवांचे मूल्य उसाच्या पाचोट्योपेक्षा अधिक नाही. सायकलचे पायडल मारत मी पाऊल वाटेला लागलो. सूर्य माथ्यावर आला होता. माळरानावर फुफाट्याच्या वाळवंटीनी फेर धरला होता. त्यातील एखादा उंच गेलेला पाचोळा गोल गरगरत खाली उतरत होता. त्या फुफाट्यातून माझी सायकल कसरत करत चालत होती.

प्रशांत शिंदे

(लेखक पत्रकार आहे.)

Updated : 23 April 2020 8:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top